अध्याय सातवा
साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदु: । प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतस: ॥30॥
जिहीं साधिभूता मातें । प्रतीतीचेनि हातें । धरूनि अधिदैवातें । शिवतलें गा ॥180॥ जया जाणिवेचेनि वेगें । मी अधियज्ञु दृष्टी रिगे । ते तनूचेनि वियोगें । विरहे नव्हती ॥181॥ एर्हवीं आयुष्याचें सूत्र बिघडतां । भूतांची उमटे खडाडता । काय न मरतयाहि चित्ता । युगांतु नोहे ॥182॥ परी नेणों कैसें पैं गा । जे जडोनि गेले माझिया आंगा । ते प्रयाणींचिया लगबगा । न सांडितीच मातें ॥183॥ एर्हवीं तरीं जाण । ऐसे जे निपुण । तेचि अंतःकरण- । युक्त योगी ॥184 ॥ तंव इये शब्दकुपिकेतळीं । नोडवेचि अवधानाची अंजुळी । जे नावेक अर्जुन तये वेळीं । मागांचि होता ॥185॥
हेही वाचा – Dnyaneshwari : येथें भूतें जियें अतीतलीं, तियें मीचि होऊनि ठेलीं…
अर्थ
जे अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ यासह मला जाणतात ते स्वस्थ चित्ताने युक्त असलेले पुरुष, प्रयाणकालीही मला जाणतात ॥30॥
अधिभूतासह (शरीरासह) मला परमात्म्याला अनुभवांच्या द्वारा यथार्थ जाणून, त्यांनी अधिदैवाला (जीवाला) आकलन केले (जाणले) ॥180॥ ज्यास वरील ज्ञानाच्या बळाने अधियज्ञ जो मी, तो अनुभवास येतो, ते पुरुष शरीराच्या वियोगाच्या वेळेला दु:खी होत नाहीत. ॥181॥ सहज विचार करून पाहिले तर, आयुष्याची दोरी तुटली की, (मरणार्या) प्राण्यांची खळबळ उडते. (ती पाहून) न मरणार्यांच्याही चित्ताला प्रलयकाळ ओढावला, असे वाटत नाही काय? ॥182॥ परंतु ज्ञानी पुरुषांच्या बाबतीत कोण जाणे कसे होते ते! ते माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन गेले आहेत, ते अंतकालाच्या गडबडीत मला विसरतच नाहीत! ॥७183॥ सहज विचार करून पाहिले तर, असे जे निपुण आहेत, तेच (माझ्या ठिकाणी) स्थिर अंत:करण झालेले योगी आहेत, असे समज. ॥184॥ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) त्यावेळी श्रीकृष्णाने सांगितलेल्या शब्दरूपी कुपीच्या खाली अर्जुनाची लक्षरूपी ओंजळ प्राप्त झाली नाही; कारण अर्जुन त्यावेळी क्षणभर मागेच होता. (देवाच्या सांगण्याकडे त्याचे लक्ष नव्हते.) ॥185॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसा अध्यात्मलाभ तया, होय गा धनंजया…
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


