Friday, January 16, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : सहज कृपामंदानिळें, कृष्णद्रुमाची वचनफळें…

Dnyaneshwari : सहज कृपामंदानिळें, कृष्णद्रुमाची वचनफळें…

अध्याय सातवा

जेथ तद्ब्रह्मवाक्यफळें । जिये नानार्थरसें रसाळें । बहकते आहाती परिमळें । भावाचेनि ॥186॥ सहज कृपामंदानिळें । कृष्णद्रुमाची वचनफळें । अर्जुन श्रवणाचिये खोळे । अवचित पडिलीं ॥187॥ तियें प्रमेयाचींच हो कां वळलीं । कीं ब्रह्मरसाचां सागरीं चुबुकळिलीं । मग तैसींच कां घोळिलीं । परमानंदें ॥188॥ तेणें बरवेपणें निर्मळें । अर्जुना उन्मेषाचे डोहळे । घेताति गळाळे । विस्मयामृताचे ॥189॥ तिया सुखसंपत्ती जोडलिया । मग स्वर्गा वाती वांकुलिया । हृदयाचां जीवीं गुतकुलिया । होत आहाती ॥190॥ ऐसें वरचिलीचि बरवा । सुख जावों लागलें फावा । तंव रसस्वादाचिया हांवा । लाहो केला ॥191 ॥ झाकरी अनुमानाचेनि करतळें । घेऊनि तियें वाक्यफळें । प्रतीतिमुखीं एक वेळे । घालूं पाहिली ॥192॥ तंव विचाराचिया रसना न दाटती । परी हेतूचांहि दशनीं न फुटती । ऐसें जाणोनि सुभद्रापती । चुंबीचिना ॥193॥ मग चमत्कारला म्हणे । इयें जळींचीं मा तारांगणें । कैसा झकविलों असलगपणें । अक्षरांचेनि ॥194॥ इयें पदें नव्हती फुडिया । गगनाचियाचि घडिया । येथ आमुची मति बुडिया । थाव न निघे ॥195॥ वांचुनि जाणावयाची कें गोठी । ऐसें जीवीं कल्पूनि किरीटी । तिये पुनरपि केली दृष्टी । यादवेंद्रा ॥196॥ मग विनविलें सुभटें । हां हो जी ये एकवाटें । सातही पदें अनुच्छिष्टें । नवलें आहाती ॥197॥

हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसा अध्यात्मलाभ तया, होय गा धनंजया…

अर्थ

त्या ठिकाणी ती ब्रह्माचे प्रतिपादन करणारी वाक्ये हीच कोणी फळे नाना प्रकारच्या अर्थरूपी रसाने भरलेली होती आणि ती अभिप्रायांच्या सुगंधाने दरवळली होती ॥186॥ अशी ही श्रीकृष्णरूप वृक्षाची वचनरूप फळे, सहज कृपारूपी मंद वार्‍याने, अर्जुनाच्या कानरूपी ओटीत अकस्मात पडली. ॥187॥ ती वाक्यरूपी फळे तत्वज्ञानाच्या सिद्धांताचीच जणू काय बनवलेली असून ब्रह्मरसाच्या समुद्रात बुडवून, मग तशीच ती जणू काय परमानंदाने घोळलेली होती. ॥188॥ त्या फळांच्या शुद्ध चांगलेपणाने अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे लागले. ते डोहाळे आश्चर्यरूपी अमृताचे घुटके घेऊ लागले. ॥189॥ त्या सुखसंपत्तीचा लाभ झाल्यामुळे, मग अर्जुन स्वर्गाला वेडावून दाखवू लागला आणि त्याच्या हृदयाच्या जीवात गुदगुल्या होऊ लागल्या. ॥190॥ याप्रमाणे त्या फळांच्या बाह्य सौंदर्याचे अर्जुनास सुख अनुभवाला येऊ लागले. तो इतक्यात त्या फळाच्या रसाची रुची घेण्याच्या तीव्र इच्छेने त्वरा केली. ॥191॥ ताबडतोब अनुमानाच्या तळहातात ती वाक्यफळे घेऊन, अनुभवरूपी मुखात ती एकदम घालावयास (अर्जुन) पाहू लागला. ॥192॥ तेव्हा विचाराच्या तोंडात ती फळे मावेनात, आणखी हेतूच्याही दातांनी ती फळे फुटेनात. (म्हणजे भगवंताचा हेतू काय आहे, हे त्याला कळेना). असे जाणून अर्जुन ती वाक्यरूपी फळे तोंडाला लावीना. ॥193॥ मग चमत्कार वाटून अर्जुन म्हणतो, ही वाक्ये म्हणजे पाण्यात पडलेले तार्‍यांचे प्रतिबिंब होय. मी अक्षराच्या सुलभपणाने (नुसत्या अक्षरांवरून) कसा फसलो? ॥194॥ ही खरोखर वाक्ये नाहीत, तर आकाशाच्या घड्याच आहेत. तेथे आमच्या बुद्धीने किती जरी धडपड केली तरी, तिला थांग लागत नाही. ॥195॥ असे जर आहे तर, मग ती वाक्ये कळावयाची गोष्ट कशाला? असा अर्जुनाने मनात विचार करून त्याने पुन्हा भगवंतांकडे दृष्टी केली. ॥196॥ मग अर्जुनाने विनंती केली की, अहो देवा, ही सातही पदे (1. ब्रह्म, 2. अध्यात्म, 3. कर्म, 4. अधिभूत, 5. अधिदैव, 6. अधियज्ञ, 7. प्रयाणकाली योग्यांना होणारे तुझे स्मरण) एकसारखी कधी न ऐकलेली अशी आश्चर्यकारक आहेत. ॥197॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : एर्‍हवीं आयुष्याचें सूत्र बिघडतां, भूतांची उमटे खडाडता…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!