वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
हा आतां आघवेया जन्मा । तुझेनि प्रसादें पुरुषोत्तमा । योगपरिचयो आम्हां । जाहला आजी ॥429॥
अर्जुन उवाच –
अयतिः श्रद्धयोपेतो योगात् चलितमानसः । अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ॥37॥
कच्चित् नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति । अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि ॥38॥
एतत् मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः । त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ॥39॥
परि आणिक एक गोसांविया । मज संशयो असे साविया । तो तूंवांचूनि फेडावया । समर्थु नाहीं ॥430॥ म्हणोनि सांगें गोविंदा । कवण एकु मोक्षपदा । झोंबत होता श्रद्धा । उपायेंविण ॥431॥ इंद्रियग्रामोनि निगाला । आस्थेचिया वाटा लागला । आत्मसिद्धीचिया पुढिला । नगरा यावया ॥432॥ तंव आत्मसिद्धी न ठकेचि । आणि मागुतें न येववेचि । ऐसा अस्तु गेला माझारींचि । आयुष्यभानु ॥433॥ जैसें अकाळीं आभाळ । अळुमाळु सपातळ । विपायें आलें केवळ । वसे ना वर्षे ॥434॥ तैसीं दोन्ही दुरावलीं । जे प्राप्ति तव अलग ठेली । आणि अप्राप्तिही सांडवली । श्रद्धा तया ॥435॥ ऐसा वोलांतरला काजीं । जो श्रद्धेचांचि समाजीं । बुडाला तया हो जी । कवण गति ॥436॥
श्रीभगवानुवाच –
पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते । न हि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति ॥40॥
तंव कृष्ण म्हणती पार्था । जया मोक्षसुखीं आस्था । तया मोक्षावांचुनि अन्यथा । गति आहे गा ॥437॥ परि एतुलेंचि एक घडे । जें माझारीं विसवावें पडे । तेंही परि ऐसेनि सुरवाडें । जो देवां नाहीं ॥438॥ एऱ्हवी अभ्यासाचां उचलतां । पाउलीं जरी चालतां । तरी दिवसाआधीं ठाकिता । सोऽहंसिद्धीतें ॥439॥ परि तेतुला वेगु नव्हेचि । म्हणऊनि विसांवा तरी निकाचि । पाठीं मोक्षु तंव तैसाचि । ठेविला असे ॥440॥
हेही वाचा – Dnyaneshwari : हें मन कैसें केवढें, ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडें…
अर्थ
कृष्णा, ह्या सार्या जन्मात तुझ्या प्रसादाच्या योगाने आता सांप्रत आम्हालाही योगाची ओळख झाली. ॥429॥
अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, मनुष्य श्रद्धेने युक्त असला, पण त्याचे मन (काही कालाने) योगापासून चलित झाल्याने त्याचा प्रयत्न सुटला आणि (त्या कारणाने) त्याला योगसिद्धी प्राप्त झाली नाही तर, तो कोणत्या गतीला जातो? ॥37॥
हे श्रीकृष्णा, (इंद्रियसुख आणि मोक्ष) या दोहोंपासून भ्रष्ट झालेला तो ब्रह्मप्राप्तीच्या मार्गामध्ये आधारहीन आणि मतिहीन झालेला, इतर ढगांपासून वेगळ्या झालेल्या ढगाप्रमाणे नाश पावत नाही ना? ॥38॥
हे कृष्णा ही माझी शंका पूर्णतेने नाहीशी करण्याला तू समर्थ आहेस. ही शंका नष्ट करण्यास तुझ्याखेरीज दुसरा कोणीही समर्थ आढळत नाही. ॥39॥
परंतु महाराज, मला आणखी एक शंका आलेली आहे, ती दूर करण्यास तुझ्यावाचून कोणी समर्थ नाही. ॥430॥ म्हणून देवा सांगा, कोणी एक योग्य परिश्रम केल्याशिवाय केवळ श्रद्धेच्या जोरावर मोक्षपदाला काबीज करावयास पाहात होता; ॥431॥ पुढले गाव जे आत्मसिद्धी, त्या गावाला येण्याकरिता तो इंद्रियरूपी गावाहून निघून आस्थेच्या वाटेला लागला. ॥432॥ (पण) तो आत्मसिद्धीच्या गावाला पोहोचला नाही आणि त्यास परतही येववत नाही, असा मधेच असताना त्याचा आयुष्यरूपी सूर्य अस्ताला गेला, ॥433॥ भलत्यावेळी विरळ असे थोडे नुसते चुकून ढग आले तर, ते टिकत नाहीत आणि वर्षावही करीत नाहीत. ॥434॥ त्याप्रमाणे विषयासक्तता आणि मोक्ष ही दोन्ही त्यास दूर राहिली, अशी की, आत्मसिद्धीची प्राप्ती तर दूरच राहिली आणि दुसरे, आपल्यास आत्मप्राप्ती होणार नाही, अशी आशाही त्याला श्रद्धा असल्यामुळे सोडता येत नाही. ॥435॥ याप्रमाणे जो पुरुष उशिरामुळे फसला आणि जो आत्मप्राप्तीविषयी पूर्ण श्रद्धा असताना मरण पावला, त्याला अहो महाराज, कोणती गती प्राप्त होते? ते सांगा. ॥436॥
श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, इहलोकी अथवा परलोकी (कोठेही) त्याचा नाश होत नाही. कारण, बाबा, शुभकर्म करणारा कोणीही दुर्गतीला जात नाही. ॥40॥
तेव्हा कृष्ण म्हणाले, अर्जुना, ज्याला मोक्षसुखाची उत्कट इच्छा आहे, त्याला मोक्षाशिवाय दुसरी गती आहे काय ? ॥437॥ पण एवढेच एक होते की, मधे विसावा घ्यावा लागतो; पण ते विसावा घेणेही असे सुखकर असते की, जे इंद्रादि देवांनाही प्राप्त होत नाही. ॥438॥ वास्तविक अभ्यासाच्या जलद पावलाने जर तो चालता, तर मरणकाळापूर्वीच ब्रह्मसिद्धीस येऊन मिळता ॥439॥ पण तितक्या वेगाने अभ्यास न झाल्यामुळे विसावा घेणे भागच पडते, पण नंतर मोक्ष त्याच्याकरिता ठेवलेलाच आहे. ॥440॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : आंगी योगाचें होय बळ, तरी मन केतुलें चपळ…


