वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे.
अध्याय पहिला
ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ । माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ||14||
की पाखांचा मेरु जैसा । रहंवरु मिरवतसे तैसा । तेजें कोंदाटलिया दिशा । जयाचेनि ॥139॥ जेथ अश्ववाहकु आपण । वैकुंठीचा राणा जाण । तया रथाचे गुण | काय वर्णू ॥140॥ ध्वजस्तंभावरी वानरु । तो मूर्तिमंत शंकरु । सारथी शार्ङ्गधरु । अर्जुनेसीं ॥141॥ देखा नवल तया प्रभूचें | प्रेम अद्भुत भक्तांचें । जे सारथ्य पार्थाचें । करितु असे ।।142।। पाइकु पाठीसीं घातला । आपण पुढां राहिला । तेणें पांचजन्यु आस्फुरिला । अवलीळाचि ।।143।।
पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनंजयः । पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः ।।15।।
परी तो महाघोषु थोरु । गाजत असे गंहिरु । जैसा उदैला लोपी दिनकरु। नक्षत्रांतें ॥144॥ तैसे तुरबंबाळु भवते । कौरवदळीं गाजत होते । ते हारपोनि नेणों केउते । गेले तेथ ॥145॥ तैसाचि देखें येरें । निनादें अति गहिरें । देवदत्त धनुर्धरें । आस्फुरिला ॥146॥ ते दोनी शब्द अचाट | मिनले एकवट । तेथ ब्रह्मकटाह शतकूट । हों पाहत असे ।।147।। तंव भीमसेनु विसणैला । जैसा महाकाळु खवळला । तेणें पौंड्र आस्फुरिला । महाशंखु ॥148॥
अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः । नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ।।16।।
तो महाप्रलयजलधरु । जैसा घडघडिला गंहिरु । तंव अनंतविजयो युधिष्ठिरु । आस्फुरित असे ॥149॥ नकुळें सुघोषु । सहदेवें मणिपुष्पकु । जेणें नादें अंतकु । गजबजला ठाके ॥150॥
हेही वाचा – Dnyaneshwari : …तैसा हा गंगासुतु । सेनापति ||
अर्थ
त्यानंतर (पांडवांकडे) पांढरे शुभ्र घोडे जोडलेल्या महान रथावर आरूढ झालेले श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनीही आपले दिव्य शंख वाजविले. 14.
ज्याच्या तेजाने सर्व दिशा भरून गेल्या होत्या असा जो दिव्य रथ तो असा शोभत होता की, जणू काय पंख असलेला मेरु पर्वतच! 139. लक्षात घे, ज्या रथावर सारथ्याचे काम करणारा प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण आहे, त्या रथाचे गुण काय वर्णावेत? 140. रथावर लावलेल्या निशाणाच्या खांबावर असणारा वानर (मारुती) हा प्रत्यक्ष शंकरच आणि शार्ङ्गधर श्रीकृष्ण हा अर्जुनाचा सारथी होता. 141. पाहा त्या प्रभूचे नवल! त्याचे भक्ताविषयी प्रेम विलक्षण आहे! कारण (तो सर्वशक्तिमान् परमेश्वर, पण) अर्जुनाच्या सारथ्याचेही काम करीत होता! 142. आपल्या दासास पाठीशी घालून (तो) स्वतः युद्धाच्या तोंडावर राहिला. त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख लीलेनेच वाजविला. 143.
भगवान् श्रीकृष्णाने पांचजन्य शंख, अर्जुनाने देवदत्त (आणि) अचाटकर्मा भीमसेनाने पौंड्र नावाचा महान् शंख वाजविला. 15.
परंतु त्याचा तो भयंकर आवाज गंभीरपणाने घुमत राहिला. ज्याप्रमाणे उगवलेला सूर्य नक्षत्रांना लोपवून टाकतो. 144. त्याचप्रमाणे कौरवांच्या सैन्यांत जिकडे तिकडे दुमदुमणारा जो वाद्यांचा कल्लोळ, तो (त्या शंखाच्या महानादाने) कोणीकडे लोपून गेला, ते काही कळेना. 145. त्याचप्रमाणे पाहा, नंतर त्या अर्जुनाने अतिगंभीर आवाजाने देवदत्त नावाचा आपला शंख वाजविला. 146. ते दोन्ही अचाट आवाज जेव्हा एकत्र मिळाले, तेव्हा हे सर्व ब्रह्मांड शतचूर्ण होते की काय, असे वाटू लागले. 147. इनक्यात खवळलेल्या कृतांताप्रमाणे आवेश चढलेल्या भीमाने आपला पौंड्र नावाचा मोठा शंख वाजविला. 148.
कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंतविजय, नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक, 16.
त्याचा आवाज कल्पान्ताच्या वेळच्या मेघगर्जनेप्रमाणे अतिगंभीर असा मोठा झाला. इतक्यात धर्मराजानें अनंतविजय नावाचा शंख वाजविला. 149. नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक या नावाचे शंख वाजविले. त्या आवाजानें काळही गडबडून गेला. 150.
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
हेही वाचा – Dnyaneshwari : त्रैलोक्य बधिरभूत जाहलें…