वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
शनैः शनैरुपरमेत् बुद्ध्या धृतिगृहीतया । आत्मसंस्थं मनः कृत्वा न किचिंदपि चिन्तयेत् ॥25॥
यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् । ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥26॥
बुद्धी धैर्या होय वसौटा । तरी मनातें अनुभवाचिया वाटा । हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनीं ॥378॥ याही एके परी । प्राप्ती आहे विचारीं । हें न ठके तरी सोपारी । आणिक ऐकें ॥379॥ आतां नियमुचि हा एकला । जीवें करावा आपुला । जैसा कृतनिश्चयाचिया बोला – । बाहेरा नोहे ॥380॥ जरी येतुलेनि चित्त स्थिरावे । तरी काजा आलें स्वभावें । न राहे तरी घालावें । मोकलुनी ॥381॥ मग मोकलिलें जेथ जेथ जाईल । तेथूनि नियमुचि घेऊनि येईल । ऐसेनि स्थैर्याची होईल । सवे यया ॥382॥
प्रशांतमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् । उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ॥27॥
पाठीं केतुलेनि एकें वेळें । तया स्थैर्याचेनि मेळें । आत्मस्वरुपाजवळें । येईल सहजें ॥383॥ तयातें देखोनि आंगा घडेल । तेथ अद्वैतीं द्वैत बुडेल । आणि ऐक्यतेजें उघडेल । त्रैलोक्य हें ॥384॥ आकाशीं दिसे दुसरें । ते अभ्र जैं विरे । तैं गगनचि कां भरे । विश्व जैसें ॥385॥ तैसें चित्त लया जाये । आणि चैतन्यचि आघवें होये । ऐसी प्राप्ति सुखोपायें । आहे येणें ॥386॥
युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः । सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥28॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसें हितासि जें जें निकें, तें सदाचि या इद्रिंयां दुःखे…
अर्थ
धैर्ययुक्त असा बुद्धीने हळूहळू (बाह्य प्रपंचापासून मनाचा) उपरम (निवृत्ती घेऊन) करावा आणि मनाला आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करून, दुसर्या कशाचेही चिंतन करू नये. ॥25॥
चंचल वृत्ती (अत एव) अस्थिर असे मन (आत्म्याकडून निघून) ज्याच्या ज्याच्यामुळे बाहेर जाते, त्याच्या त्याच्यापासून नियमन करून त्याला आत्म्याच्याच ताब्यात आणावे. ॥26॥
बुद्धी जर धैर्माला आश्रयस्थान झाली तर, ती मनाला अनुभवाच्या वाटेने हळूहळू आत्मानुभवात कायमचे स्थिर करते. ॥387॥ याही एक तर्हेने ब्रह्मप्राप्ती आहे. याचा विचार कर आणि हे जर तुला साध्य होत नसेल, तर आणखी एक सोपी युक्ती आहे, ती ऐक. ॥379॥ आता तू जो निश्चय करशील त्याच्या आज्ञेच्या बाहेर जो नियम कधी जाणार नाही, अशा प्रकारचा हा एकच नियम जीवाभावापासून तू आपलासा कर. ॥380॥ जर एवढ्याने चित्त स्थिर झाले तर सहजच काम झाले आणि जर एवढ्याने ते स्थिर झाले नाही तर, त्याला मोकळे सोडून द्यावे. ॥381॥ मन मोकळे सोडले असता, ते जेथे जाईल तेथून नियमच त्यास परत घेऊन येईल. अशा रीतीने यालाही स्थैर्याची सवय होईल. ॥382॥
(याप्रमाणे अभ्यास केल्याने) ज्याच्या मनाला उत्तम शांती मिळाली आहे, ज्याचा रजोगुण नाश पावला आहे, जो पापपुण्यादिकांविरहित आहे आणि जो ब्रह्मस्वरूप झाला आहे, अशा योग्याला श्रेष्ठ सुख प्राप्त होते. ॥27॥
नंतर काही एक वेळाने त्या स्थैर्याच्या योगाने मन सहज आत्मस्वरूपाजवळ येईल. ॥383॥ आणि मनाने त्या आत्मस्वरूपास पाहिल्याबरोबर, ते मन स्वत: आत्मस्वरूप बनून जाईल, तेव्हा त्या अद्वैत स्वरूपात द्वैत नाहीसे होईल, आणि नंतर हे सर्व त्रैलोक्य ऐक्याच्या तेजाने प्रकाशित होईल. ॥384॥ आकाशामध्ये निराळे दिसणारे जे मेघ, ते नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे संपूर्ण विश्व आकाशानेच भरलेले असते ॥385॥ त्याप्रमाणे आत्मस्वरूपी चित्त लयाला गेले की, संपूर्ण विश्वच चैतन्यमय होते. या सुलभ उपायाने अशी (एवढी मोठी) प्राप्ती होते. ॥386॥
या प्रकारे सर्वदा मन आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करणारा योगी पापांनी विरहित होतो आणि अनायासाने ब्रह्मसाक्षात्काररूपी आत्यंतिक सुख भोगतो. ॥28॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जया सुखाचिया गोडी, मग आर्तीची सेचि सोडी…


