वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
जया भजता भजन भजावें । हे भक्तिसाधन जें आघवें । ते मीचि जाहलों अनुभवें । अखंडित ॥483॥ मग तया आम्हां प्रीतीचें । स्वरुप बोली निर्वचे । ऐसें नव्हे गा तो साचें । सुभद्रापती ॥484॥ तया एकवटलिया प्रेमा । जरी पाडें पाहिजे उपमा । तरी मी देह तो आत्मा । हेचि होय ॥485॥ ऐसें भक्तचकोरचंद्रें । तेथ त्रिभुवनैकनरेंद्रें । बोलिलें गुणसमुद्रें । संजयो म्हणे ॥486॥ तेथ आदिलापासूनि पार्था । ऐकिजे ऐसीचि अवस्था । दुणावली हें यदुनाथा । पावों सरले ॥487॥ कीं सावियाचि मनीं तोषला । जे बोला आरिसा जोडला । तेणें हरिखें आतां उपलवला । निरुपील ॥488॥ तो प्रसंगु आहे पुढां । जेथ शांतु दिसे उघडा । तो पालविजेल मुडा । प्रमेयबीजांचा ॥489॥ जे सात्विकाचेनि वडपें । गेलें आध्यात्मिक खरपें । सहजें निरोळले वाफे । चतुरचित्ताचे ॥490॥ वरी अवधानाचा वाफसा । लाधला सोनयाऐसा । म्हणोनि पेरावया धिंवसा । निवृतीसी ॥491॥ ज्ञानदेव म्हणे मी चाडें । सद्गुरुंनी केला कोडें । माथां हात ठेविला तें फुडें । बीजचि वाइलें ॥492॥ म्हणऊनि येणे मुखें जें निगे । तें संतांचां हृदयीं साचचि लागे । हें असो सांगें श्रीरंगे । बोलिले जें ॥493॥ परी ते मनाचा कानी ऐकावें । बोल बुद्धीचां डोळां देखावे । हे सांटोवाटीं घ्यावे । चित्ताचिया ॥494॥ अवधानाचेनि हातें । नेयावे हृदयाआंतौते । हे रिझवितील आयणीतें । सज्जनांचिये ॥495॥ हे स्वहितातें निवविती । परिणामातें जीवविती । सुखाची वाहविती । लाखोली जीवा ॥496॥ आतां अर्जुनेंसी मुकुंदें । नागर बोलिजेल विनोदें । तें वोंवियेचेनि प्रबंधें । सांगेन मी ॥497॥
॥ सहावा अध्याय समाप्त ॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तेथ मनाचें मेहुडें विरे, पवनाचें पवनपण सरे…
अर्थ
ज्या पुरुषाला भजन करणारा, भजन आणि भज्य अशी भक्तिसाधनांची जी त्रिपुटी, ती सर्व अनुभवाने सदोदित मद्रूपच आहे. ॥483॥ मग अर्जुना, त्याच्या आमच्या प्रेमाचे स्वरूप शब्दाने सांगता येईल, अर्जुना, असा तो खरोखर नाही. ॥484॥ त्या ऐक्यभावाच्या प्रेमाला जर योग्य उपमा हवी असेल तर, मी देह आणि तो आत्मा, ही होय. ॥485॥ याप्रमाणे तेथे भक्तरूपी चकोरांचे चंद्र, त्रैलोक्याचे एकमेव राजे आणि गुणांचे समुद्र, असे जे श्रीकृष्णपरमात्मा, ते बोलले, असे संजय म्हणाला. ॥486॥ तेथे भगवंतांचे बोलणे ऐकावे, अशी जी अर्जुनाला तीव्र इच्छा झाली होती, ती पहिल्यापेक्षा दुप्पट झाली, असे भगवंतांना कळून चुकले. ॥487॥ त्यामुळे त्यांच्या मनात सहजच संतोष उत्पन्न झाला. कारण, त्यांच्या बोलण्याचे यथार्थ ग्रहण करणारा अर्जुनरूपी आरसा त्याला प्राप्त झाला होता. त्या आनंदाच्या योगाने अंत:करण प्रफुल्लित झालेला श्रीकृष्ण आता सविस्तर निरुपण करतील. ॥488॥ तो प्रसंग पुढे आहे. जेथे शांत रस स्पष्ट दिसेल, असे जे प्रतिपाद्य विषयरूपी बीजाचे साठवण, ते (मोकळे करून) विस्तृत तर्हेने श्रोत्यांच्या मनात पेरण्यात येईल. ॥489॥ कारण की, सत्वगुणाच्या दृष्टीने मानसिक तापरूपी डिखळे विरघळून, योग्य चित्ताचे वाफे सहज तयार झाले. ॥490॥ आणखी सोन्यासारखा अवधानरूपी वाफसा मिळाला; म्हणून श्रीनिवृत्तिनाथांस पेरण्याची इच्छा झाली. ॥491॥ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सद्गुरूंनी कौतुकाने मला चाडे केले आणि माझ्या मस्तकावर जो हात ठेवला, ते उघड उघड बीजच घातले. ॥492॥ म्हणून या माझ्या मुखातून जे निघेल ते संतांच्या मनाला खरोखर पटेल. श्रोते म्हणतात, हे रूपक राहू दे. श्रीकृष्णपरमात्मा जे काही म्हणाले, ते तू सांग. ॥493॥ (असे म्हटल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी सांगतो…) पण ते मनाच्या कानाने ऐकले पाहिजे. माझे शब्द बुद्धीच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजेत. हे माझे शब्द चित्त देऊन त्याच्या मोबदला घेतले पाहिजेत. ॥494॥ हे शब्द अवधानाच्या द्वारा मनाच्या आत घ्यावेत. हे शब्द सज्जनांच्या बुद्धीला समाधान देतील. ॥495॥ हे शब्द आत्महिताला स्थिर करतील. पूर्ण अवस्थेला जगवितील आणि जीवाला सुखाची लाखोली वाहवतील. ॥496॥ आता अर्जुनाशी श्रीकृष्ण चांगले कौतुकाने बोलतील, ते त्यांचे बोलणे मी ओवी छंदाने सांगेन. ॥497॥
॥ सहावा अध्याय समाप्त ॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : अगा योगी जो म्हणिजे, तो देवांचा देव जाणिजे…


