वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः । शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥41॥
ऐकें कवतिक हें कैसें । शतमखा लोक सायासें । तें तो पावे अनायासें । कैवल्यकामु ॥441॥ मग तेथिंचे जे अमोघ । अलौकिक भोग । भोगितांही सांग । कांटाळे मग ॥442॥ हा अंतरायो अवचितां । कां वोढवला भगवंता । दिविभोग भोगितां । अनुतापी नित्य ॥443॥ पाठीं जन्मे संसारी । परी सकळ धर्माचिया माहेरीं । लांबा उगवे आगरीं । विभवश्रियेचां ॥444॥ जयातें नीतिपंथे चालिजे । सत्यधूत बोलिजे । देखावें तें देखिजे । शास्त्रदृष्टी ॥445॥ वेद तो जागेश्वरु । जया व्यवसाय निजाचारु । सारासारविचारु । मंत्री जयातें ॥446॥ जयाचां कुळीं चिंता । जाली ईश्वराची पतिव्रता । जयातें गृहदेवता । आदि ऋद्धि ॥447॥ ऐसी निजपुण्याचिया जोडी । वाढिन्नली सर्वसुखाची कुळवाडी । तिये जन्मे तो सुरवाडी । योगुच्युतु ॥448॥
अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् । एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम् ॥42॥
तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् । यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥43॥
अथवा ज्ञानाग्निहोत्री । जे परब्रह्मण्य श्रोत्री । महासुखक्षेत्रीं । आदिवंत ॥449॥ जे सिद्धांताचां सिंहासनीं । राज्य करिती त्रिभुवनीं । जे कूंजते कोकिल वनीं । संतोषाचां ॥450॥ जे विवेकग्रामींचां मुळीं । बैसले आहाति नित्य फळीं । तया योगियांचां कुळीं । जन्म पावे ॥451॥
हेही वाचा – शिक्षण सेवक… खेडेगावात काय किंमत?
अर्थ
तो योगभ्रष्ट पुण्यकर्म करणाऱ्यांच्या लोकाला जाऊन, (तेथे) पुष्कळ वर्षे वास केल्यावर शुद्धाचरणी आणि धनवान अशा कुळामधे तो योगभ्रष्ट जन्म पावतो. ॥41॥
ऐक, कसा चमत्कार होतो तो! शंभर यज्ञ करणार्यास कष्टाने जी स्थिती प्राप्त होते, ती त्या मोक्षाची इच्छा करणारास श्रमावाचून मिळते. ॥441॥ मग त्या ठिकाणाचे जे दिव्य आणि फलदायी भोग ते यथास्थित भोगीत असताही त्याच्या मनास कंटाळा येतो. ॥442॥ देवा, हे विघ्न मधेच का आले आले? असा स्वर्गातील भोग भोगीत असता तो सारखा पश्चात्ताप करीत असतो. ॥443॥ नंतर तो मनुष्यलोकात जन्मतो, पण सर्वधर्मांचे वसतिस्थान आणि वैभवरूप लक्ष्मीचे जे कुलरूपी शेत, त्यामध्ये तो भातगोट्याचे रोपाप्रमाणे वाढतो. ॥444॥ जे कुल नीतीच्या मार्गाने चालते, सत्याने पवित्र झालेले बोलते आणि जे पाहाणे असेल ते शास्त्रदृष्टीने पाहाते ॥445॥ ज्या कुळात वेद हे जागृत दैवत आहे, शास्त्रविहित आचरण हाच ज्याचा व्यापार आहे आणि सारासार विचार हाच ज्याचा सल्लामसलत देणारा प्रधान आहे ॥446॥ ज्या कुळामध्ये चिंता ईश्वराचीच एकनिष्ठ पत्नी झालेली असते आणि ऋद्ध्यादिक या ज्याच्या घरातील देवता आहेत ॥447॥ अशा रीतीने ज्या कुळात आपल्या पुण्याईच्या कमाईने सर्व सुखाचा व्यापार वाढला आहे, त्या कुळात तो योगभ्रष्ट सुखाने जन्म घेतो. ॥448॥
अथवा बुद्धिमान अशा योगी लोकांच्याच कुळामध्ये तो जन्म पावतो. अशा तर्हेचा हा जन्म या जगामध्ये फार दुर्लभ आहे. ॥42॥
कुरुनंदना, त्या ठिकाणी पूर्वजन्मीच्या संस्काराने युक्त असलेल्या बुद्धीचा योग होतो. त्यापुढे तो पुन्हा (पूर्ण) योगसिद्धीसाठी प्रयत्न करतो. ॥43॥
अथवा जे अग्नीमध्ये हवन करतात आणि जे ब्रह्मनिष्ठ तसेच वेदसंपन्न असतात आणि जे ब्रह्मसुखरुपी शेताचे मिरासदार असतात, ॥449॥ जे (एकमेवाद्वितीयं ब्रह्म या) सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रैलोक्यात राज्य करतात आणि जे संतोषाच्या वनात शब्द करणारे कोकीळ आहेत; ॥450॥ जे विवेकरूप गावाच्या मुख्य ठिकाणी असलेल्या ब्रह्मरूप फळाचे नित्य सेवन करीत राहिले आहेत, त्या योग्यांच्या कुळात त्यास जन्म मिळतो. ॥451॥
क्रमश:
हेही वाचा – मानसशास्त्रज्ञ ते जाहिरात क्षेत्रातील जादूगार!


