अध्याय सातवा
एर्हवीं मी नसें ऐसें । कांहीं वस्तुजात असे । पाहें पां कवण जळ रसें- । रहित आहे ॥159॥ पवन कवणातें न शिवेचि । आकाश कें न समायेचि । हें असो एक मीचि । विश्वीं असें ॥160॥
वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन । भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥26॥
येथें भूतें जियें अतीतलीं । तियें मीचि होऊनि ठेलीं । आणि वर्तत आहाति जेतुलीं । तींही मीचि ॥161॥ भविष्यमाणें जियें ही । तींही मजवेगळीं नाहीं । हा बोलचि एर्हवीं कांहीं । होय ना जाय ॥162॥ दोराचिया सापासी । डोंबा बडी ना गव्हाळा ऐसी । संख्या न करवे कोण्हासी । तेवीं भूतांसि मिथ्यत्वें ॥163॥ ऐसा मी पंडुसुता । अनुस्यूत सदा असतां । यां संसार जो भूतां । तो आनें बोलें ॥164॥ आतां थोडी ऐसी । गोठी सांगिजेल परियेसीं । जै अहंकारतनूंसीं । वालभ पडिलें ॥165॥
इच्छाद्वेषसमुत्थेन द्वंद्वमोहेन भारत । सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप ॥27॥
तै इच्छा हे कुमारी जाली । मग ते कामाचिया तारुण्या आली । तेथ द्वेषेंसीं मांडिली । वराडिक ॥166॥ तया दोघांस्तव जन्मला । ऐसा द्वंद्वमोह जाला । मग तो आजेयानें वाढविला । अहंकारें ॥167॥ जो धृतीसि सदां प्रतिकूळु । नियमाही नागवे सळु । आशारसें दोंदिलु । जाला सांता ॥168॥
हेही वाचा – Dnyaneshwari : पैं जो जिये देवतांतरीं, भजावयाची चाड करी…
अर्थ
सहज विचार करून पाहिले तर, ज्यामध्ये मी नाही असा काही पदार्थमात्र आहे काय? असे पाहा की, रसाशिवाय पाणी कोठे आहे काय? ॥159॥ वारा कोणाला शिवत नाही? आकाश कोठे व्यापीत नाही? हे बोलणे राहू दे, मीच एक सगळ्या विश्वाला व्यापून आहे ॥160॥
हे अर्जुना, मागे झालेल्या, सध्या असलेल्या आणि पुढे होणार्या सर्व प्राण्यांना मी जाणतो, पण मला कोणी जाणत नाही. ॥26॥
या जगात जितके प्राणी होऊन गेले, तितके ते मीच होऊन राहिले आणि हल्ली जितके प्राणी हयात आहेत, तेही मीच आहेत. ॥161॥ पुढे जे प्राणी होणार आहेत, तेही माझ्याहून निराळे नाहीत. हे सर्व फक्त बोलावयाचेच. वास्तविक काही होत नाही आणि जात नाही. ॥162॥ दोरीवर भासणारा साप कोणत्या जातीचा आहे, म्हणजे डोंबा (काळा) आहे की, बडी (कवड्या) आहे, का गव्हाळा (गव्हासारख्या ठिपक्यांचा) आहे, असा कोणताही निश्चय करता येत नाही. त्याप्रमाणे प्राण्यासंबंधी निश्चय करता येत नाही; कारण प्राणी मिथ्या आहेत. ॥163॥ अर्जुना, याप्रमाणे मी सदा अखंडित असताना, या प्राण्यांच्या मागे जन्ममरणरूपी संसार लागला आहे, तो वेगळ्या प्रकाराने. ॥164॥ (त्यासंबंधी) आता थोडीशी गोष्ट सांगतो ऐक. जेव्हा अहंकार आणि देह यांचे एकमेकांवर प्रेम जडले, ॥165॥
हे शत्रुतापना, भारता, इच्छा आणि द्वेष यापासून उत्पन्न झालेल्या (सुखदु:खादी) द्वंद्वरूपी मोहाच्या योगाने (या सृष्टीमध्ये) जन्माला येत्या वेळीच सर्व प्राणी मोह पावतात. ॥27॥
तेव्हा त्यांना इच्छा ही मुलगी झाली, नंतर ती इच्छा कामरूपी तारुण्याला आली; त्यावेळी तिचे द्वेषाशी लग्न लावले. ॥166॥ त्या दोघांपासून द्वंद्वमोह जन्मला, मग त्याचा आजा जो अहंकार त्याने त्याला वाढविले. ॥167॥ तो द्वंद्वमोह सात्विक धैर्याला नेहेमी प्रतिकूल असतो आणि आशारूपी रसाने पुष्ट झाला असता, तो छळणारा द्वंद्वमोह विषयांना जुमानीत नाही. ॥168॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : येर तनुमनप्राणीं, जे निरंतर माझेयाचि वाहणीं…


