अध्याय सातवा
पैं पृथ्वीयेचा घटु कीजे । सवेंचि पृथ्वीसि मिळे तरी मेळविजे । एर्हवीं तोचि अग्निसंगें असिजे । तरी वेगळा होय ॥65॥ तैसें भूतजात सर्व । हे माझेचि कीर अवयव । परि मायायोगें जीव- । दशे आले ॥66॥ म्हणोनि माझेचि मी नव्हती । माझेचि मज नोळखती । अहंममताभ्रांती । विषयांध झाले ॥67॥
दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया । मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥14॥
आतां महदादि हे माझी माया । उतरोनियां धनंजया । मी होईजे हें आया । कैसेनि ये ॥68॥ जिये ब्रह्माचळाचां आधाडां । पहिलिया संकल्पजळाचा उभडा । सवेंचि महाभूतांचा बुडबुडा । साना आला ॥69॥ जे सृष्टिविस्ताराचेनि वोघें । चढत काळकलनेचेनि वेगें । प्रवृत्तिनिवृत्तीचीं तुंगें । तटें सांडी ॥70॥ जे गुणघनाचेनि वृष्टिभरें । भरली मोहाचेनि महापूरें । घेऊनि जात नगरें । यमनियमांचीं ॥71॥ जेथ द्वेषाचां आवर्तीं दाटत । मत्सराचे वळसे पडत । माजीं प्रमादादि तळपत । महामीन ॥72॥ जेथ प्रपंचाचीं वळणें । कर्माकर्मांचीं वोभाणें । वरी तरताती वोसाणें । सुखदुःखांचीं ॥73॥ रतीचिया बेटा । आदळती कामाचिया लाटा । जेथ जीवफेन संघटा । सैंघ दिसे ॥74॥
हेही वाचा – Dnyaneshwari : बळियांमाजीं बळ, तें मी जाणें अढळ…
अर्थ
(जसे) मातीचे मडके करावे आणि ते केल्याबरोबर (कच्च्या स्थितीत) मातीशी मिळवले तर, मातीत मिळून जाते. पण ते मडके भाजले असता, ते मातीशी न मिळता खापररूपाने वेगळे राहाते. ॥65॥ त्याप्रमाणे सर्व प्राणिमात्र हे खरोखर माझेच अवयव आहेत, पण मायेच्या योगाने ते जीवदशेस आले. ॥66॥ म्हणून ते प्राणी माझेच असून मी नाहीत, माझेच असून मला ते ओळखत नाहीत. कारण मी आणि माझेपण या भ्रांतीने ते विषयांध झाले आहेत. ॥67॥
कारण की, ही माझी त्रिगुणात्मिका दैवी माया तरून जाण्यास दुस्तर आहे. जे मलाच शरण येतात ते ही माया तरून जातात. ॥14॥
आता अर्जुना, महत्-तत्वादि जी माझी माया, ती पार उतरून मद्रूप होणे, हे साध्य कसे होईल? ॥68॥ जी मायानदी ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून मूळ संकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर, तिच्यात पंचमहाभूतांचा लहान बुडाबुडा उत्पन्न झाला, ॥69॥ जी सृष्टीच्या विस्ताररूपी ओघाने, काळाच्या ग्रास करणाऱ्या शक्तिरूपाच्या वेगाने वाढून, प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही उंच काठांबाहेर वाहते ॥70॥ जी गुणरूपी मेघांचा जोरदार वर्षाव झाल्याने मोहरूपी महापुराने भरून यमनियमरूपी गावे वाहून नेते, ॥71॥ जी द्वेषरूपी भोवर्याने दाट भरली आहे आणि मत्सररूपी वळणे जिला पडली आहेत आणि जिच्यामध्ये तरुण स्त्रिया वगैरे मोठे मासे चमकत आहेत, ॥72॥ जिच्यामध्ये प्रपंचरूपी वळणे आहेत आणि जिला कर्माकर्मरूपी पूर येत आहे, आणि सुखदु:खरूपी पुराड जिच्यावर तरत आहे, ॥73॥ रतीच्या बेटावर जिच्या कामरूपी लाटा आदळतात आणि जेथे जीवरूपी फेसाचा समुदाय एकसारखा दिसतो. ॥74॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : पैं गगनीं उपजे आभाळ, परि तेथ गगन नाहीं केवळ..


