वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः । वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥36॥
एऱ्हवीं विरक्ति जयांसि नाहीं । जे अभ्यासीं न रिघती कहीं । तयां नाकळे हें आम्हीही । न मनूं कायी ॥421॥ परि यमनियमांचिया वाटा न वचिजे । कहीं वैराग्याची से न करिजे । केवळ विषयजळीं ठाकिजे । बुडी देउनी ॥422॥ या जालिया मानसा कहीं । युक्तीची कांबी लागली नाहीं । तरी निश्चल होईल काईं । कैसेनि सांगें ॥423॥ म्हणोनि मनाचा निग्रह होये । ऐसा उपाय जो आहे । तो आरंभीं मग नोहे । कैसा पाहों ॥424॥ तरी योगसाधन जितुकें । तें अवघेंचि काय लटिकें । परि आपणपयां अभ्यास न ठाके । हेंचि म्हणें ॥425॥ आंगी योगाचें होय बळ । तरी मन केतुलें चपळ । काय महदादि हें सकळ । आपु नोहे ॥426॥ तेथ अर्जुन म्हणे निकें । देवो बोलती तें न चुके । साच योगबळेंसीं न तुके । मनोबळ ॥427॥ परि तोचि योगु कैसा केवीं जाणों । आम्ही येतुले दिया मातुही नेणों । म्हणोनि मनातें जी म्हणों । अनावर हें ॥428॥
हेही वाचा – Dnyaneshwari : हें एकैक काय सांगावें, या त्रैलोक्यचि आघवें…
अर्थ
(विरक्ती आणि अभ्यास यांच्या अभावी) ज्याचे अंत:करण स्वाधीन नाही, त्याला योग प्राप्त होणे अत्यंत कठिण आहे, हे मलाही पटते, परंतु ज्याचे अंत:करण स्वाधीन आहे, त्याने (वर सांगितलेल्या) उपायांनी प्रयत्न केला असता त्याला योग प्राप्त होणे शक्य आहे. ॥36॥
एरवी ज्यांच्या ठिकाणी वैराग्य नाही, जे केव्हाच अभ्यासाकडे वळत नाहीत, त्यांना मन आवरत नाही ही गोष्ट आम्हालाही कबूल नाही काय? ॥421॥ परंतु यमनियमांच्या वाटेने गेले नाही, वैराग्याची कधीसुद्धा आठवण केली नाही आणि केवळ विषयरूपी पाण्यामध्ये बुडी मारून राहिले ॥422॥ आपल्या मनाला जन्मल्यापासून कधीही युक्तीचा चिमटा जरा लावला नाही तर, ते स्थिर कसे काय होईल, सांग बरे! ॥423॥ म्हणून मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे, तो करण्याला प्रारंभ कर; मग निग्रह कसा होत नाही ते पाहू! ॥424॥ तर योगसाधन जेवढे आहे, ते सर्वच खोटे आहे काय? परंतु आपल्या हातून अभ्यास होत नाही, असे म्हण. ॥425॥ अंगामध्ये योगाचे सामर्थ्य असेल, तर त्यापुढे मनाची चपलता ती किती आहे? हे महत्-तत्वादी सर्व आपल्या स्वाधीन होणार नाही काय? ॥426॥ त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, फार चांगले! देव म्हणतात, त्यात चूक नाही. योगाच्या सामर्थ्याबरोबर मनाच्या सामर्थ्याची खरोखर तुलना होणार नाही. ॥427॥ परंतु तोच योग कसा आहे आणि त्याचे ज्ञान कसे करून घ्यावयाचे? याची इतके दिवस आम्हाला वार्ताही नव्हती, म्हणून महाराज, आम्ही म्हणत होतो की, हे मन अनावर आहे. ॥428॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : हें मन कैसें केवढें, ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडें…


