वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
युञ्जन्नेनं सदाऽत्मानं योगी नियत्मानसः । शान्ति निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥15॥
ऐकें शक्तीचें तेज लोपे । तेथ देहींचें रूप हारपे । मग तो डोळियांचि माजि लपे । जगाचिया ॥293॥ एऱ्हवीं आधिलाचि ऐसें । सावयव तरी असे । परी वायूचें कां जैसें । वळिलें होय ॥294॥ नातरी कर्दळीचा गाभा । बुंथी सांडोनि उभा । कां अवयवचि नभा । निवडला तो ॥295॥ तैसें होय शरीर । तैं तें म्हणिजे खेचर । हें पद होतां चमत्कार । पिंडजनी ॥296॥ देखें साधकु निघोनि जाय । मागां पाउलाची वोळ राहे । तेथ ठायीं ठायीं होये । हे अणिमादिक ॥297॥ परि तेणें काय काज आपणयां । अवधारीं ऐसा धनंजया । लोप आथी भूतत्रया । देहींचा देहीं ॥298॥ पृथ्वीतें आप विरवी । आपातें तेज जिरवी । तेजातें पवनु हरवी । हृदयामाजीं ।।299॥ पाठीं आपण एकला उरे । परि शरीराचेनि अनुकारें । मग तोही निगे अंतरें । गगना मिळे ॥300॥ ते वेळीं कुंडलिनी हे भाष जाये । मारुत ऐसें नाम होये । परि शक्तिपण तें आहे । जंव न मिळे शिवीं ॥301॥ मग जालंधर सांडी । ककारांत फोडी । गगनाचिये पाहाडीं । पैठी होय ॥302॥ ते ॐकाराचिये पाठी । पाय देत उठाउठी । पश्यंतीचिये पाउटी । मागां घाली ॥303॥ पुढां तन्मात्रा अर्धवेरी । आकाशाचां अंतरी । भरती गमे सागरीं । सरिता जैशी ॥304॥ मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी । सोSहंभावाचिया बाह्या पसरूनीं । परमात्मलिंगा धांवोनि । आंगा घडे ॥305॥ तंव महाभूतांची जवनिक फिटे । मग दोहींसि होय झटें । तेथ गगनासकट आटे । समरसीं तिये ॥306॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा…
अर्थ
मनाचे नियमन केलेल्या आणि याप्रमाणे मनाला सदा युक्त करणारा योगी, जिचे पर्यवसान मोक्षामध्ये आहे, अशी मत्स्वरूप शांती प्राप्त करून घेतो. ॥15॥
अर्जुना, ऐक. कुंडलिनीचे तेज (जेव्हा) लय पावते, तेव्हा देहाचा आकार नाहीसा होतो, (देह वायुरूप बनतो). तो याप्रमाणे सूक्ष्म झाल्यामुळे मग त्या योग्याला लोकांच्या डोळ्यातच लपता येते. ॥293॥ वास्तविक तो देह पूर्वीप्रमाणेच सावयव असतो, परंतु (आता) तो देह जसा वायूचाच बनविलेला असावा, असा होतो. ॥294॥ अथवा केळीतील पोकळीवरील सोपटे काढून टाकून ती पोकळी जशी उभी करावी किंवा आकाशालाच अवयव उत्पन्न व्हावेत, तसा तो दिसतो. ॥295॥ असे ज्यावेळेस शरीर होते, तेव्हा त्यास खेचर (गगनविहारी) असे म्हणतात. देहधारी लोकात असे रूप होणे म्हणजे मोठा चमत्कार आहे. ॥296॥ पाहा, साधक निघून गेल्यावर मागे जी पावलांची ओळ रहाते, तेथे ठिकठिकाणी आणिमादिक सिद्धी उत्पन्न होतात. (म्हणजे साधकाची जी जी भूमिका सिद्ध होईल त्या त्या ठिकाणी त्याला अणिमादिक सिद्धी त्यास प्राप्त होत जातात). ॥297॥ पण आपल्याला त्या सिद्धींशी काय काम आहे? अर्जुना ऐक. देहाच्या देहांतच तीनही भूतांचा असा लोप होतो. ॥298॥ पृथ्वीला पाणी नाहीसे करते, पाण्याला तेज नाहीसे करते आणि तेजाला वायू हृदयामध्ये नाहीसा करतो. ॥299॥ नंतर प्राणवायू एकटा उरतो. पण तो शरीराच्या आकाराने असतो. मग तोही काही वेळाने निघून मूर्ध्निआकाशात मिळतो. ॥300॥ त्यावेळी कुंडलिनी ही भाषा जाते आणि तिला ‘मारुत्’ असे नाव येते. पण जोपर्यंत ती शिवाशी एक होत नाही, तोपर्यंत तिचे शक्तिपण असतेच. ॥301॥ मग ती प्राणवायुरूप शक्ती जालंधर बंधाचे उल्लंघन करून टाळ्यावरती नऊ इंद्रियांचे ऐक्य होण्याचे जे काकीमुख म्हणून स्थान आहे, त्याचा भेद करून, मग मूर्ध्न्याकाशरूपी पहाडावर जाऊन रहाते. ॥302॥ ती ॐकाराच्या पाठीवर तत्काळ पाय देऊन पश्यंती वाणीची पायरी मागे टाकते. ॥303॥ पुढे समुद्रात जशा नद्या मिळालेल्या दिसतात, त्याप्रमाणे अर्धमात्रापर्यंतच्या ॐकाराच्या मात्रा मूर्ध्नि-आकाशात मिळतात. ॥304॥ मग ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी स्थिर होऊन ‘ते ब्रह्म मी’ या भावनारूप बाहू पसरून त्वरेने परब्रह्मरूप लिंगाशी ऐक्य पावते. ॥305॥ तेव्हा पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होऊन मग शक्ती आणि परमात्मा यांचे ऐक्य होते. त्या ऐक्यात मूर्ध्निआकाशासकट सगळ्यांचा लय होतो. ॥306॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : पिंडें पिंडाचा ग्रासु, तो हा नाथसंकेतींचा दंशु…


