अध्याय सातवा
एर्हवीं अवधानाचेनि वहिलेपणें । नाना प्रमेयांचें उगाणे । काय श्रवणाचेनि आंगणें । बोंलों लाहाती ॥198॥ परि तैसें हें नोहेचि देवा । देखिला अक्षरांचा मेळावा । आणि विस्मयाचिया जीवा । विस्मयो जाला ॥199॥ कानाचेनि गवाक्षद्वारें । बोलाचे रश्मी अभ्यंतरें । पाहेना तंव चमत्कारें । अवधान ठकलें ॥200॥ तेविंचि अर्था चाड मज आहे । ते सांगताही वेळु न साहे । म्हणूनि निरूपण लवलाहें । कीजो देवा ॥201॥ ऐसा मागील पडताळा घेउनी । पुढां अभिप्रावो दृष्टी सूनी । तेविंचि माजि शिरवुनी । आर्ती आपुली ॥202॥ कैसी पुसती पाहें पां जाणिव । भिडेचि तरी लंघों नेदी शिंव । एर्हवीं कृष्णहृदयासि खेंव । देवों सरला ॥203॥ अगा गुरूतें जैं पुसावें । तैं येणें मानें सावध होआवें । हें एकचि जाणें आघवें । सव्यसाची ॥204॥ आतां तयाचें तें प्रश्न करणें । वरी सर्वज्ञा हरीचें बोलणें । हे संजयो आवडलेपणें । सांगेल कैसें ॥205॥ तिये अवधान द्यावें गोठी । बोलिजेल नीट मर्हाटी । जैसी कानाचे आधीं दृष्टी । उपेगा जाये ॥206॥ बुद्धीचिया जिभा । बोलाचा न चाखतां गाभा । अक्षरांचियाचि भांबा । इंद्रियें जिती ॥207॥ पहा पां मालतीचे कळे । घ्राणासि कीर वाटले परिमळें । परि वरचिला बरवा काइ डोळे । सुखिये नव्हती ॥208॥ तैसें देशियेचिया हवावा । इंद्रियें करिती राणिवा । मग प्रमेयाचिया गांवा । लेसां जाइजे ॥209॥ ऐसेनि नागरपणें । बोलु निमे तें बोलणें । ऐका ज्ञानदेव म्हणे । निवृत्तीचा ॥210॥
॥ सातवा अध्याय समाप्त ॥
हेही वाचा – Dnyaneshwari : एर्हवीं आयुष्याचें सूत्र बिघडतां, भूतांची उमटे खडाडता…
अर्थ
सहज विचार करून पाहिले तर, या सात वाक्यातील निरनिराळ्या प्रमेयांचा उलगडा, वेगाने अवधान देऊन श्रवण केले असता, त्या श्रवणाच्या बलाने काही बोलता येईल (असे मला वाटले होते). ॥198॥ पण देवा, हे तसे नव्हे. मी अक्षरांचा समुदाय पाहिला आणि माझ्या आश्चर्याच्या जीवाला आश्चर्य झाले. ॥199॥ कानाच्या झरोक्याच्या वाटे शब्दाचे किरण आत प्रवेश करतात न करतात तोच, माझे लक्ष चमत्काराने चकित झाले. ॥200॥ त्याचप्रमाणे अर्थाची मला इच्छा आहे. (ती इच्छा किती आहे) ते सांगतांना जो वेळ लागेल, तितका वेळ देखील विलंब सहन होत नाही. म्हणून अहो देवा, आपण त्याचे निरूपण लवकर करावे. ॥201॥ अशा रीतीने देवाने मागे काय सांगितले, याचा विचार करून आणि पुढे देव काय सांगतील, त्या अभिप्रायावर दृष्टी ठेऊन, त्याचप्रमाणे आपली इच्छाही मधे शिरकावून, ॥202॥ अर्जुनाची प्रश्न विचारण्याची चतुराई कशी आहे पाहा! तो भिडेची मर्यादा तर उल्लंघन करीत नाही, एरवी तो श्रीकृष्णाच्या अंत:करणाला आलिंगन देण्यास प्रवृत्त झाला. ॥203॥ अहो, श्रीगुरूला जेव्हा विचारावयाचे असेल, त्यावेळी असे अवधान ठेवावे लागते, हे सर्व एक अर्जुनच जाणतो. ॥204॥ आता त्या अर्जुनाचे खुबीदार प्रश्न करणे आणि त्यावर सर्वज्ञ श्रीकृष्ण परमात्म्याचे बोलणे हे संजयास आवडल्यामुळे तो ते बोलणे कशा प्रेमाने सांगेल. ॥205॥ ते सरळ मराठी भाषेत सांगितले जाईल; त्या निरूपणाकडे लक्ष द्यावे. जसे कानाच्या आधी दृष्टीचा उपयोग होतो ॥206॥ (तसे) बुद्धीच्या जिव्हेने शब्दांतील अर्थ न चाखता, केवळ अक्षरांच्या शोभेने इंद्रिये जगतील. (इंद्रियांचे समाधान होईल). ॥207॥ अहो, असे पाहा की, मालतीच्या कळ्या नाकाला खरोखर सुगंधाने चांगल्या वाटल्या; पण त्यांच्या वरच्या शोभेने डोळे सुखी होत नाहीत काय? ॥208॥ त्याप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रिये राज्य करतील आणि मग सिद्धांताच्या गावाला त्यास चांगल्या तयारीने जाता येईल. ॥209॥ जेथे शब्द नाहीसा होतो, ते बोलणे अशा सुंदर रीतीने मी सांगेन, ते तुम्ही ऐका, असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. ॥210॥
॥ सातवा अध्याय समाप्त ॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : सहज कृपामंदानिळें, कृष्णद्रुमाची वचनफळें…


