अध्याय सातवा
न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः । माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः ॥15॥
चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन । आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥16॥
जे बहुतां एका अवांतरु । अहंकाराचा भूतसंचारु । जाहला म्हणोनि विसरु । आत्मबोधाचा ॥103॥ ते वेळीं नियमाचें वस्त्र नाठवे । पुढील अधोगतीची लाज नेणवे । आणि करितात जें न करावें । वेदु म्हणे ॥104॥ पाहें पां शरीराचिया गांवा । जयालागीं आले पांडवा । तो कार्यार्थु आघवा । सांडूनियां ॥105॥ इंद्रियग्रामींचां राजबिदीं । अहंममतेचियां जल्पवादीं । विकारांतरांची मांदीं । मेळविताती ॥106॥ दुःखशोकांचां घाईं । मारिलियाची सेचि नाहीं । हे सांगावया कारण काई । जे ग्रासिले माया ॥107॥ म्हणोनि ते मातें चुकले । आइकां चतुर्विध मज भजले । जिहीं आत्महित केलें । वाढतें गा ॥108॥ तो पहिला आर्तु म्हणिजे । दुसरा जिज्ञासु बोलिजे । तिजा अर्थार्थी जाणिजे । ज्ञानिया चौथा ॥109॥
तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते । प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः ॥17॥
तेथ आर्तु तो आर्तीचेनि व्याजें । जिज्ञासु तो जाणावयाचिलागीं भजे । तिजेनि तेणें इच्छिजे । अर्थसिद्धि ॥110॥ मग चौथियाचां ठायीं । कांहींचि करणें नाहीं । म्हणोनि भक्तु एक पाहीं । ज्ञानिया जो ॥111॥ जे तया ज्ञानाचेनि प्रकाशें । फिटलें भेदाभेदांचें कडवसें । मग मीचि जाहला समरसें । आणि भक्तुही तेवींचि ॥112॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तमाचे धारसे वाड, सत्त्वाचें स्थिरपण जाड…
अर्थ
दुष्कर्मी, मूर्ख आणि अधम असे लोक मायेने (त्यांचे) ज्ञान नष्ट झाल्यामुळे आसुरी मार्गाचा अवलंब करतात आणि मला शरण येत नाहीत. ॥15॥
हे अर्जुना चार प्रकारचे पुण्यवान लोक माझी भक्ती करतात. हे भरतश्रेष्ठा (ते चार प्रकार हे) दु:खाने ग्रस्त झालेला, ज्ञानाची इच्छा करणारा, द्रव्याची इच्छा करणारा आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला. ॥16॥
कारण की, वरील साधकांशिवाय बहुतेक इतरांना अहंकारारूपी भूताचा संचार झाल्यामुळे त्य़ांना आत्मज्ञानाची विस्मृती झालेली असते. ॥103॥ त्यावेळी नियमरूप वस्त्राची आठवण त्यांना राहात नाही, पुढे असलेल्या अधोगतीची लाज त्यांना वाटत नाही, आणि वेद ज्या गोष्टी करू नये म्हणतो, त्या गोष्टी ते करतात. ॥104॥ अर्जुना, पाहा! ज्या कार्याकरिता या शरीररूपी गावाला ते आले, तो कार्यभाग सर्व सोडून देऊन ॥105॥ इंद्रियरूपी गावाच्या राजरस्त्यावर ममत्वाच्या आणि माझेपणाच्या बडबडीने, नानाप्रकारच्या विकारांचे समुदाय ते गोळा करतात. ॥106॥ दु:खशोकांच्या घावांनी कितीही मारले तरी, त्यांना त्याची आठवणच राहात नाही. हे सांगावयाचे कारण एवढेच की, असे ते मायेने ग्रासलेले असतात. ॥107॥ म्हणून ते मला चुकले. आता ऐका, दुसरे ज्यांनी आपले आत्महित वाढते केले, ते मला चार प्रकारांनी भजले. ॥108॥ त्यातील जो पहिला, त्याला आर्त (दु:खपीडित) म्हणावे. दुसर्याला जिज्ञासू या नावाने ओळखावे. आणि तिसरा अर्थार्थी (द्रव्याची इच्छा करणारा) आणि चौथा तो ज्ञानी होय, असे समजावे. ॥109॥
यामध्ये नित्य आणि (माझ्याशी) अनन्य (होऊन) भक्ती करणारा ज्ञानी श्रेष्ठ होय. कारण ज्ञानी मनुष्याला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो माझ अत्यंत प्रिय आहे. ॥17॥
त्यात जो आर्त आहे, तो पीडेच्या निमित्ताने भक्ती करतो, आणि जो जिज्ञासू आहे तो जाणण्याकरिताच भक्ती करतो आणि त्यातील तिसरा जो आहे, तो अर्थप्राप्तीची इच्छा करतो. ॥110॥ मग राहिलेल्या चौथ्याच्या ठिकाणी काही कर्तव्य उरलेले नसते, म्हणून अर्जुना, जो ज्ञानी आहे तोच एक भक्त आहे, असे समज. ॥111॥ कारण की, ज्ञानाच्या प्रकाशाने त्याच्या ठिकाणचा द्वैताद्वैतरूपी अंधार नाहीसा होतो. नंतर ब्रह्मैक्यभावाने तो मद्रूप होतो आणि मद्रूप होऊन सुद्धा तो माझा भक्त असतोच. ॥112॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जयां सद्गुरु तारूं पुढें, जे अनुभवचिये कासे गाढे…


