वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पहिला
बहुतकरूनि कौरव । हे आतुर दुःस्वभाव । वांटिवावीण हांव | बांधिती झुंजीं ॥172॥ झुंजाची आवडी धरिती । परी संग्रामीं धीर नव्हती । हें सांगोन रायाप्रती । काय संजयो म्हणे ॥173॥
संजय उवाच : एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत । सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ॥24॥
आइका अर्जुन इतुकें बोलिला । तंव कृष्णें रथु पेलिला । दोहीं सैन्यांमाजीं केला । उभा तेणें ।।174।।
भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् । उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति ||25||
तत्रापश्यत् स्थितान् पार्थः पितृनथ पितामहान् ।
आचार्यान् मातुलान् भ्रातृन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा ॥26॥
श्वशुरान् सुहृदश्चैव सेनायोरुभयोरपि । तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् ॥27॥
जेथ भीष्मद्रोणादिक । जवळिकेचि सन्मुख | पृथिवीपति आणिक | बहुत आहाति ||175|| तेथ स्थिर करूनि रथु । अर्जुन असे पाहातु । तो दळभार समस्तु संभ्रमेंसीं ॥176॥ मग देवा म्हणे देख देख | हे गोत्रगुरु अशेख । तंत्र कृष्णा मनीं नावेक । विस्मो जाहला ॥177॥ तो आपणयां आपण म्हणे । एथ कायी कवण जाणे । हें मनीं धरिलें येणें । परि कांहीं आश्चर्य असे ।।178।। ऐसी पुढील से घेतु । तो सहजें जाणे हृदयस्थ । परि उगा असे निवांतु । तिये वेळीं ।।179।। तंव तेथ पार्थु सकळ । पितृपितामह केवळ । गुरु बंधु मातुळ । देखता जाहला ॥180॥ इष्टमित्र आपुले । कुमरजन देखिले । हे सकळ असती आले । तयांमाजीं ॥181॥ सुहृज्जन सासरे । आणीकही सखे सोइरे । कुमर पौत्र धनुर्धरें । देखिले तेथ ॥182। जयां उपकार होते केले । कां आपदीं जे राखिले । हे असो वडील धाकुले। आदिकरूनि ||183|| ऐसे गोत्रचि दोहीं दळीं । उदित जालें असे कळीं । हें अर्जुने तिये वेळीं । अवलोकिलें ॥184॥
कृपया परयाऽऽविष्टो विषीदन्निदमब्रवीत् ।
तेथ मनीं गजबज जाहली । आणि आपैसी कृपा आली । तेणें अपमानें निघाली । वीरवृत्ति |185|| जिया उत्तम कुळींचिया होती । आणि गुणलावण्य आथी । तिया आणिकीतें न साहती सुतेजपणें ॥186॥ नविये आवडीचेनि भरें । कामुक निजवनिता विसरे । मग पाडेंविण अनुसरे। भ्रमला जैसा ॥187॥ कीं तपोवळें ऋद्धी । पातलिया भ्रंशे बुद्धी । मग तया विरक्ततासिद्धी । आठवेना ।।188।। तैसें अर्जुना तेथ जाहलें । असतें पुरुषत्व गेलें । जें अंतःकरण दिधलें । कारुण्यासी ॥189।। देखा मंत्रज्ञु बरळु जाये । मग तेथ कां जैसा संचारु होये । तैसा तो धनुर्धर महामोहें । आकळिला ॥190।। म्हणऊनी असता धीरु गेला । हृदया द्रावो आला | जसा चंद्रकळीं सिंपिला । सोमकांतु ।।191।। तयापरी पार्थु । अतिस्नेहें मोहितु | मग सखेद असे बोलतु । अच्युतेसी ॥192॥
हेही वाचा – Dnyaneshwari : पृथ्वीतळ उलथों पहात…
अर्थ
फार करून, कौरव हे उतावळे आणि दुष्ट बुद्धीचे असून पुरुषार्थावाचून युद्धाची हाव धरतात. 172. हे लढाईची हौस तर बाळगतात पण युद्धात टिकाव धरीत नाहीत. इतके सांगून संजय धृतराष्ट्र राजाला पुढे काय म्हणाला – 173.
संजय म्हणाला, हे भरतकुलोत्पन्ना धृतराष्ट्रा, अर्जुनाने असे म्हणताच, श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी (तो) उत्तम रथ थांबवून, 24.
ऐका. अर्जुन एवढे बोलला. इतक्यात श्रीकृष्णाने रथ हाकला आणि त्याने दोन्ही सैन्यांमध्ये उभा केला. 174.
