अध्याय सातवा
परि आणिकांचिये दिठी नावेक । जैसा स्फटिकुचि आभासे उदक । तैसा ज्ञानी नव्हे कौतुक । सांगतां तो ॥113॥ जैसा वारा कां गगनीं विरे । मग वारेपण वेगळें नुरे । तेवि भक्त हे पैज न सरे । जरी ऐक्या आला ॥114॥ जरी पवन हालवूनि पाहिजे । तरी गगनावेगळा देखिजे । एर्हवीं गगन तो सहजें । असे जैसें ॥115॥ तैसें शरीरें हन कर्में । तो भक्त ऐसा गमे । परी अंतरें प्रतीतिधर्मे । मीचि जाहला ॥116॥ आणि ज्ञानाचेनि उजिडलेपणें । मी आत्मा ऐसें तो जाणे । म्हणऊनि मीहि तैसेंचि म्हणें । उचंबळला सांता ॥117॥ हा गां जीवापैलीकडिलिये खुणे । जो पावोनि वावरोंही जाणें । तो देहाचेनि वेगळेपणें । काय वेगळा होय ॥118॥
उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् । आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ॥18॥
म्हणोनि आपुलालिया हिताचेनि लोभें । मज आवडे तोही भक्त झोंबे । परी मीचि करी वालभें । ऐसा ज्ञानिया एकु ॥119॥ पाहें पां दुभतेयाचिया आशा । जगचि धेनूसि करीताहे फांसा । परि दोरेंविण कैसा । वत्साचा बळी ॥120॥ कां जे तनुमनुप्राणें । तें आणिक कांहींचि नेणे । देखे तयातें म्हणे । हे मायाचि कीं माझी ॥121॥ तें येणें मानें अनन्यगती । म्हणूनि धेनूही तैसीचि प्रीती । यालागीं लक्ष्मीपती । बोलिले साच ॥122॥ हें असो मग म्हणितलें । जे कां तुज सांगितले । तेही भक्त भले । पढियंते आम्हां ॥123॥ परि जाणोनियां मातें । जो पाहों विसरला मागौतें । जैसें सागरा येऊनि सरितें । मुरडावें ठेलें ॥124॥ तैसी अंतःकरणकुहरीं उपजली । जयाची प्रतीतिगंगा मज मिनली । तो मी हें काय बोली । फार करूं ॥125॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जयां सद्गुरु तारूं पुढें, जे अनुभवचिये कासे गाढे…
अर्थ
जसा इतरांच्या दृष्टीला स्फटिकच क्षणभर पाण्यासारखा भासतो, तसा इतरांच्या दृष्टीला ज्ञानी (हा त्याच्या भजनपूजनादिक बाह्य क्रियांवरून) माझ्याहून वेगळा दिसतो; पण ज्ञानी हा तसा (माझ्याहून वेगळा) नाही, त्याचे वर्णन करण्यास मोठे कौतुक वाटते. ॥113॥ ज्याप्रमाणे आकाशात वारा विरला, म्हणजे त्याचे वारेपण वेगळे राहात नाही, त्याप्रमाणे ज्ञानी जरी माझ्याशी ऐक्याला पावला तरी त्याची भक्त ही प्रतिज्ञा जात नाही. ॥114॥ जरा वारा हलवून पाहिला तर, तो आकाशाहून भिन्न देखील दिसतो, एरवी तो वारा स्वभावत:च आकाशरूप असतो. ॥115॥ त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष जेव्हा शारीरिक क्रिया (भजनपूजनादि) करतो त्यावेळी तो भक्त आहे असा वाटतो, पण आतील अनुभवाच्या अंगाने तो मद्रूपच झालेला असतो. ॥116॥ आणि ज्ञानाचा उदय झाल्यामुळे तो मला आपला आत्मा समजतो. म्हणून मी आनंदभरित होऊन ज्ञानी हा माझा आत्मा आहे, असे म्हणतो. ॥117॥ अरे अर्जुना, जीवाच्या पलीकडील खुणेच्या ठिकाणी प्राप्त होऊन, जो (भक्तीचा) व्यवहार कसा करावा हे समजतो, तो देहाच्या वेगळेपणाने खरोखर वेगळा होईल काय? ॥118॥
हे सर्वही भक्त उत्कृष्टच आहेत, पण (त्यापैकी) ज्ञानी तर केवळ माझा आत्माच होय, असे मी समजतो. कारण (‘मीच ब्रह्म’ अशा बुद्धीने) माझ्या ठिकाणी स्थिर झालेला तो ज्ञानी अत्यंत श्रेष्ठ प्राप्तव्य जो मी, त्या मलाच प्राप्त झालेला असतो. ॥18॥
म्हणून आपापल्या हिताच्या इच्छेने वाटेल तो भक्त मला झोंबतो, परंतु मीच ज्याच्यावर प्रेम करतो, असा त्यापैकी एक ज्ञानी भक्त होय. ॥119॥ असे पाहा अर्जुना, दुभत्याच्या आशेने लोकच गाईला भाला घालतात, परंतु दोरावाचून वासराचा पाश कसा बळकट आहे ! (की दोरावाचून त्याचा भाग त्याला सहज मिळतो). ॥120॥ याचे कारण एवढेच की ते वासरू शरीराने, मनाने आणि प्राणाने दुसर्या (आपल्या आईखेरीज) कोणासही जाणत नाही. जे त्याला पुढे दिसेल त्याला ‘ही माझी आईच आहे’ असे ते म्हणते. ॥121॥ ते वासरू इतके (गाईच्या ठिकाणी) अनन्यगती असते, म्हणून गाईचीही त्याच्यावर तशीच प्रीती असते. म्हणून श्रीकृष्ण जे वर म्हणाले, ते खरे आहे. (असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात). ॥122॥ नंतर भगवंतांनी म्हटले, हे असो. इतर तीन भक्त जे तुला सांगितले, ते देखील आम्हाला चांगले आवडते आहेत. ॥123॥ परंतु मला जाणून जो ज्ञानी (ज्ञानी भक्त) मागे पाहावयास विसरला (देहेंद्रियादि प्रपंचाला विसरला); ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळाल्यावर माघारी वळत नाही ॥124॥ त्याप्रमाणे अंत:करणरूपी गुहेमध्ये उत्पन्न झालेली, ज्याची अनुभवरूपी गंगा मला मिळाली आहे, तो मी आहे, हे शब्दाने विस्तार करून काय सांगू? ॥125॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : दुःखशोकांचां घाईं, मारिलियाची सेचि नाहीं…


