अध्याय सातवा
ऐसें अनादि जें सहज । तें मी गा विश्वबीज । हें हातातळीं तुज । देइजत असे ॥42॥ मग उघड करूनि पांडवा । जैं हे आणिसील सांख्याचिया गांवा । तैं तयाचा उपेगु बरवा । देखशील ॥43॥ परी हे अप्रासंगिक आलाप । आतां असतु न बोलों संक्षेप । जाण तपियांचां ठायीं तप । तें स्वरूप माझें ॥44॥ बळियांमाजीं बळ । तें मी जाणें अढळ । बुद्धिमंतीं केवळ । बुद्धि ते मी ॥45॥ भूतांचां ठायीं कामु । तो मी म्हणे आत्मारामु । जेणें अर्थास्तव धर्मु । थोरु होय ॥46॥ एर्हवीं विकाराचेनि पैसें । करी कीर इंद्रियांचेयाचि ऐसें । परी धर्मासि वेखासें । जावों नेदी ॥47॥ जे अप्रवृत्तीचा अव्हांटा । सांडूनि विधीचिया निघे वाटा । तेवींचि नियमाचा दिवटा । सवें चाले ॥48॥ कामु ऐशिया वोजा प्रवर्ते । म्हणोनि धर्मासि होय पुरतें । मोक्षतीर्थींचें मुक्तें । संसारु भोगी ॥49॥ जो श्रुतिगौरवाचां मांडवीं । काम सृष्टीचा वेलु वाढवी । जंव कर्मफळेंसि पालवी । अपवर्गीं टेके ॥50॥ ऐसा नियुत कां कंदर्पु । जो भूतां या बीजरूपु । तो मी म्हणे बापु । योगियांचा ॥51॥ हें एकैक किती सांगावें । आतां वस्तुजातचि आघवें । मजपासूनि जाणावें । विकारलें असे ॥52॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ते सूक्ष्म प्रकृति कोडें, जैं स्थूळाचिया आंगा घडे…
अर्थ
असे जे स्वभावत: अनादि विश्वाचे बीज, ते मी आहे, हे मी तुला तळहातात देतो (स्पष्ट सांगतो). ॥42॥ नंतर हे चांगले नीट समजून घेऊन जेव्हा तू हे विचाराच्या गावाकडे आणशील (म्हणजे याचा विचार करशील), तेव्हा याचा उपयोग तुला चांगला दिसून येईल. ॥43॥ परंतु हे विषयाला सोडून बोलणे राहू दे, ते मी आता बोलत नही. (आता माझ्या विभूतीसंबंधाने) थोडक्यात सांगतो. तपस्वी लोकांच्या ठिकाणी तप ही माझी विभूती आहे, असे समज. ॥44॥ बलवान लोकांमध्ये जे अढळ बल आहे, ती माझीच विभूति आहे आणि बुद्धिवानांच्या ठिकाणी जी बुद्धी म्हणून आहे, ती माझीच विभूती आहे. ॥45॥ ज्या कामाच्या योगाने धर्माचा उत्कर्ष होतो, असा प्राणिमात्रांच्या ठिकाणी असणारा जो काम, तो मी आहे, असे आत्माराम (श्रीकृष्ण) म्हणाले. ॥46॥ एऱ्हवी विकारांच्या फैलावाने इंद्रियांसच अनुकूल अशी कर्मे (तो काम) खरोखर करतो, परंतु ती कर्मे धर्मास विरुद्ध जाऊ देत नाही. ॥47॥ कारण की, (जो काम) शास्त्रनिषिद्ध कर्माची आडवाट सोडून शास्त्रविहित कर्माच्या राजमार्गाने निघतो आणि त्याचप्रमाणे विधीच्या मार्गाने तो जात असताना त्याच्याबरोबर नियमरूपी मशालजी चालतो ॥48॥ अशा रीतीने काम चालतो म्हणून धर्माची पूर्तता होते. मग तो काम संसार भोगतो म्हणजे मोक्षतीर्थातील जणूकाय मोतीच भोगतो. ॥49॥ जो काम वेदाच्या मोठेपणाच्या मांडवावर (कर्म) सृष्टीरूप वेल, कर्मफलासह त्याची पाने मोक्षाला जाऊन भिडेपर्यंत वाढवतो. (म्हणजे जो वेदांनी गौरव केलेल्या कर्माचे आचरण मोक्षप्राप्ती होईपर्यंत करवितो) ॥50॥ असा नियम केलेला आणि प्राणिमात्रांच्या उत्पत्तीस कारण असणारा जो काम, तो मी आहे, असे योग्यांचा श्रेष्ठ पुरुष, श्रीकृष्ण म्हणाले. ॥51॥ हे वेगळे वेगळे किती सांगावे ? आता जेवढे म्हणून पदार्थ आहेत, तेवढे सर्व माझ्यापासूनच आकाराला आलेले आहेत, असे समज. ॥52॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : अग्नि ऐसें आहाच, तेजा नामाचें आहे कवच…