भीष्म, द्रोण आणि इतर सर्व राजे यांच्यासमोर म्हणाला, “हे पार्था, जमलेल्या या कौरवांना पाहा.” 25. त्या ठिकाणी जमलेली वडील माणसे, आजे, गुरू, मामा, बंधू, पुत्र, नातू, तसेच जिवलग मित्र, सासरे, स्नेही या सर्वांना दोन्ही सैन्यांमध्ये अर्जुनाने पाहिले. तेथे जमलेले आपले वांधवच आहेत, असे पाहून तो कुंतीपुत्र. 26-27.
ज्या ठिकाणी भीष्म, द्रोण आदिकरून आप्तसंबंधी आणि आणखी पुष्कळ राजे पुढे उभे होते, 175. त्या ठिकाणी रथ थांबवून, अर्जुन तो सर्व सैन्यसमुदाय उत्सुकतेने पाहू लागला. 176. मग म्हणाला, देवा पाहा पाहा. हे सगळे भाऊबंद आणि गुरू आहेत. ते ऐकून कृष्णाच्या मनाला क्षणभर अचंबा वाटला. 177. तो आपल्या मनाशीच आपण म्हणाला, याने यावेळी हे काय मनात आणिले आहे कोणास ठाऊक! पण काही तरी विलक्षणच असावे. 178. असे पुढचे त्याने अनुमान बांधले. तो (सर्वांच्या) हृदयामध्ये राहाणारा असल्यामुळे त्याने ते सहज जाणले; परंतु त्या वेळी तो (काहीं न बोलता) स्तब्ध राहिला. 179. तो तेथे केवळ आपले चुलते, आजे, गुरू, भाऊ, मामा या सर्वांसच अर्जुनाने पाहिले. 180. आपले इष्टमित्र, मुलेबाळे हे सर्व त्या सैन्यांत आले आहेत, असे त्याने पाहिले. 181. जिवलग मित्र, सासरे, आणखी सगेसोयरे, पुत्र, नातू (असे) अर्जुनाने तेथे पाहिले. 182. ज्यांच्यावर त्याने उपकार केलेले होते किंवा संकटकाळी ज्यांचे रक्षण केलेले होते; फार काय? लहान, मोठे आदिकरून – 183. असे हे सर्व कुळच दोन्ही सैन्यांत लढाईस तयार झालेले आहे, हे त्या वेळी अर्जुनाने पाहिले. 184.
अत्यंत करुणेने व्याकुळ झाला आणि कष्टी होऊन असे म्हणाला,
त्या प्रसंगी (अर्जुनाच्या) मनात गडबड उडाली आणि (त्यामुळे त्याच्या मनात) सहज करुणा उत्पन्न झाली. त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगातील वीरवृत्ति निघून गेली. 185. ज्या (स्त्रिया) उच्च कुळातल्या असून गुण आणि रूप यांनी संपन्न असतात त्यांना आपल्या अंगच्या पाणीदारपणामुळे दुसऱ्या स्त्रीचे (सवतीचे) वर्चस्व सहन होत नाही. 186. नवीन स्त्रीच्या आवडीच्या भरात कामासक्त पुरुष आपल्या स्वतःच्या बायकोला विसरतो आणि मग वेडा होऊन (तिची) योग्यता न पाहता तिच्या नादी लागतो. 187. किंवा तपोबलाने ऋद्धि (ऐश्वर्य) प्राप्त झाली असता (वैराग्यशाली पुरुषाची) बुद्धि भ्रम पावते; आणि मग त्याला वैराग्यसिद्धीची आठवणही राहात नाही. 188. त्याप्रमाणे अर्जुनाची त्या वेळी स्थिति झाली. त्याची असलेली वीरवृत्ति गेली. कारण त्याने (आपले) अंतःकरण करुणेला वाहिले. 189. पाहा, मांत्रिक चांचरला (मंत्रोच्चारात चुकला) असता, जशी त्याला बाधा होते, तसा तो धनुर्धारी अर्जुन मोठ्या मोहाने व्यापला गेला. 190. म्हणून त्याच्या अंगी असलेले धैर्य खचले आणि त्याचे हृदय करुणेने पाझरले. ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचे शिपण झाल्याने चंद्रकांतमणि पाझरू लागतो, 191. त्याप्रमाणे पार्थ महाकरुणेने मोहून गेला आणि मग खेदयुक्त होऊन कृष्णाबरोबर बोलू लागला 192.
हेही वाचा – Dnyaneshwari : … परी कवणेंसीं म्यां झुंजावें


