वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे.
अध्याय पहिला
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् । पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ।।10।।
वरी क्षत्रियांमाजि श्रेष्ठु । जो जगजेठी जगीं सुभटु । तया दळवैपणाचा पाटु | भीष्मासी पैं ।।115।। आतां याचेनि बळें गवसलें । हें दुर्ग जैसें पन्नासिलें । येणें पाडें थेंकुलें । लोकत्रय ||116|| आधींच समुद्र पाहीं । तेथ दुवाडपण कवणा नाहीं । मग वडवानळु तैसेयाही । विरजा जैसा ||117|| ना तरी प्रलयवह्नि महावातु । या दोघां जैसा सांघातु । तैसा हा गंगासुतु । सेनापति ||118|| आतां येणेंसि कवण भिडे । हें पांडव सैन्य कीर थोडें । ओइचलेनि पाडें । दिसत असे ।।119।। वरी भीमसेन बेथु । तो जाहला असे सेनानाथु । ऐसें बोलोनि हे मातु । सांडिली तेणें ॥120।।
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः । भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥11॥
मग पुनरपि काय बोले । सकळ सैनिकांतें म्हणितलें | आतां दळभार आपुलाले | सरसे करा ।।121।। जया जिया अक्षौहिणी । तेणें तिया आरणी । वरगण कवणकवणी । महारथिया ।।122।। तेणें तिया आवरिजे । भीष्मातळीं राहिजे । द्रोणातें म्हणे पाहिजे | तुम्हीं सकळ ॥123॥ हार्चि एकु रक्षावा । मी तैसा हा देखावा । येणें दळभारु आघवा । साचु आमुचा ।।124॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जो अपरु नवा अर्जुनु । तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु…
अर्थ
ते हे आमचे भीष्मांनी सर्व बाजूंनी (सेनापति होऊन) रक्षण केलेले सैन्य अफाट (अजिंक्य) आहे; उलट त्यांचे ते (दांडग्या) भीमाने सर्व बाजूंनी रक्षण केलेले सैन्य मोजके (जिंकण्यास सोपे) आहे. 10.
आणखी, क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ आणि या जगात नाणावलेले योद्धे असे जे भीष्माचार्य, त्यांना या सेनेच्या अधिपत्याचा अधिकार दिलेला आहे. 115. आता यांनी आपल्या सामर्थ्याने आवरून या सैन्याची अशी काही रचना केली आहे, की जसे काय किल्लेच बांधले आहेत! याच्यापुढे त्रिभुवनही कः पदार्थ आहे. 116. आधी असे पाहा, समुद्र हा कोणाला दुस्तर नाही? तशात त्याला ज्याप्रमाणे वडवानल साह्यकारी व्हावा; 117. किंवा प्रळयकाळचा अग्नि आणि प्रचंड वारा या दोहोचा ज्याप्रमाणे मिलाफ व्हावा, त्याप्रमाणे या गंगेच्या पुत्राच्या सेनापतित्वाची जोड या पराक्रमी सैन्याला मिळाली आहे. 118. आता या सैन्याबरोबर कोण झगडेल? वर सांगितलेल्या आमच्या सैन्याच्या मानाने हे पांडवांचे सैन्य खरोखरच अपुरे दिसत आहे. 119. आणि त्यांत भीमसेन (अगोदरच) आडदांड आणि तो त्यांच्या संन्याचा अधिपति झाला आहे! असे बोलून त्यानें ती गोष्ट सोडून दिली. 120.
व्यूहाच्या प्रवेशद्वारात आपापल्या नेमलेल्या ठिकाणी उभे राहून आपण सर्वांनी मिळून भीष्मांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावें. 11.
मग पुन्हा काय म्हणाला (ते ऐका), तो सर्व सेनापतींना म्हणाला, आता आपापले सैन्यसमुदाय सज्ज करा. 121. ज्यांच्या ज्या अक्षौहिणी आल्या असतील, त्यांनी त्या अक्षौहिणी युद्धभूमीवर कोणकोणत्या महारथ्याकडे विभागून द्यावयाच्या त्या द्याव्यात. 122. त्या महारथ्याने त्या अक्षौहिणीला आपल्या हुकमतीत ठेवावे आणि भीष्मांच्या आज्ञेत राहावे. (नंतर) दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला, तुम्हीं सर्वांवर देखरेख करावी. 123. या भीष्मांचे एकट्याचेच रक्षण करावे; यांना माझ्याप्रमाणेच मानावे. यांच्या योगानेच आमचा हा सर्व सेनाभार समर्थ आहे. (आमच्या सेवेची सर्व मदार यांच्यावर आहे.) 124.
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसें सर्वांपरी पुरते । वीर दळीं आमुतें…