वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पहिला
हे आदिपुरुषाची माया । ब्रह्मेयाहि नयेचि आया । म्हणऊनी भुलविला ऐकें राया । संजयो म्हणे ॥203॥ अवधारीं मग तो अर्जुनु । देखोनि सकळ स्वजनु । विसरला अभिमानु । संग्रामींचा ॥204॥ कैसी नेणों सदयता । उपनली येथे चित्ता । मग म्हणे कृष्णा आता । नसिजे एथ ॥205॥ माझें अतिशय मन व्याकुळ । होतसे वाचा बरळ । जे वधावे हे सकळ । येणें नांवें ॥206॥
निमितानि च पश्यामि विपरीतानि केशव । न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥31॥
या कौरवां जरी वधावें । तरी युधिष्ठिरादिक कां न वधावे । हे येरयेर आघवे । गोत्रज आमुचे ॥207॥ म्हणोनि जळो हें झुंज । प्रत्यया न ये मज । एणें काय काज । महापापें ॥208॥ देवा बहुतीं परीं पाहतां । एथ वोखटें होईल झुंजतां । वर कांहीं चुकवितां । लाभु आथी ॥209॥
न काङक्षे विजयं कृष्ण न च राज्य सुखानि च । किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥32॥ येषामर्थे काङक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च । ते इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥33॥
तया विजयवृत्ती कांही । मज सर्वथा काज नाहीं । एथ राज्य तरी कायी । हें पाहुनियां ॥210॥ यां सकळांतें वधावें । मग जे भोग भोगावे । ते जळोत आघवे । पार्थु म्हणे ॥211॥ तेणें सुखेविण होईल । तें भलतेही साहिजेल । वरि जीवितही वेंचिजेल । याचिलागीं ॥212॥ परी यासी घातु कीजे । मग आपण राज्य भोगिजे । हें स्वप्नींही मन माझें । करूं न शके ॥213॥
हेही वाचा – Dnyaneshwari : इष्टमित्र आपुले । कुमरजन देखिले…
अर्थ
संजय म्हणाला, हे (धृतराष्ट्र) राजा, ऐक. हा स्नेह म्हणजे परमात्म्याची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आकळत नाही; म्हणून (त्याने) अर्जुनाला भुरळ पाडली. ॥203॥ राजा ऐक. मग तो अर्जुन (युद्धाला आलेले) सर्व आपलेच लोक आहेत असे पाहून, लढाईचा अभिमान (ईर्षा) विसरून गेला. ॥204॥ तेथे त्याच्या चित्तात सदयता कोठून उत्पन्न झाली कोण जाणे! मग म्हणाला, कृष्णा, आपण आता येथे राहू नये, हे बरे. ॥205॥ या सर्वांस मारावयाचे हे मनात येताच त्याने माझे मन अतिशय व्याकुळ होते आणि तोंड हवे ते बरळू लागते. ॥206॥
हे केशवा! मला विपरीत लक्षणे दिसत आहेत; आणि युद्धामध्ये स्वजनांना मारले असता कोणतेही श्रेय (प्राप्त होईल असे) मला दिसत नाही. ॥31॥
या कौरवांचा वध करणे जर योग्य असेल, तर धर्मराजादिकांचा वध करण्याला काय हरकत आहे? कारण की, हे सर्व आम्ही एकमेकांचे नातलगच आहोत. ॥207॥ याकरिता आग लागो या युद्धाला! मला हे पसंत नाही. या महापापाची आम्हास काय गरज आहे? ॥208॥ देवा! अनेक दृष्टींनी विचार केला असता (असे वाटते की), यावेळी युद्ध केले, तर (त्याचा परिणाम) वाईट होईल; पण ते जर टाळले तर काही लाभ होईल. ॥209॥
कृष्णा, मला विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही आणि सुखाचीही नाही. हे गोविंदा, आम्हाला राज्य मिळून काय उपयोग? सुखोपभोग मिळून तरी काय उपयोग? अथवा आम्हाला जगून तरी काय उपयोग? ॥32॥ जांच्याकरिता आम्हाला राज्याची, भोगांची अथवा सुखांची इच्छा असावयाची, ते हे या युद्धामध्ये स्वत:चे प्राण आणि धन यांचा त्याग करून उभे आहेत. ॥33॥
त्या विजयाच्या इच्छेशी मला काहीच कर्तव्य नाही; अशा रीतीने मिळविलेले राज्य तरी आपल्याला काय करावयचे? ॥210॥ अर्जुन म्हणाला, या सर्वाना मारून जे भोग भोगावयाचे, त्या सगळ्यांना आग लागो! ॥211॥ त्या भोगांपासून मिळणाऱ्या सुखाच्या अभावी, जो प्रसंग येऊन पडेल, तो वाटेल तसा बिकट असेल तरीही सहन करता येईल. इतकेच काय? यांच्याकरिता आमचे प्राण खर्ची पडले तरी चालेल; ॥212॥ पण यांचे प्राण घ्यावे आणि आपण राज्य भोगावे, ही गोष्ट माझे मन स्वप्नातदेखील करू शकणार नाही. ॥213॥
हेही वाचा – Dnyaneshwari : देखें देह कांपत । तोंड असे कोरडें होत…