अध्याय सातवा
जेथ वैराग्याची नाव न रिगे । विवेकाचा तागा न लगे । वरि कांहीं तरों ये योगें । तरी विपायें तो ॥91॥ ऐसें जीवाचिये आंगवणें । इये मायानदीचें उतरणें । हें कासयासारिखें बोलणें । म्हणावें पां ॥92॥ जरी अपथ्यशीळा व्याधी । कळे साधूसी दुर्जनाची बुद्धि । कीं रागी सांडी रिद्धी । आली सांती ॥93॥ जरी चोरां सभा दाटे । अथवा मीना गळु घोटे । नातरी भेडा उलटे । विवसी जरी ॥94॥ पाडस वागुर करांडी । जरी मुंगी मेरु वोलांडी । तरी मायेची पैलथडी । देखती जीव ॥95 ॥ म्हणऊनि गा पंडुसुता । जैसी सकामा न जिणवेचि वनिता । तैसी मायामय हे सरिता । न तरवे जीवां ॥96॥ येथ एकचि लीला तरले । जे सर्वभावें मज भजले । तयां ऐलीच थडिये सरलें । मायाजळ ॥97॥ जयां सद्गुरु तारूं पुढें । जे अनुभवचिये कासे गाढे । जयां आत्मनिवेदनतरांडें । आकळलें ॥98॥ जे अहंभावाचें वोझें सांडुनी । विकल्पाचिया झुळका चुकाउनि । अनुरागाचा निरु ताउनी । पाणीढाळु ॥99॥ जया ऐक्याचिया उतारा । बोधाचा जोडला तारा ।मग निवृत्तीचिया पैल तीरा । झेंपावले जे ॥100॥ ते उपरतीचां वांवीं सेलत । सोहंभावाचेनि थावें पेलत । मग निघाले अनकळित । निवृत्तितटीं ॥101॥ येणें उपायें मज भजले । ते हे माझी माया तरले । परि ऐसे भक्त विपाइले । बहुवस नाहीं ॥102॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जिये ब्रह्माचळाचां आधाडां, पहिलिया संकल्पजळाचा उभडा…
अर्थ
ज्या मायानदीत वैराग्याची होडी प्रवेश करू शकत नाही आणि त्याचप्रमाणे विवेकरूपी वेळूला ठाव लागत नाही; याउपर अष्टांग योगाने काही तरणोपाय होतो, पण तो क्वचित् होतो. ॥91॥ याप्रमाणे अंगच्या सामर्थ्याने ही (माया-) नदी उतरून जाणे, हे म्हणणे कशासारखे आहे म्हणून म्हणावे? ॥92॥ जर पथ्य न करणाऱ्याला रोग घालविता येईल, किंवा साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल, अथवा एखादा लोभी मनुष्य त्यास ऐश्वर्य प्राप्त झाले असता, त्याचा तो त्याग करेल ॥93॥ चोरांना जर चौकशी करणारे सभासद (न्यायाधीश) भीतील, अथवा माशाला जर गळ गिळता येईल किंवा एखाद्या भित्र्या मनुष्याला पिशाच्चावर हल्ला करता येईल; ॥94॥ हरणाच्या पाडसाला जर जाळे कुरतडून तोडता आले, मुंगीला जर मेरू पर्वत ओलांडता आला, तरच मायानदीच्या पलीकडचा काठ जीव पाहू शकतील. ॥95॥ म्हणून हे अर्जुना, ज्याप्रमाणे विषयासक्त पुरुषाला स्त्री जिंकता येत नाही, त्याप्रमाणे जीवांना ही मायारूप नदी स्वसामर्थ्याने तरता येणार नाही. ॥96॥ या ठिकाणी जे सर्वभावाने मला भजले, तेच एक ही मायानदी सहज तरून गेले, त्यांना (त्यांच्यासाठी) मायानदीच्या अलीकडच्या काठावर तिचे पाणी संपले. ॥97॥ ज्यास सद्गुरु हा पुढे तारणारा (नावाडी) आहे, ज्या साधकांनी आत्मानुभवरूपी कासोटा घट्ट बांधला आहे आणि ज्यांना आत्मनिवेदनरूपी ताफा (होडी) प्राप्त झाला आहे ॥98॥ जे अहंभावाचे ओझे टाकून विकल्परूपी वार्याच्या झुळुका चुकवून, संसारावरील प्रेमाच्या ओहोटीचे पाणी तपासून ॥99॥ आणि ज्यांना जीव आणि परमात्मा यांच्या ऐक्यरूपी उतार असलेल्या पाण्यात ज्ञानरूपी सोपी पायवाट सापडून मग जे (पलीकडच्या) निवृत्तिरूपी तीराकडे वळले, ॥100॥ वैराग्यरूपी हातांनी पाणी तोडीत आणि मीच परमात्मा आहे, अशा समजुतीच्या बळाने तोल सांभाळीत, कसल्याही अडचणीत न पडता, निवृत्तिरूपी काठावर ते बाहेर आले. ॥101॥ या उपायाने जे मला भजले, ते माझी ही माया तरून गेले. परंतु असे भक्त थोडे आहेत, फार नाहीत. ॥102॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तमाचे धारसे वाड, सत्त्वाचें स्थिरपण जाड…


