वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
जें उन्मनियेचें लावण्य । जें तुर्येचें तारुण्य । अनादि जें अगण्य । परमतत्त्व ॥320॥ जें आकाराचा प्रांतु । जें मोक्षाचा एकांतु । जेथ आदि आणि अंतु । विरोनी गेले ॥321॥ जें विश्वाचें मूळ । जें योगद्रुमाचें फळ । जें आनंदाचें केवळ । चैतन्य गा ॥322॥ जें महाभूतांचें बीज । जें महातेजाचें तेज । एवं पार्था जें निज । स्वरुप माझें ॥323॥ ते हे चर्तुभुज कोंभेली । जयाची शोभा रूपा आली । देखोनि नास्तिकीं नोकिलीं । भक्तवृंदें ॥324॥ तें अनिर्वाच्य महासुख । पैं आपणचि जाहले जे पुरुष । जयांचे कां निष्कर्ष । प्राप्तिवेरीं ॥325॥ आम्हीं साधन हें जें सांगितलें । तेंचि शरीर जिहीं केलें । ते आमुचेनि पाडें आले । निर्वाळलेया ॥326॥ परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचिये मुसे । वोतींव जाहले तैसे । दिसती आंगें ॥327॥ जरि हे प्रतीति हन अंतरीं फांके । तरी विश्वचि हें अवघें झांके । तंव अर्जुन म्हणे निकें । साचचि जी हें ॥328॥ कां जे आपण आतां देवो । हा बोलिलो जो उपावो । तो प्राप्तीचा ठावो । म्हणोनि घडे ॥329॥ इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरवसेनि ब्रह्मत्वा येती । हें सांगतियाची रीती । कळलें मज ॥330॥
हेही वाचा – Dnyaneshwari : पृथ्वीतें आप विरवी, आपातें तेज जिरवी…
अर्थ
जे परमात्मतत्व मनरहित अवस्थेचे सौंदर्य आहे आणि चौथ्या ज्ञानरूप अवस्थेचे तारुण्य आहे आणि जे नित्यसिद्ध आणि अमर्याद आहे. ॥320॥ जे आकाराचे शेवट आहे, जे मोक्षाचे निश्चयाचे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आरंभ आणि शेवटही नाहीशी झाली आहेत. ॥321॥ जे त्रैलोक्याचे कारण आहे, जे अष्टांगयोगरूप वृक्षाचे फळ आहे आणि जे आनंदाची केवळ जीवनकला आहे. ॥322॥ जे पंचमहाभूतांचे बीज आहे, जे सूर्याचे तेज आहे; त्याप्रमाणे अर्जुना, जे माझे खास स्वरूप आहे. ॥323॥ नास्तिकांनी भक्तांचे समुदाय पराभव केलेले पाहून ज्याची (निर्गुण स्वरूपाची) शोभा व्यक्ततेला आली, तीच ही आकाराला आलेली चतुर्भुज मूर्ती होय. ॥324॥ ज्या पुरुषांचे निश्चय प्राप्तीपर्यंत टिकतात ते पुरुष असे हे शब्दातीत उत्कृष्ट सुख आपणच बनतात. ॥325॥ आम्ही जे हे अष्टांगयोगरूपी साधन सांगितले, त्या साधनाची मूर्तीच आपले शरीर ज्यांनी केले, ते योगाभ्यासाने शुद्ध झाल्यावर आमच्या बरोबरीला आले. ॥326॥ देहाकृतीच्या मुशीत परब्रह्मरस ओतून तयार केलेली (जणू काय) मूर्तीच, ते शरीराने दिसतात. ॥327॥ जर हा अनुभव अंत:करणात प्रकाशला तर, हे सर्व जग मावळेल. तेव्हा अर्जुन म्हणाला, ठीक. हे खरे आहे महाराज. ॥328॥ कारण की, आता देवा, आपण जो हा उपाय सांगितला, तो ब्रह्मप्राप्तीचे ठिकाण आहे. म्हणून त्या उपायाने ब्रह्मप्राप्ती होते. ॥329॥ याचा दृढनिश्चयाने जे अभ्यास करतात, ते खात्रीने ब्रह्मत्वास प्राप्त होतात, हे आपल्या सांगण्याच्याच रीतीवरून मला समजले. ॥330॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : आतां महाशून्याचां डोहीं, जेथ गगनासीचि ठावो नाहीं…


