वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पहिला
अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः । स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः ॥41॥
एथ सारासार विचारावें । कवणें काय आचरावें । आणि विधिनिषेध आघवे । पारुषती ॥246॥ असता दीपु दवडिजे । मग अंधकारीं राहाटिजे । जे उजूचि का आडळिजे । जयापरी ॥247॥ तैसा कुळीं कुळक्षयो होय । तये वेळीं तो आद्य धर्मु जाय । मग आन कांही आहे । पापावांचुनि ॥248॥ जैं यमनियम ठाकती । तेथ इंद्रियें सैरा विचरती । म्हणवूनि व्यभिचार घडती । कुळस्त्रियांसी ॥249॥ उत्तम अधमीं संचरती । ऐसे वर्णावर्ण मिसळती । तेथ समूळ उपडती । जातिधर्म ॥250॥ जैसी चोहटाचिये बळी । पाविजे सैरा काउळीं । तैसीं महापापें कुळीं । प्रवेशती ॥251॥
संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च । पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥42॥
मग कुळा तया अशेखा । आणि कुळघातकां । येरयेरां नरक । जाणें आथी ॥252॥ देखें वंशवृद्धि समस्त । यापरी होय पतित । मग वोवांडिती स्वर्गस्थ । पूर्वपुरुष ॥253॥ जेथ नित्यादि क्रिया ठाके । आणि नैमित्तिक कर्म पारुखे । तेथ कवणा तिळोदकें । कवण अर्पी ॥254॥ तरी पितरं काय करिती । कैसेनि स्वर्गीं वसती । म्हणोनि तेही येती । कुळापासी ॥255॥ जैसा नखाग्रीं व्याळु लागे । तो शिखांत व्यापी वेगें । तेवी आब्रह्म कुळ अवघें । आप्लविजे ॥256॥
दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः । उत्साद्यंते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वतः ॥43॥ उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन । नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥44॥ अहो वत महत् पापं कर्तुं व्यवसिता वयम् । यद् राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥45॥
देवा अवधारीं आणीक एक । एथ घडे महापातक । जे संगदोषें हा लौकिक । भ्रंशु पावे ॥257॥ जैसा घरीं आपुलां । वानिवसें वन्ही लागला। तो आणिकांही प्रज्वळिला । जाळुनि घाली ॥258॥ तैसिया तया कुळसंगती । जे जे लोक वर्तती । तेही बाधु पावती । निमित्तें येणें ॥259॥ तैसें नाना दोषें सकळ । अर्जुन म्हणे तें कुळ । मग महाघोर केवळ । निरय भोगी ॥260॥ पडिलिया तिये ठायीं । मग कल्पांतींही उगंडु नाहीं । येसणे पतन कुळक्षयीं । अर्जुन म्हणे ॥261॥
हेही वाचा – Dnyaneshwari : त्रैलोक्यींचें अनकळित । जरी राज्य होईल एथ…
अर्थ
अधर्माने कुळ व्यापल्याने, हे कृष्णा, कुलस्त्रिया बिघडतात. हे वार्ष्णेया, स्त्रिया बिघडल्याने वर्णसंकर होतो. ॥41॥
तेथे सारासार विचार, कोणी कशाचे आचरण करावे आणि कर्तव्य काय, अकर्तव्य काय, या सगळ्या गोष्टी लोप पावतात. ॥246॥ जवळ असलेला दिवा मालवून, मग अंधारात वावरू लागले, तर चांगल्या जागीही ज्याप्रमाणे अडखळण्याचा प्रसंग येतो. ॥247॥ त्याप्रमाणे ज्या वेळी कुलक्षय होतो, त्या वेळी कुळात पहिल्यापासून चालत असलेल्या धर्माचा लोप होतो. मग तेथे पापावाचून दुसरे काय असणार? ॥248॥ ज्या वेळी इंद्रिये आणि मन यांचा निग्रह थांबतो, त्या वेळी इंद्रिये स्वैर सुटतात. म्हणून कुलिन स्त्रियांकडून व्यभिचार घडतो. ॥249॥ उच्च वर्णाच्या स्त्रियांचा नीच वर्णाच्या लोकांत संचार होतो. अशा रीतीने वर्णसंकर होतो आणि त्यामुळे जातीधर्म मुळापासून उखडले जातात. ॥250॥ ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चारी बाजूनी कावळे येऊन पडतात, त्याप्रमाणे महापापे (अशा) कुळात शिरतात. ॥251॥
संकर झाला म्हणजे तो सर्व कुळाला आणि कुळघातक्यांना हटकून नरकाला नेतो. कारण पिंडदान आणि तर्पणादि क्रिया लुप्त झालेल्यांचे पितर पतन पावतात ॥42॥
मग त्या संपूर्ण कुळाला आणि कुळघातक्यांना – दोघांनाही नरकात जावे लागते. ॥252॥ पाहा, याप्रमाणे वंशात वाढलेली सर्व प्रजा अधोगतीला जाते; आणि मग त्यांचे स्वर्गातील पूर्वज फिरून परत येतात. ॥253॥ ज्या वेळी रोज करावयाची धार्मिक कृत्ये बंद पडतात आणि प्रसंगविशेषी करावयाची लोपतात, त्या वेळी कोण कोणाला तिलोदक देणार? ॥254॥ असे झाल्यावर पितर काय करणार? स्वर्गात कसे राहणार? म्हणून ते देखील आपल्या (भ्रष्ट) कुळापाशी (नरकात) येतात. ॥255॥ ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्याचे विष शेंडीपर्यंत हा हा म्हणता पसरते, त्याप्रमाणे थेट ब्रह्मदेवापासूनचे पुढील सर्व कुळ अशा पातकाने बुडून जाते. ॥256॥
कुलक्षय करणाऱ्यांच्या या वर्णसंकर करणाऱ्या दोषांनी शाश्वत अशा जातीधर्माचा आणि कुलधर्मचा नाश होतो. ॥43॥ हे जनार्दना, ज्या मनुष्यांचे कुलधर्म नष्ट झाले आहेत, त्यांचा निश्चियेकरून नरकामध्ये वास होतो, असे आम्ही ऐकले आहे. ॥44॥ अहो, ज्या अर्थी, आम्ही राज्यसुखाच्या लोभाने स्वजनांना ठार मारण्यास उद्युक्त झालो आहोत, (त्या अर्थी खरोखरच) मोठे थोरले पाप करण्याला (आम्ही) तयार झालो आहोत. ॥45॥
हेही वाचा – Dnyaneshwari : हें ऐसें कैसें करावें । जे आपुले आपण मारावे…
देवा, ऐक. येथे आणखी महापातक घडते ते हे की, त्या पतितांच्या संसर्गदोषाने इतर लोकांचे आचार-विचार भ्रष्ट होतात. ॥257॥ ज्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात अग्नी लागला म्हणजे तो भडकलेला अग्नी दुसऱ्या घरांनाही जाळून टाकतो. ॥258॥ त्याप्रमाणे त्या कुळाच्या संसर्गाने जे जे लोक वागतात, ते ते या संसर्गरूप कारणाने दूषित होतात. ॥259॥ अर्जुन म्हणतो, त्याप्रमाणे अनेक दोषांमुळे मग त्या सर्व कुळाला भयंकर नरक भोगावा लागतो. ॥260॥ त्या ठिकाणी पडल्यावर कल्पांतीदेखील त्याची सुटका होत नाही; कुलक्षयामुळे एवढी अधोगती होते, असे अर्जुन (पुढे) म्हणाला. ॥261॥
क्रमश: