अध्याय सातवा
ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्च ये । मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि ॥12॥
जे सात्त्विक हन भाव । कां रजतमादि सर्व । ते ममरूपसंभव । वोळख तूं ॥53॥ हें जाले तरी माझां ठायीं । परी ययामाजीं मी नाहीं । जैसी स्वप्नींचां डोहीं । जागृति न बुडे ॥54॥ नातरी रसाचीचि सुघट । जैशी बीजकणिका तरी घनवट । परी तियेस्तव होय काष्ठ । अंकुरद्वारें ॥55॥ मग तया काष्ठाचां ठायीं । सांग पां बीजपण असे काई । तैसा मी विकारीं नाहीं । जरी विकारला दिसें ॥56॥ पैं गगनीं उपजे आभाळ । परि तेथ गगन नाहीं केवळ । अथवा आभाळीं होय सलिल । तेथ अभ्र नाहीं ॥57॥ मग त्या उदकाचेनि आवेशें । प्रगटलें तेज जें लखलखीत दिसे । तिये विजूमाजीं असे । सलिल कायी ॥58॥ सांगें अग्नीस्तव धूम होये । तिये धूमीं काय अग्नि आहे । तैसा विकारु हा मी नोहें । जरी विकारला असे ॥59॥
त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् । मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् ॥13॥
परी उदकीं झाली बाबुळी । ते उदकातें जैसी झांकोळी । कां वायांचि आभाळीं । आकाश लोपे ॥60॥ हां गा स्वप्न हें लटिकें म्हणों ये । वरि निद्रावशें बाणलें होये । तंव आठवु काय देत आहे । आपणपेयां ॥61॥ हें असो डोळ्यांचें । डोळांचि पडळ रचे । तेणें देखणेपण डोळ्यांचें । न गिळिजे कायि ॥62॥ तैसी हे माझीच बिंबली । त्रिगुणात्मक साउली । कीं मजचि आड वोडवली । जवनिका जैसी ॥63॥ म्हणऊनि भूतें मातें नेणती । माझींच परी मी नव्हती । जैसी जळींचीं जळीं न विरती । मुक्ताफळें ॥64॥
हेही वाचा – Dnyaneshwari : अग्नि ऐसें आहाच, तेजा नामाचें आहे कवच…
अर्थ
आणि सात्विक, राजस, तामस म्हणून जे पदार्थ आहेत, ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत, असे जाण. ते माझ्यामध्ये आहेत, पण मी त्यांच्यामध्ये नाही. ॥12॥
जे सात्विक राजस किंवा तामस पदार्थ (आहेत), ते सर्व माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत, असे समज. ॥53॥ हे पदार्थ माझ्या ठिकाणी उत्पन्न झाले, परंतु या पदार्थात मात्र मी नाही. ज्याप्रमाणे (जागृतीपासून स्वप्न उत्पन्न झाले असले तरी) स्वप्नातील डोहात जागृती बुडत नाही (म्हणजे स्वप्नात जागृती नसते) ॥54॥ अथवा ज्याप्रमाणे भरीव बी म्हणजे गोठलेला रसच असतो, पण त्यापासून अंकुर उत्पन्न होऊन त्याचेच लाकूड बनते, ॥55॥ मग त्या लाकडाच्या ठिकाणी बीपणा काही आहे का ? सांग. त्याप्रमाणे मी जरी विकारलेला दिसलो तरी, त्या विकारात मी नाही. ॥56॥ आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात, परंतु त्या ढगात केवळ आकाश नसते किंवा ढगात पाणी असते, परंतु पाण्यात ढग नसतात. ॥57॥ मग त्या पाण्याच्या जोराने उत्पन्न झालेले जे लखलखित तेज दिसते, त्या विजेमध्ये पाणी आहे काय? ॥58॥ सांग, अग्नीपासून धूर तयार होतो, त्या धुरात अग्नी आहे काय ? त्याप्रमाणे जरी विकार माझ्यापासून झाले तरी मी विकारी होत नाही. ॥59॥
या तीन (सत्व, रज आणि तम) गुणमय भावांनी (त्रिगुणात्मक मायेने) मोह पाडलेले हे सर्व जग या गुणांहून वेगळा आणि विकाररहित अशा मला जाणत नाही. ॥13॥
परंतु पाण्यात उत्पन्न झालेले गोंडाळ ज्याप्रमाणे पाण्याला झाकून टाकते किंवा ढगाच्या योगाने आकाश खोटेच झाकल्यासारखे होते. ॥60॥ अरे अर्जुना, स्वप्न हे खोटे आहे असे म्हटले तरी, आपण निद्रेच्या आधीन झाल्यामुळे ते जेव्हा आपल्या अनुभवाला येते, त्यावेळी ते आपली आपल्याला आठवण होऊ देते का? ॥61॥ हे वरील दृष्टांत राहू दे, डोळ्याचे पाणी डोळ्यात गोठून त्याचा पडदा डोळ्यावर येतो, तो पडदा डोळ्यांची दृष्टी नाहीशी करत नाही का? ॥62॥ त्याप्रमाणे त्रिगुणात्मक माया (ही) माझीच पडलेली छाया आहे. ती जणू काय पडद्याप्रमाणे माझ्या आड आली आहे (मला तिने झाकले आहे). ॥63॥ म्हणून प्राणी मला जाणत नाहीत. ते माझेच आहेत, पण मद्रूप होत नाहीत. ज्याप्रमाणे मोती हे पाण्याचेच होतात, पण पाण्यात विरघळत नाहीत, ॥64॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : बळियांमाजीं बळ, तें मी जाणें अढळ…


