Monday, March 2, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : अगा योगी जो म्हणिजे, तो देवांचा देव जाणिजे…

Dnyaneshwari : अगा योगी जो म्हणिजे, तो देवांचा देव जाणिजे…

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.

अध्याय सहावा

तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः । कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन ॥46॥

जया लाभाचिया आशा । करूनि धैर्यबाहूंचा भरंवसा । घालीत षट्कर्मांचा धारसा । कर्मनिष्ठ ॥474॥ कां जिये एकी वस्तूलांगीं । बाणोनि ज्ञानाची वज्रांगी । झुंजत प्रपंचेंशीं समरंगीं । ज्ञानिये गा ॥475॥ अथवा निलागें निसरडा । तपोदुर्गाचा आडकडा । झोंबती तपिये चाडा । जयाचिया ॥476॥ जें भजतियांसी भज्य । याज्ञिकांचे याज्य । एवं जें पूज्य । सकळां सदा ॥477॥ तेंचि तो आपण । स्वयें जाहला निर्वाण । जें साधकांचें कारण । सिद्ध तत्त्व ॥478॥ म्हणोनि कर्मनिष्ठां वंद्यु । तो ज्ञानियांसि वेद्यु । तापसांचा आद्यु । तपोनाथु ॥479॥ पैं जीवपरमात्मसंगमा । जयाचें येणें जाहलें मनोधर्मा । तो शरीरीचि परी महिमा । ऐसी पावे ॥480॥ म्हणोनि याकारणें । तूंतें मी सदा म्हणें । योगी होय अंतःकरणें । पंडुकुमरा ॥481॥

योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना । श्रद्धावान् भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥47॥

अगा योगी जो म्हणिजे । तो देवांचा देव जाणिजे । आणि सुखसर्वस्व माझें । चैतन्य तो ॥482॥

हेही वाचा – Dnyaneshwari :  ऐसें जें जन्म, जयालागीं देव सकाम…

अर्थ

तपी, ज्ञानी आणि कर्मी ह्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे, असे माझे मत आहे. म्हणून हे अर्जुना तू योगी हो. ॥46॥

ज्या वस्तूच्या प्राप्तीच्या आशेने, धैर्यरूपी बाहूंचा विश्वास धरून, कर्मनिष्ठ लोक षट्कर्मांच्या प्रवाहामध्ये उडी टाकतात ॥474॥ अथवा ज्या एका वस्तूकरिता ज्ञानी लोक ज्ञानाचे चिलखत अंगात घालून समरांगणामध्ये संसाराशी लढतात ॥475॥ अथवा तपी लोक ज्या स्वरूपप्राप्तीच्या इच्छेने तपरूपी तुटलेल्या निराधार आणि निसरड्या कड्यावर चढण्याचा प्रयत्न करतात ॥476॥ जे स्वरूप भजन करणार्‍या लोकांचा भजनाचा विषय आहे, जे स्वरूप यज्ञ करणार्‍या लोकांच्या यज्ञाचा विषय आहे, याप्रमाणे जे स्वरूप सर्वांना सर्वकाळी पूज्य आहे, ॥477॥ जे स्वरूप शेवटची गती आहे, साधकांचे साध्य आहे आणि जे एकच सिद्धतत्व आहे, ते स्वरूप तो योगी आपण स्वत: झाला. ॥478॥ म्हणून तो पुरुष कर्मनिष्ठांना पूज्य आहे. ज्ञानी पुरुषास जाणण्यास तो योग्य आहे आणि तपस्वी लोकांमध्ये तो मूळ तपोनाथ आहे. ॥479॥ जीव परमात्म्याच्या ऐक्याच्या ठिकाणी ज्याच्या मनाच्या वृत्तीचे येणे झाले, तो जरी देहधारी असला तरी त्याला असला महिमा प्राप्त होतो. ॥480॥ म्हणून याकारणास्तव हे अर्जुना, तू मनाने योगी हो असे मी तुला नेहेमी म्हणतो. ॥481॥

माझ्या ठिकाणी जडलेल्या अंत:करणाने युक्त होऊन (मद्रूप होऊन) जो मनुष्य श्रद्धेने माझी (भजनाची त्रिपुटी मीच होऊन) भक्ती करतो, तो सर्व प्रकारच्या योग्यांपेक्षा श्रेष्ठ प्रकारचा योगी मला वाटतो. ॥47॥

अर्जुना, योगी जो म्हणतात, तो देवांचा देव जाणावा; आणि माझे सुखसर्वस्व आणि माझा आत्मा तो आहे. ॥482॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari :  तेथ मनाचें मेहुडें विरे, पवनाचें पवनपण सरे…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!