अध्याय सातवा
हें रोहिणीचें जळ । तयाचें पाहतां येईजे मूळ । तैं रश्मि नव्हती केवळ । होय तो भानु ॥29॥ तयाचिपरी किरीटी । इया प्रकृति जालिये सृष्टी । जैं उपसंहरूनि कीजेल ठी । तैं मीचि आहें ॥30॥ ऐसें होय दिसे न दिसे । हें मजचि माजिवडे असे । मियां विश्व धरिजे जैसें । सूत्रें मणि ॥31॥ सुवर्णाचे मणी केले । ते सोनियाचां सुतीं वोविले । तैसें म्यां जग धरिलें । सबाह्याभ्यंतरीं ॥32॥
रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः । प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु ॥8॥
पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ । जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ॥9॥
म्हणोनि उदकीं रसु । कां पवनीं जो स्पर्शु । शशिसूर्यीं जो प्रकाशु । तो मीचि जाण ॥33॥ तैसाचि नैसर्गिकु शुद्धु । मी पृथ्वीच्या ठायीं गंधु । गगनीं मी शब्दु । वेदीं प्रणवु ॥34॥ नराचां ठायीं नरत्व । जें अहंभाविये सत्त्व । तें पौरुष मी हें तत्त्व । बोलिजत असे ॥35॥ अग्नि ऐसें आहाच । तेजा नामाचें आहे कवच । तें परौतें केलिया साच । निजतेज तें मी ॥36॥ आणि नानाविध योनीं । जन्मोनि भूतें त्रिभुवनीं । वर्ततें आहाति जीवनीं । आपुलालां ॥37॥ एकें पवनेचि पिती । एकें तृणास्तव जिती । एकें अन्नाधारें राहती । जळें एकें ॥38॥ ऐसें भूतांप्रति आनान । जें प्रकृतिवशें दिसे जीवन । तें आघवाठायीं अभिन्न । मीचि एक ॥39॥
बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् । बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ॥10॥
बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् । धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥11॥
पैं आदिचेनि अवसरें । विरूढे गगनाचेनि अंकुरें । जे अंतीं गिळी अक्षरें । प्रणवपटींचीं ॥40॥ जंव हा विश्वाकार असे । तंव जें विश्वाचिसारखें दिसे । मग महाप्रळयदशे । कैसेंही नव्हे ॥41॥
हेही वाचा – Dnyaneshwari : आतां अज्ञान अवघें हरपे, विज्ञान नि:शेष करपे…
अर्थ
या मृगजळाचे मूळ पाहू गेले असता, ते सूर्यकिरणे नसून केवळ तो सूर्यच आहे. ॥29॥ त्याप्रमाणे अर्जुना, ज्यावेळी (या स्थूलाच्या परिणामाला पावलेल्या परा) प्रकृतीपासून झालेल्या सृष्टीचा उपसंहार होऊन शेवट होतो, त्यावेळी पाहिले असता मीच आहे ॥30॥ याप्रमाणे जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे माझ्यामध्येच आहेत. ज्याप्रमाणे दोरा मण्याला धारण करतो, त्याप्रमाणे मी जगाला धारण करतो. ॥31॥ सोन्याचे मणी करूने ते सोन्याच्या सुतात ओवावेत, त्याप्रमाणे आत-बाहेर जग मीच धरले आहे. ॥32॥
हे कौंतेया, उदकातील रस मी आहे, चंद्र-सूर्यांमधील प्रभा मी आहे, सर्व वेदांमधील ॐकार, आकशातील शब्द आणि पुरुषांमधील पौरुष मी आहे. ॥8॥
पृथ्वीमधील शुद्ध गंध आणि अग्नीमधील तेज मी आहे. प्राणिमात्रांचे जीवन आणि तपस्व्यांचे तप मी आहे. ॥9॥
म्हणून पाण्यामध्ये रस किंवा वार्यामध्ये स्पर्श अथवा चंद्र-सूर्यामध्ये जे तेज आहे, ते मीच आहे, असे समज. ॥33॥ त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावत:च असणारा शुद्ध वास मीच आहे. आकाशाच्या ठिकाणी असणारा शब्द मी आहे आणि वेदांतमधील ॐकार मी आहे. ॥34॥ मनुष्याच्या ठिकाणी अहंपणाचे सारभूत जे पौरुषत्व आहे, तो पराक्रम मी आहे, हे तत्व मी तुला सांगतो. ॥35॥ तेजाला अग्नी अशा नावाचे जे वरवर दिसणारे कवच आहे, ते दूर केल्यावर जे स्वयंद्ध तेज असते ते मी आहे. ॥36॥ आणि त्रैलोक्यामध्ये नानाप्रकारच्या योनीत प्राणी उत्पन्न होऊन आपआपला आहार सेवन करून राहातात. ॥37॥ कित्येक वाराच पितात, कित्येक गवतावर जगतात, कित्येक अन्नावर राहातात आणि कित्येक पाण्याने जगतात. ॥38॥ याप्रमाणे प्राण्यांना ज्याच्या त्याच्या प्रकृतीला अनुसरून असा जो आहार दिसतो, त्या सर्व निरनिराळ्या आहारांच्या ठिकाणी मीच एक अभिन्नत्वाने आहे. ॥39॥
हे पार्था, सर्व प्राण्यांचे शाश्वत असे आदि कारण (ते) मी आहे, असे जाण. बुद्धिमंतांची बुद्धी मी आहे (आणि) तेजस्व्यांचे तेज मी आहे. ॥10॥
काम आणि राग (या दोहोंनी) विरहित असे बलवानांचे बल मी आहे. हे भरतश्रेष्ठा, भूतांच्या ठिकाणी धर्माला अनुसरून असलेला जो काम, तो मी आहे. ॥11॥
जे (आत्मतत्व) सृष्टीच्या उत्पत्तिकाळी आकाशाच्या अंकुराने वाढते आणि जे सृष्टीच्या लयाच्या काळी ॐकाररूपी पटावरील अक्षरांचा ग्रास करते ॥40॥ जोपर्यंत हा विश्वाकार असतो, तोपर्यंत जे विश्वासारखे दिसते, मग महाप्रलयकाळी जे कोणत्याच आकाराचे नसते. ॥41॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : ते सूक्ष्म प्रकृति कोडें, जैं स्थूळाचिया आंगा घडे…


