वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
आइकें कमळगर्भाकारें । जें महदाकाश दुसरें । जेथ चैतन्य आधातुरें । करुनि असिजे ॥280॥ तया हृदयाचां परिवरीं । कुंडलिनिया परमेश्वरी । तेजाची शिदोरी । विनियोगिली ।।281॥ बुद्धीचेनि शाकें । हातबोनें निकें । द्वैत जेथ न देखे । तैसें केलें ॥282॥ ऐसी निजकांती हारविली । मग प्राणुचि केवळ जाहाली । ते वेळीं कैसी गमली । म्हणावी पां ॥283॥ हो कां जे पवनाची पुतळी । पांघुरली होती सोनेसळी । ते फेडुनियां वेगळी । ठेविली तिया ॥284॥ नातरी वारयाचेनि आंगें झगटली । दीपाची दिठी निमटली । कां लखलखोनि हारपली । वीजु गगनीं ॥285॥ तैशी हृदयकमळवेऱ्हीं । दिसे सोनियाची जैशी सरी । नातरी प्रकाशजळाची झरी । वाहत आली ॥286॥ मग ते हृदयभूमी पोकळे । जिराली कां एके वेळे । तैसें शक्तीचें रूप मावळे । शक्तीचिमाजी ।।287॥ तेव्हां तरी शक्तीचि म्हणिजे । एऱ्हवी तो प्राणु केवळ जाणिजे । आतां नाद बिंदु नेणिजे । कला ज्योती ॥288॥ मनाचा हन मारु । कां पवनाचा धरु । ध्यानाचा आदरु । नाहीं परी ॥289॥ हे कल्पना घे सांडी । तें नाहीं इये परवडी । हे महाभूतांची फुडी । आटणी देखा ॥290॥ पिंडें पिंडाचा ग्रासु । तो हा नाथसंकेतींचा दंशु । परि दाऊनि गेला उद्देशु । महाविष्णु ॥291॥ तया ध्वनिताचें केणें सोडुनी । यथार्थाची घडी झाडुनी । उपलविली म्यां जाणुनि । ग्राहीक श्रोते ॥292॥
हेही वाचा – Dnyaneshwari : आइकें देह होय सोनियाचें, परि लाघव ये वायूचें…
अर्थ
अर्जुना ऐक, कमळाच्या गर्भाच्या आकाराप्रमाणे जे मूर्ध्निआकाश आहे, ते दुसरे महाकाशच आहे, त्या मूर्ध्न्याकाशाचे ठिकाणी चैतन्य अर्धे भोजन करून (अतृप्त) असते. ॥280॥ त्या चैतन्याला हृदयाकाशाच्या माजघरात आणणारी कुंडलिनी देवी ही आपल्या तेजाची शिदोरी अर्पण करते. (ती कशी तर,) ॥281॥ द्वैत ज्याला पाहाणार नाही, असा बुद्धीच्या भाजीसह हातात घेतलेला चांगला नैवेद्य अर्पण केला. ॥282॥ याप्रमाणे आपले तेज अर्पण केल्यावर ती कुंडलिनी केवळ प्राणवायुरूप होते, तेव्हा ती कशी भासते म्हणून म्हणाल तर, ॥283॥ जशी एखादी वार्याची पुतळी असावी आणि तिने पीतांबर नेसलेला असावा आणि मग तिने वस्त्र सोडून ठेवावे; ॥284॥ अथवा, वार्याची झुळूक लागून दिव्याची ज्योत नाहीशी व्हावी किंवा आकाशात वीज चमकून अदृश्य व्हावी ॥285॥ अथवा हृदयकमळापर्यंत जणू काय सोन्याची सरी अथवा प्रकाशरूप जलाचा झरा जसा काही वाहत आला आहे, अशी ती दिसते. ॥286॥ मग तो प्रकाशाचा झरा जसा हृदयाच्या पोकळ भूमीत एकदम जिरावा, त्याप्रमाणे शक्तीचे रूप शक्तीमध्येच मावळते. ॥287॥ तेव्हा तरी शक्तीच म्हणतात, पण वास्तविक तो प्राणवायूच आहे, असे समज. आता त्यास नाद, बिंदू, कला, ज्योती असे चारी धर्म नसतात. ॥288॥ मनाचा निग्रह करणे किंवा प्राणवायूचा निरोध करणे किंवा ध्यान करावेसे वाटणे, हे प्रकार तेथे राहात नाहीत. ॥289॥ ही कल्पना घे, ती कल्पना टाक, हे प्रकार तेथे नाहीत. (कारण) ही स्थिती पंचमहाभूतांची पक्की आटणी (नाश) आहे, असे समज. ॥290॥ पंचमहाभूतांनी पंचमहाभूतांचा लय करावयाचा हे आदिनाथ जे शंकर यांच्या अंतरंग खुणेचे मर्म आहे. परंतु हे मर्म श्रीविष्णू (श्रीकृष्ण) दाखवून गेले. ॥291॥ त्या संकेतरूपी सणंगाच्या गूढपणाची बंधने सोडून, यथार्थाची घडी साफ करून, श्रोते (हे या मालाचे योग्य) गिर्हाईक आहेत असे समजून, त्यांच्या पुढे घडी उलगडून मी हे सणंग ठेवले (असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात). ॥292॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा…


