वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
पैं मेघाचेनि मुखीं निवडला । समुद्र कां वोघीं पडिला । तो मागुता जैसा आला । आपणपेयां ॥307॥ तेवीं पिंडाचेनि मिषें । पदीं पद प्रवेशे । तें एकत्व होय तैसें । पंडुकुमरा ॥308॥ आतां दुजें हन होतें । कीं एकचि हें आइतें । ऐशिये विवंचनेपुरतें । उरेचिना ।।309॥ गगनीं गगन लया जाये । ऐसें जें कांहीं आहे । तें अनुभवें जो होये । तो होऊनि ठाके ॥310॥ म्हणोनि तेथिंची मातु । न चढेचि बोलाचा हातु । जेणें संवादाचिया गांवाआंतु । पैठी कीजे ॥311॥ अर्जुना एऱ्हवीं तरी । इया अभिप्रायाचा जे गर्वु धरी । ते पाहें पां वैखरी । दुरी ठेली ॥312॥ भ्रूलता मागिलीकडे । मकाराचेंचि आंग न मांडे । सडेया प्राणा सांकडें । गगना येतां ॥313॥ पाठीं तेथेंचि तो भासळला । तव शब्दांचा दिवो मावळला । मग तयाहि वरी आटु भविन्नला । आकाशाचा ॥314॥ आतां महाशून्याचां डोहीं । जेथ गगनासीचि ठावो नाहीं । तेथ तागा लागेल काई । बोलाचा या ॥315॥ म्हणूनि आखरामाजि सांपडे । कीं कानावरी जोडे । हे तैसें नव्हे फुडें । त्रिशुद्धी गा ॥316॥ जैं कहीं दैवें । अनुभविलें फावे । तैं आपणचि हें ठाकावें । होऊनिया ॥317॥ पुढती जाणणें तें नाहींचि । म्हणोनि असो किती हेंचि । बोलावें आतां वायांचि । धनुर्धरा ॥318॥ ऐसें शब्दजात माघौतें सरे । तेथ संकल्पाचें आयुष्य पुरे । वाराही जेथ न शिरे । विचाराचा ॥319॥
हेही वाचा – Dnyaneshwari : पिंडें पिंडाचा ग्रासु, तो हा नाथसंकेतींचा दंशु…
अर्थ
मेघांच्या द्वाराने समुद्रापासून वेगळे झालेले समुद्राचे पाणी, नदीच्या ओघात पडून, नदीच्या रूपाने जसे पुन्हा समुद्रास मिळते, (तो समुद्रच नदीच्या रूपाने आपण आपणास मिळतो) ॥307॥ हे अर्जुना, त्याप्रमाणे शरीराच्या द्वारे जेव्हा शक्तिरूप टाकून शिवच शिवात मिळतो, तेव्हा ते एकत्व वरील समुद्राच्या ऐक्याप्रमाणे आहे. ॥308॥ आता द्वैत होते की, हे स्वरूप स्वत:सिद्ध एकच होते, असा विचार करण्यापुरतीही जागा उरत नाही. ॥309॥ चिदाकाशात मूर्ध्निआकाश लयास जाते, अशी जी काही स्थिती आहे, ती अनुभवाने जो होईल त्यालाच ती प्राप्त होईल. ॥310॥ म्हणून त्या स्थितीचे वर्णन शब्दांनी सांगताच येत नाही आणि शब्दांनी सांगता येईल, तेव्हाच ती गोष्ट संवादाच्या गावात स्थापित करता येईल. (अर्थात, शब्दांनी सांगताच येत नाही तर, तिजविषयी संवादही होणे शक्य नाही). ॥311॥ अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर, हा अभिप्राय सांगण्याचा गर्व जी वैखरी धरते ती वाचा या ब्रह्मस्थितीपासून फार दूर राहिली. ॥312॥ भुवईच्या मागील बाजूस (आज्ञाचक्रात) मकाराचे स्वरूप राहात नाही; इतकेच नव्हे तर, एकट्या प्राणवायूला गगनास येण्याला संकट पडते. ॥313॥ नंतर तो प्राणवायू तेथेच (मूर्ध्निआकशात) मिळाला तेव्हा शब्दाचा दिवस मावळला. मग त्यानंतर आकाशाचाही लय झाला. ॥314॥ आता परब्रह्मरूपी डोहात जेथे आकाशाचाच थांग लागत नाही, तेथे शब्दरूपी (नाव ढकलण्याच्या) वेळूचा लाग लागेल काय? ॥315॥ या कारणास्तव ती ब्रह्मस्थिती अक्षरात सापडेल (शब्दांनी सांगता येईल)) अथवा कानांनी ऐकता येईल, अशी खरोखर नाही, हे त्रिवार सत्य आहे. ॥316॥ जेव्हा कधीतरी दैवयोगाने ते अनुभवाला प्राप्त होईल, तेव्हा आपणच होऊन राहावे, असे ते आहे. ॥317॥ अर्जुना, तद्रूप झाले म्हणजे त्यापुढे आता जाणणे काही उरले नाही. म्हणून आता हे राहू दे. हेच व्यर्थ किती बोलावे? ॥318॥ याप्रमाणे शब्दामात्र जेथून माघारी परततो, जेथे संकल्प नाहीसा होतो आणि विचाराचा वाराही जेथे प्रवेश करू शकत नाही ॥319॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : पृथ्वीतें आप विरवी, आपातें तेज जिरवी…


