वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे.
अध्याय पहिला
मग द्रोणापासीं आला । तयातें म्हणे हा देखिला । कैसा दळभारु उचलला | पांडवांचा ।।93।। गिरिदुर्ग जैसे चालते । तैसे विविध व्यूह संभवते । हे रचिले आथि बुद्धिमंतें । द्रुपदकुमरें ॥94॥ जो का तुम्हीं शिक्षापिला । विद्या देऊनि कुरुठा केला । तेणें हा सैन्यसिंहु पाखरिला । देखदेख ।।95।।
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि । युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ।।4।।
आणीकही असाधारण । जे शस्त्रास्त्रीं प्रवीण । जे क्षात्रधर्मीं निपुण । वीर आहाती ।।96।। जे बळें प्रौढी पौरुषें । भीमार्जुनांसारिखे । ते सांगेन कौतुकें । प्रसगेंचि ।।97।। एथ युयुधानु सुभदु | आला असे विरादु । महारथी श्रेष्ठु । द्रुपद वीरु ॥98॥
धृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान् । पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः ।।5।। युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् । सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्वं एव महारथाः ।।6।।
चेकितान धृष्टकेतु । काशीश्वरु विक्रांतु । उत्तमौजा नृपनाथु । शैब्य देख ।।99।। हा कुंतिभोजु पाहें । एथ युधामन्यु आला आहे । आणि पुरुजितादि राय हे । सकळ देखें ||100|| हा सुभद्राहृदयनंदनु । जो अपरु नवा अर्जुनु । तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु । देखें द्रोणा ॥101॥ आणीकही द्रौपदीकुमर । हे सकळही महारथी वीर । मिती नेणिजे परी अपार | मीनले असती ॥102॥
हेही वाचा – Dnyaneshwari : आइका आकाश गिंवसावें, तरी आणीक त्याहूनि थोर होआवें…
अर्थ
नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ येऊन त्यांना म्हणाला, पांडवांचे हे सैन्य कसे उसळले आहे पाहिले का? 93. हुशार अशा द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने सैन्याचे हे नाना प्रकारचे व्यूह सभोवार रचले आहेत. जसे काय चालते डोंगर किल्लेच! 94. ज्याला तुम्ही शिकविलेत, विद्या देऊन शहाणे केलेत त्याने (घृष्टद्युम्नाने) हा सैन्यसिंह कसा उभारला (तयार केला) आहे, पाहा! पाहा तर खरे. 95.
या सेनेमध्ये भीमार्जुनासारखे युद्धामध्ये शूर आणि महाधनुर्धर योद्धे आहेत. (त्यांची नावे सांगतो, ऐका -) युयुधान (सात्यकि), विराट, महारथी द्रुपद. 4.
आणखीही जे शस्त्रास्त्रांत प्रवीण आणि क्षात्रधर्मात निपुण असे असामान्य योद्धे आहेत; 96. जे शक्तीने, मोठेपणाने आणि पराक्रमाने भीम व अर्जुन यांच्यासारखे आहेत, त्यांची नावे प्रसंग आला आहे, म्हणून कौतुकाने सांगतो, 97. येथे लढवय्या सात्यकि, विराट, महारथी श्रेष्ठ आणि शूर असा द्रुपद हे आले आहेत. 98.
धृष्टकेतु, चेकितान आणि महापराक्रमी काशिराज, पुरुजित, कुंतिभोज तसाच नरवीर शैब्य; 5. आणि पराक्रमी युधामन्यु, शूरवीर उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यु आणि द्रौपदीचे पुत्र – हे सर्व महारथी आहेत. 6.
चेकितान, धृष्टकेतु, पराक्रमी असा काशिराजा, नृपश्रेष्ठ उत्तमौजा आणि राजा शैब्य, हे पाहा. 99. हा कुंतिभोज पाहा. येये हा युधामन्यु आला आहे. आणखी हे पुरुजित वगैरे इतर सर्व राजे आलेले आहेत ते पाहा. 100. दुर्योधन म्हणाला, अहो द्रोणाचार्य, सुभद्रेच्या अंतःकरणाला आनंद देणारा आणि प्रतिअर्जुनच असा तिचा मुलगा अभिमन्यु, हा पाहा. 101. आणखीहि द्रौपदीचे पुत्र, हे सर्वच महारथी वीर आहेत. यांची मोजदाद करता येत नाही; पण असे अपरिमित महारथी वीर या ठिकाणी जमले आहेत. 102.
हेही वाचा – Dnyaneshwari : म्हणे पांडवसैन्य उचललें । जैसें महाप्रळयीं पसरलें…