वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सातवा
श्रीभगवानुवाच – मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः । असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥1॥
ज्ञानं तेऽहं सविज्ञानं इदं वक्ष्याम्यशेषतः । यत् ज्ञात्वा नेह भूयोऽन्यत् ज्ञातव्यमवशिष्यते ॥2॥
आइकां मग तो अनंतु । पार्थातें असे म्हणतु । पै गा तूं योगयुक्तु । जालासि आतां ॥1॥ मज समग्रातें जाणसी ऐसें । आपुलिया तळहातीचें रत्न जैसें । तुज ज्ञान सांगेन तैसें । विज्ञानेंसी ॥2॥ एथ विज्ञानें काय करावें । ऐसें घेसी जरी मनोभावें । तरी पैं आधीं जाणावें । तेंचि लागे ॥3॥ मग ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे डोळे । जैसी तीरीं नाव न ढळे । टेकली सांती ॥4॥ तैसी जाणीव जेथ न रिघे । विचार मागुतां पाउलीं निघे । तर्कु आयणी नेघे । आंगी जयाचां ॥5॥ अर्जुना तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हें विज्ञान । तेथ सत्यबुद्धि तें अज्ञान । हेंही जाण ॥6॥ आतां अज्ञान अवघें हरपे । विज्ञान नि:शेष करपे । आणि ज्ञान तें स्वरूपें । होऊनि जाईजे ॥7॥ ऐसें वर्म जें गूढ । तें कीजेल वाक्यारूढ । जेणें थोडेन पुरे कोड । बहुत मनींचें ॥8॥ जेणें सांगतयाचें बोलणें खुंटे । ऐकतयाचें व्यसन तुटे । हें जाणणें सानें मोठें । उरों नेदी ॥9॥
मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये । यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वत: ॥3॥
पैं गा मनुष्यांचिया सहस्रशां- । माजि विपाइलेयाची येथ धिंवसा । तैसेयां धिंवसेकरां बहुवसां- । माजि विरळा जाणे ॥10॥ जैसा भरलेया त्रिभुवना । आंतु एक एकु चांगु अर्जुना । निवडूनि कीजे सेना । लक्षवरी ॥11॥ कीं तयाहीपाठी । जे वेळीं लोह मांसातें घांटी । ते वेळीं विजयश्रियेचां पाटीं । एकुचि बैसे ॥12॥ तैसे आस्थेचां महापुरीं । रिघताति कोटिवरी । परी प्राप्तीचां पैलतीरीं । विपाइला निगे ॥13॥ म्हणऊनि सामान्य गा नोहे । हें सांगतां वडिल गोठी गा आहे । परी तें बोलों येईल पाहें । आतां प्रस्तुत ऐकें ॥14॥
हेही वाचा – Dnyaneshwari : अगा योगी जो म्हणिजे, तो देवांचा देव जाणिजे…
अर्थ
श्रीकृष्ण म्हणाले – हे पार्था, तुझे मन माझ्या ठिकाणी आसक्त झाले आहे आणि माझा आश्रय करून जो योग तू आचरण करणार आहेस, तो तू कोणत्या प्रकाराने मला पूर्णत्वाने आणि शंका न राहाता जणशील, तो प्रकार ऐक. ॥1॥
प्रपंचज्ञानासह हे (मद्विषयक) ज्ञान मी तुला पूर्णत्वाने सांगतो. हे ज्ञान झाल्यावर या लोकी पुन्हा दुसरे जाणण्याला योग्य असे (ज्ञान) शिल्लक राहात नाही ॥2॥
ऐका, मग ते अर्जुनाला म्हणाले, अरे, तू आता योगाच्या ज्ञानाने युक्त झाला आहेस. ॥1॥ आपल्या तळहातात घेतलेल्या रत्नाप्रमाणे मला संपूर्णाला तू जाणशील, असे प्रपंचज्ञानासह तुला स्वरूपज्ञान सांगतो. ॥2॥ येथे विज्ञानाशी काय करावयाचे आहे? अशी जर तुझी मनापासून समजूत असेल तर, तेच अगोदर समजणे जरूर आहे. ॥3॥ कारण की, स्वरूपज्ञानाच्या वेळी बुद्धीचे डोळे झाकतात. ज्याप्रमाणे होडी नदीच्या तीराला टेकली असता पुढे सरकत नाही ॥4॥ त्याप्रमाणे जेथे बुद्धीचा प्रवेश होत नाही आणि विचार जेथून मागे फिरतो आणि ज्याच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही ॥5॥ अर्जुना, त्याचे नाव ज्ञान होय. त्याहून दुसरा जो प्रपंच, ते विज्ञान आहे आणि प्रपंचाच्या ठिकाणी खरेपणाची जी बुद्धी तिला अज्ञान म्हणतात, हेही तू समज. ॥6॥ आता अज्ञान संपूर्ण नाहीसे होईल आणि प्रपंच पूर्णपणे बाधित होईल, आणि ज्ञान आपण स्वत:च बनून जाऊ. ॥7॥ असे जे गूढ वर्म आहे, ते शब्दांत आणली जाईल आणि त्याच्या थोड्या प्रतिपादनानेच मनाचे पूर्ण समाधान होईल. (म्हणजे मनाचे पूर्ण समाधान होईल). ॥8॥ ज्यामुळे व्याख्यात्याचे प्रतिपादन थांबते आणि ऐकणाराचा ऐकण्याचा छंद नाहीसा होतो, हे ज्ञान लहानमोठा (असा भेद) राहू देत नाही. ॥9॥
सहस्रावधि मनुष्यांमध्ये एखादा (ज्ञानाच्या) सिद्धीसाठी यत्न करतो. (त्या) यत्न करणार्या सिद्ध मनुष्यांमध्ये एखादा मला खर्या प्रकारे जाणतो ॥3॥
अरे अर्जुना, हजारो मनुष्यांमध्ये एखाद्यासच याविषयी इच्छा असते आणि अशा अनेक इच्छा करणार्यांमध्ये स्वरूपज्ञानास एखादाच जाणतो. ॥10॥ ज्याप्रमाणे संपूर्ण त्रैलोक्यात, अर्जुना, एक एक चांगला सैनिक निवडून लक्षावधी सैन्य तयार करतात ॥11॥ असे सैन्य निवडल्यानंतर ज्यावेळी लोखंडाच्या शस्त्रांचे अंगावर घाव होतात, त्या वेळी विजयलक्ष्मीच्या सिंहासनावर एखादाच बसतो. ॥12॥ त्याप्रमाणे स्वरूपज्ञानाच्या इच्छारूपी पुरात कोट्यवधी लोक प्रवेश करतात, पण स्वरूपज्ञानाच्या प्राप्तीच्या पलीकडच्या काठाला (त्यातून) एखादाच निघतो. ॥13॥ म्हणून हे (ज्ञानाचे कथन) सामान्य नाही. सांगावयास गेले असता ही गोष्ट पुढे सांगता येईल. प्रस्तुत तुला (विज्ञानाची गोष्ट) सांगतो ती ऐक. ॥14॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसें भक्तचकोरचंद्रें, तेथ त्रिभुवनैकनरेंद्रें…


