वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे.
अध्याय पहिला
काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः । धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥17॥ द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते । सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान् दध्मुः पृथक् पृथक् ।।18।।
तेथ भूपती होते अनेक । द्रुपद द्रौपदेयादिक । हा काशीपती देख | महाबाहु ||151|| तेथ अर्जुनाचा सुतु । सात्यकि अपराजितु । धुष्टद्युम्नु नृपनाथु । शिखंडी हन ॥152॥ विराटादि नृपवर । जे सैनिक मुख्य वीर । तिहीं नाना शंख निरंतर । आस्फुरिले ॥153॥ तेणें महाघोषनिर्घातें । शेषकूर्म अवचितें । गजबजोनि भूभारातें | सांडूं पाहती ॥154॥ तेथ तिन्हीं लोक डंडळित । मेरु मांदार आंदोळित । समुद्रजळ उसळत । कैलासवेरी ॥155॥
स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् । नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ॥19॥
पृथ्वीतळ उलथों पहात । आकाश असे आसुडत । तेथ सडा होत । नक्षत्रांचा ॥156॥ सृष्टि गेली रे गेली । देवां मोकळवादी जाहली । ऐशी एक टाळी पिटिली । सत्यलोकीं ||157|| दिहाचि दिन थोकला | जैसा प्रलयकाळ मांडला । तैसा हाहाकारु उठिला । तिन्हीं लोकीं ॥158॥ तंव आदिपुरुष विस्मितु | म्हणे झणें होय पां अंतु । मग लोपला अद्भुत । संभ्रमु तो ।।159।। म्हणोनि विश्व सांवरलें । एऱ्हवीं युगान्त होतें वोडवलें । जैं महाशंख आस्फुरिले । कृष्णादिकीं ।।160।। तो घोष तरी उपसंहरला । परी पडिसाद होता राहिला । तेणें दळभार विध्वंसिला । कौरवांचा ||161|| तो जैसा गजघटाआंतु । सिंह लीला विदारितु । तैसा हृदयातें भेदितु । कौरवांचिया ||162।। तो गाजत जंव आइकती । तंव उभेचि हियें घालिती । एकमेकांते म्हणती । सावध रे सावध ||163॥
हेही वाचा – Dnyaneshwari : त्रैलोक्य बधिरभूत जाहलें…
अर्थ
हे पृथ्वीपते धृतराष्ट्रा, महानुर्धर काशीराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट आणि शत्रूकडून कधी पराजय न पावलेला सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि महाबाहु अभिमन्यु इत्यादि सर्वांनी चोहोंकडून आपापले शंख वाजविले. 17-18.
त्या युद्धभूमीवर द्रुपद, द्रौपदीचे पुत्र इत्यादिक अनेक राजे होते. हा वीर्यशाली (शूरवीर) काशीराजा पाहा. 151. तेथे अर्जुनाचा मुलगा (अभिमन्यु), अजिंक्य सात्यकी, राजश्रेष्ठ धृष्टद्युम्न आणि शिखंडी, 152. विराटादिक मोठे राजे, जे मुख्य शूर सैनिक होते, त्यांनीं सर्वांनी निरनिराळे शंख एकसारखे वाजविण्यास आरंभ केला 153. त्या मोठया घोषाच्या दणक्याने शेष, कूर्म हे एकदम गोंधळून जाऊन आपण घरलेले पृथ्वीचे ओझ टाकून द्यावयाच्या बेतात आले. 154. त्यामुळे तिन्ही लोक डळमळू लागले. मेरु आणि मांदार हे पर्वत मागेपुढे झोके खाऊ लागले आणि समुद्राच्या लाटा कैलासापर्यंत उसळल्या. 155.
पृथ्वी आणि आकाशही दणाणून सोडणाऱ्या त्या (शंखांच्या) तुंबळ घोषाने कौरवांची हृदये विदीर्ण केली. 19.
पृथ्वीतळ उलथतो की काय आणि आकाशाला हिसके बसू लागल्यामुळे नक्षत्रांचा सडाच होतो की काय (असे वाटू लागले.) 156. सृष्टि गेली रे गेली, देवांना निराधार स्थिति आली, अशी ब्रह्मलोकांत एकच ओरड झाली. 157. दिवसाच सूर्य थांबला आणि ज्याप्रमाणे प्रलयकाल सुरू व्हावा, त्याप्रमाणे तिन्ही लोकांत हाहाकार उडाला. 158. ते पाहून परमात्मा विस्मित झाला आणि मनात म्हणाला, ‘न जाणो कदाचित् सृष्टीचा अंत होईल’ (तो चुकवावा म्हणून)’ मग त्याने तो विलक्षण गोंधळ (एकदम) शांत केला. 159. त्यामुळे जग सावरले. नाहीतर ज्या वेळेला कृष्णादिकांनी आपले दिव्य शंख वाजविले, त्या वेळी प्रलयकाळ होण्याची वेळ आली होती. 160. तो घोष तर शांत झाला पण त्याचा प्रतिध्वनी जो होता, त्यानेच कौरवांच्या सर्व सैन्याची दाणादाण उडाली. 161. हत्तींच्या कळपाची सिंह लीलेनेच जशी पांगापांग करतो तशी कौरवांची अंतःकरणे त्या प्रतिध्वनीने भेदून टाकली. 162. तो प्रतिध्वनि दुमदुमत असताना जेव्हा त्यांच्या कानांवर आला, तेव्हा उभेपणीच त्यांच्या काळजाने ठाव सोडला, (त्यातल्या त्यात) ते एकमेकांना ‘अरे सावध राहा, सावध राहा’ असे म्हणू लागले. 163.
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
हेही वाचा – Dnyaneshwari : जेथ अश्ववाहकु आपण । वैकुंठीचा राणा जाण…