वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः । उपविश्यासने युञ्ज्याद् योगमात्मविशुद्धये ॥12॥
मग तेथ आपण । एकाग्र अंतःकरण । करूनि सद्गुरुस्मरण । अनुभविजे ॥186॥ तैसें स्मरतेनि आदरें । सबाह्य सात्विकें भरे । जंव कठिणपण विरे । अहंभावाचें ॥187॥ विषयांचा विसरु पडे । इंद्रियांची कसमस मोडे । मनाची घडी घडे । हृदयामाजीं ॥188॥ ऐसें ऐक्य हें सहजें । फावे तंव राहिजे । मग तेणेंचि बोधें बैसिजे । आसनावरी ॥189॥ आतां आंगाते आंग करी । पवनातें पवनुचि वरी । ऐसी अनुभवाची उजरी । होंचि लागे ॥190॥ प्रवृत्ती माघौति मोहरे । समाधि ऐलाडी उतरे । आघवें अभ्यासूं सरे । बैसतखेवो ॥191॥ मुद्रेची प्रौढी ऐशी । तेचि सांगिजेल आतां परियेसीं । तरी उरु या जघनासी । जडोनि घालीं ॥192॥ चरणतळें देव्हडी । आधारद्रुमाचा बुडीं । सुघटितें गाढीं । संचरीं पां ॥193॥ सव्य तो तळीं ठेविजे । तेणें सिवणीमध्यु पीडिजे । वरी बैसे तो सहजें । वामचरणु ॥194॥ गुदमेंढ्राआंतौतीं । चारी अंगुळें निगुतीं । तेथ सार्ध सार्ध प्रांती । सांडुनियां ॥195॥ माजि अंगुळ एक निगे । तेथ टांचेचेनि उत्तराभागें । नेहेटिजे वरि आंगें । पेललेनि ॥196॥ उचलिले कां नेणिजे । तैसें पृष्ठांत उचलिजे । गुल्फद्वय धरिजे । तेणेंचि मानें ॥197॥ मग शरीरसंचु पार्था । अशेषही सर्वथा । पार्ष्णीचा माथा । स्वयंभु होय ॥198॥ अर्जुना हें जाण । मूळबंधाचें लक्षण । वज्रासन गौण । नाम यासी ॥199॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जया आड जातां पार्था, तपश्चर्या मनोरथा…
अर्थ
त्या ठिकाणी मन एकाग्र करून आसनावर बसलेल्या आणि चित्त तसेच इंद्रिये यांच्या क्रियांचे नियमन केलेल्या, अशा योग्याने अंत:करणाच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास करावा. ॥12॥
मग तेथे आपण एकाग्र अंत:करण करून मनात सद्गुरूचे स्मरण करावे. ॥186॥ त्या स्मरणाच्या आदराने अहंकाराचा कठिणपणा इतका नाहीसा होतो की, तो (स्मरण करणारा) आंतर-बाहेर सात्विक भावांनी व्याप्त होतो. ॥187॥ (त्याला) विषयांचा विसर पडतो, (त्याच्या) इंद्रियांची रग मोडते, अंत:करणाच्या ठिकाणी मनाची स्थिरता होते. ॥188॥ याप्रमाणे ऐक्य प्राप्त होईपर्यंत थांबावे आणि मग त्याच ऐक्यबोधाने आसनावर बसावे. ॥189॥ आता अंगाला अंग आपण होऊन सावरून धरते, वायूला वायूच आपण होऊन आवरून धरतो, याप्रमाणे अनुभवाचा उदय होऊ लागतो. ॥190॥ प्रवृत्ती माघारी फिरते, समाधी अलीकडील तीराला प्राप्त होते (आटोक्यात येते) आणि बसताक्षणीच सर्व अभ्यास संपतो. ॥191॥ मुद्रेची थोरवी अशी आहे, तीच आता सांगतो ऐक. तर पोटर्याला चिकटून मांडी घालावी. ॥192॥ दोन्ही तळपाय वाकडे करून ते आधारचक्राखाली (गुदस्थानावर शिवणीपाशी) चांगले सुस्थिर रहातील असे बळकट बसवावेत. ॥193॥ (पण त्यात) उजव्या पायाची टाच खाली घालावी आणि तिने शिवण दाबावी, म्हणजे उजव्या पायावर स्वाभाविकच डावा पाय बसतो. ॥194॥ गुद आणि शिश्न यामधील बरोबर जी चार बोटे जागा आहे त्यापैकी दीड बोट वर आणि दीड बोट खाली जागा सोडून ॥195॥ मधे जी एक बोटभर जागा रहाते तेथे उजव्या पायाच्या टाचेच्या वरच्या बाजूने आपले आंग वर तोलून घट्ट दाबावे. ॥196॥ उचलला आहे की नाही, हे न कळेल असा तर्हेने पाठीचा खालचा भाग उचलावा आणि त्याच प्रकारे दोन्ही घोटे उचलून धरावेत. ॥197॥ अर्जुना, मग हा सर्व शरीराचा आकार जसा काही अगदी खालच्या पायाच्या टाचेचा वरचा स्वयंभू भागच आहे, असा होऊन जातो. ॥198॥ अर्जुना, हे मूळबंधाचे लक्षण आहे, असे समज; याचेच वज्रासन असे गौण नाव आहे. ॥199॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : …तेथ निगूढ मठ होआवा, कां शिवालय


