वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पहिला
तरी आम्हीं कां जन्मावें । कवणालागीं जियावें । जें वडिलां यां चिंतावें । विरुद्ध मनें ॥214॥ पुत्रातें इप्सी कुळ । तयाचें कायि हेंचि फळ । जे निर्दाळिजे केवळ । गोत्र आपुले ॥215॥ हें मनींचि केविं धरिजे । आपण वज्राचेयां बोलिजे । वरी घडे तरी कीजे । भलें एयां ॥216॥ आम्हीं जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगावें । हे जीवितही उपकारावें । काजीं यांचां ॥217॥ आम्ही दिगंतीचे भूपाळ । विभांडूनि सकळ । मग संतोषविजे कुळ । आपुलें जें ॥218॥ तेचि हे समस्त । परी कैसें कर्म विपरीत । जे जाहले असती उद्यत । झुंजावया ॥219॥ अंतौरियां कुमरें । सांडोनियां भांडारें । शस्त्राग्रीं जिव्हारें । आरोपुनी ॥220॥ ऐसियांतें कैसेनि मारुं । कवणावरी शस्त्र धरूं । निज हृदया करूं । घातु केवीं ॥221॥
आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहः । मातुला: श्वशुराः पौत्राः श्यालाः संबंधिनस्तथा ॥34॥
हे नेणसी तूं कवण । परी पैल भीष्म द्रोण । जयांचे उपकार असाधारण । आम्हा बहुत ॥222॥ एथ शालक सासरे मातुळ । आणि बंधु कीं हे सकळ । पुत्र नातू केवळ । इष्टही असती ॥223॥ अवधारीं अति जवळिकेचे । हे सकळही सोयरे आमुचे । म्हणोनि दोष आथि वाचे । बोलितांचि ॥224॥
हेही वाचा – Dnyaneshwari : देखें देह कांपत । तोंड असे कोरडें होत…
अर्थ
जर या वडीलमाणसांचे अहित मनाने चिंतावयचे, तर आम्ही जन्माला येऊन तरी उपयोग काय आणि आम्ही जगावे तरी कोणासाठी? ॥214॥ कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात, त्याचे काय हेच फळ की, त्याने आपल्या आप्तेष्टांचा केवळ वधच करावा? ॥215॥ असे आपण मनात तरी कसे आणावे? वज्रासारखे कठोर शब्द आपण कसे उच्चारावे? उलटपक्षी झाल्यास आपण त्यांचे हितच करावे. ॥216॥ आम्ही जे जे मिळवावे, ते ते या सर्वांनी (वास्तविक) भोगण्यासाठी आहे. यांच्या कामाकरिता आम्ही आपले प्राणही खर्चावयाचे आहेत. ॥217॥ आम्ही देशोदेशीचे राजे युद्धात जिंकून, जे आपले कुळ संतोषवावे. ॥218॥ तेच हे आमचे सर्व कुळ; पण कर्म कसे विपरित आहे पाहा! हे सर्व आपसात लढावयास तयार झाले आहेत! ॥219॥ बायका, मुले, आपले खजिने ही सर्वं सोडून आणि तलवारीच्या धारेवर आपले प्राण ठेऊन, जे लढाईस तयार झाले आहेत. ॥220॥ अशांना मी मारू तरी कसा? मी कोणावर शस्त्र धरू? (हे कौरव म्हणजे आम्हीच, तेव्हा यांना मारणे म्हणजे आपलाच घात करणे होय. या दृष्टीने अर्जुन म्हणतो-) मी आपल्या काळजाचा घात कसा करू? ॥221॥
माझे गुरू, माझे पितृतुल्य स्वजन, पुत्र, त्याचप्रमाणे आजे, मामे, सासरे, नातू, तसेच मेव्हणे आणि संबंधी लोक (येथे दिसत आहेत.) ॥34॥
हे कोण आहेत, तू जाणत नाहीस काय? ज्यांचे आमच्यावर असामान्य उपकार आहेत, असे भीष्म आणि द्रोण, ते पलीकडे आहेत, पाहा. ॥222॥ येथे मेव्हणे, सासरे, मामे आणि इतर सर्व बंधू, पुत्र, नातू आणि केवळ इष्टही आहेत ॥223॥ एक अतिशय जवळचे असे हे आमचे सोयरे आहेत; आणि म्हणूनच (यांना मारावे असे) वाणीने नुसते बोलणे, हे सुद्धा पाप आहे. ॥224॥
हेही वाचा – Dnyaneshwari : आग लागो या युद्धाला…