वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
देवा गोठीचि हे ऐकतां । बोधु उपजतसे चित्ता । मा अनुभवें तल्लीनता । नव्हेल केंवी ॥331॥ म्हणऊनि एथ कांहीं । अनारिसें नाहीं । परी नावभरी चित्त देई । बोला एका ॥332॥ आतां कृष्णा तुवां सांगितला योगु । तो मना तरी आला चांगु । परि न शके करुं पांगु । योग्यतेचा ॥333॥ सहजें आंगिक जेतुली आहे । तेतुलियाची जरी सिद्धि जाये । तरी हाचि मार्गु सुखोपायें । अभ्यासीन ॥334॥ नातरी देवो जैसें सांगतील । तैसें आपणपां जरी न ठकेल । तरी योग्यतेवीण होईल । तेंचि पुसों ॥335॥ जीवींचिये ऐसी धारण । म्हणोनि पुसावया जाहलें कारण । मग म्हणे तरी आपण । चित्त देइजो ॥336॥ हां हो जी अवधारिलें । हें जें साधन तुम्हीं निरूपिलें । आवडतयाहि अभ्यासिलें । फावों शके ॥337॥ कीं योग्यतेवीण नाहीं । ऐसें हन आहे कांहीं । तेथ कृष्णा म्हणती तरी काई । धनुर्धरा ।।338॥ हें काज कीर निर्वाण । परि आणिकहि जें कांहीं साधारण । तेंहि अधिकाराचे वोडवेविण । काय सिद्धि जाय ॥339॥ पैं योग्यता जे म्हणिजे । ते प्राप्तीची आधीन जाणिजे । का जें योग्य होउनि कीजे । तें आरंभीं फळें ॥340॥ तरी तैसी एथ कांहीं । सावियाचि केणी नाहीं । आणि योग्यांची काई । खाणी असे ॥341॥ नावेक विरक्तु । जाहला देहधर्मी नियतु । तरि तोचि नव्हे व्यवस्थितु । अधिकारिया ॥342॥ येतुलालिये आयणीमाजि येवढें । योग्यपण तूंतेंही जोडे । ऐसें प्रसंगें सांकडें । फेडिलें तयाचें ॥343॥
हेही वाचा – Dnyaneshwari : आतां महाशून्याचां डोहीं, जेथ गगनासीचि ठावो नाहीं…
अर्थ
देवा, योगाचे हे वर्णनच केवळ ऐकले असता चित्तात ज्ञान उत्पन्न होते, तर मग अनुभवाने तल्लीनता कशी होणार नाही? ॥331॥ म्हणून तुझ्या सांगण्यात काही अन्यथा नाही, परंतु क्षणभर माझ्या एका बोलण्याकडे लक्ष दे. ॥332॥ कृष्णा, तू जो आता योग सांगितलास तो माझ्या मनाला तर चांगलाच पटला, परंतु माझ्या ठिकाणी अधिकाराची उणीव असल्यामुळे मी त्याचे अनुष्ठान करू शकत नाही. ॥333॥ माझ्या अंगात स्वभावत: जितकी योग्यता आहे, तेवढ्याच योग्यतेने जर हा अभ्यास सिद्धीला जाईल तर, याच मार्गाचा मी सुखाने अभ्यास करीन. ॥334॥ अथवा देव जसे सांगतील, तसे जर आपल्या हातून होणार नसेल, तर योग्यतेशिवाय जे होण्याजोगे असेल तेच विचारू. ॥335॥ माझ्या मनाची अशी समजूत झाली म्हणून पुसण्याचे प्रयोजन पडले. म्हणून मी म्हणतो, आपण (इकडे) लक्ष द्यावे. ॥336॥ अहो महाराज, ऐकले का? तुम्ही जे हे साधन सांगितले, त्याचे वाटेल त्याने अनुष्ठान केले, तर ते साध्य होईल काय? ॥337॥ अथवा योग्यतेशिवाय प्राप्त होत नाही, असे काही (येथे) आहे? (असे अर्जुनाने विचारले,) तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तू हे काय विचारतोस? ॥338॥ ही तर अत्यंत उच्च दर्जाची गोष्ट आहे; पण इतर काही साधारण काम असते, ते तरी अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धीस जाते काय? ॥339॥ परंतु योग्यता जी म्हणावयाची, ती प्राप्तीच्या आधीन आहे, असे समजावे. कारण, योग्य होऊन जे करावे ते आरंभीच फलदायक होते. ॥340॥ तर, तसा काही येथे योग्यता हा सहज बाजारात मिळाणारा माल नाही, आणि योग्य पुरुषांची काय खाण आहे का? ॥341॥ थोडासा विरक्त असून देहाच्या गरजा ज्याने आवरल्या आहेत, तोच या कामी योग्य अधिकारी नाही काय? ॥342॥ एवढ्या युक्तीने एवढी योग्यता तुलाही प्राप्त होईल. (ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की,) अशी त्याची अडचण देवांनी ओघानेच दूर केली. ॥343॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : परब्रह्माचेनि रसें, देहाकृतीचिये मुसे…


