वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे.
अध्याय पहिला
भानुचेनि तेजें धवळलें । जैसें त्रैलोक्य दिसे उजळलें । तैसें व्यासमती कवळलें । मिरवे विश्व ॥39॥ कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें । तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ।।40।। ना तरी नगरांतरीं वासिजे । तरी नागराचि होईजे । तैसें व्यासोक्तितेजें । धवळित सकळ ।।41।। कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी । प्रगटे जैसी आगळी । अंगनाअंगीं ।।42।। ना तरी उद्यानीं माधवी घडे । तेथ वनशोभेची खाणी उघडे । आदिलापासोनि अपाडें । जियापरी ।। ४३ ।। नाना घनीभूत सुवर्ण । जैसें न्याहाळितां साधारण । मग अळंकारीं बरवेपण । निवाडु दावी ।।44।। तैसे व्यासोक्ती अळंकारिलें । आवडे तें बरवेपण पातलें । तें जाणोनि काय आश्रयिलें | इतिहासीं ||45॥ नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरूनि आंगीं । पुराणें आख्यानरूपें जगीं । भारता आलीं ।।46।। म्हणऊनि महाभारती जें नाहीं । तें नोहेचि लोकीं तिहीं । येणें कारणें म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥47॥ ऐसी सुरस जगीं कथा । जे जन्मभूमि परमार्था । मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥48॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ॐ नमो जी आद्या…
अर्थ
सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य ज्याप्रमाणे उज्ज्वल दिसते, त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापलेले विश्व शोभते; 39. किंवा उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो, त्याप्रमाणे भारतामध्ये चार पुरुषार्थं प्रफुल्लित झालेले आहेत; 40. अथवा, शहरात राहिल्याने जसा मनुष्य चाणाक्षच होतो, त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीतील तेजाने सर्व गोष्टी उज्ज्वल (स्पष्ट) झाल्या आहेत; 41. किंवा, तारुण्यावस्थेत स्त्रियांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सौंदर्याचा बहर अधिक उठावदार दिसू लागतो; 42. अथवा, बगीच्यात वसंताने प्रवेश केला असता तेथील सर्व झाडांच्या सौंदर्याची पूर्वीपेक्षा ज्याप्रमाणे असाधारण अशी खाण उघडते; 43. अथवा, सोन्याची लगड पाहिली असता ते सोने डोळ्यांत भरत नाही, पण त्याच लगडीचे दागिने बनविल्यावर तेच सोने आपले सौंदर्य काही निराळेच दाखविते; 44. त्याप्रमाणे व्यासांच्या बोलण्याने अलंकृत झाले असता आपल्याला हवा तसा चांगलेपणा येतो हे समजूनच की काय, पूर्वीच्या कथांनी भारताचा आश्रय केला; 45. अथवा, जगामध्ये पुरता मोठेपणा प्राप्त व्हावा, म्हणून स्वतःच्या ठिकाणी लहानपणा घेऊन, पुराणांनी आख्यानरूपाने भारतात प्रवेश केला. 46. एवढ्याकरिता महाभारतामध्ये जे नाही ते त्रैलोक्यात नाहीच. या कारणामुळे संपूर्ण त्रैलोक्य व्यासांचे उष्टे म्हटले जाते. (म्हणजे व्यासांनंतर झालेल्यांनी आपल्या सर्व कल्पना व्यासांपासून घेतल्या आहेत.) 47. अशी जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली आणि ब्रह्मज्ञानाला जन्म देणारी ही भारतीय कथा राजश्रेष्ठ जनमेजय राजाला वैशंपायन ऋषींनी सांगितली. 48.
हेही वाचा – Dnyaneshwari : द्वैताद्वैत तेचि निकुंभ