वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे.
अध्याय पहिला
आतां देईजो अवधान । तुम्हीं बोलविल्या मी बोलेन । जैसें चेष्टे सूत्राधीन | दारुयंत्र ।।81।। तैसा मी अनुग्रहीतु । साधूंचा निरूपितु । ते आपुला अलंकारितु । भलतयापरी ।।82।। तंव श्रीगुरु म्हणती राहीं । हें तुज बोलावें नलगे कांहीं । आतां ग्रंथा चित्त देईं । झडकरी वेगा ॥83॥ या बोला निवृत्तिदासु । पावूनि परम उल्हासु । म्हणे परियेसा मना अवकाशु | देऊनियां ॥84॥
धृतराष्ट्र उवाच : धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः । मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वंत संजय ॥1॥
तरी पुत्रस्नेहें मोहितु । धृतराष्ट्र असे पुसतु । म्हणे संजया सांगें मातु । कुरुक्षेत्रींची ॥85॥ जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे । गेले असती व्याजें । झुंजाचेनि ॥86॥ तरी तिहीं येतुलां अवसरीं । काय किजत असें येरयेरीं । तें झडकरी कथन करीं । मजप्रती ।।87।।
संजय उवाच : दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा । आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ॥2॥ पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् । व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥3॥
तिये वेळी तो संजय बोले । म्हणे पांडवसैन्य उचललें । जैसें महाप्रळयीं पसरलें । कृतांतमुख ॥88॥ तैसें तें घनदाट । उठावलें एकवाट । जैसे उसळलें कालकूट । धरी कणव ॥89।। ना तरी वडवानलु सादुकला । प्रलयवातें पोखला । सागर शोषूनि उधवला । अंबरासी ॥90॥ तैसें दळ दुर्धर । नानाव्यूहीं परिकर । अवगमलें भयासुर | तिये काळीं ॥91॥ तें देखिलेयां दुर्योधनें । अव्हेरिलें कवणें मानें । जैसें न गणिजे पंचाननें । गजघटांतें ॥92॥
हेही वाचा – Dnyaneshwari : आइका आकाश गिंवसावें, तरी आणीक त्याहूनि थोर होआवें…
अर्थ
आता आपण लक्ष द्यावे. आपण मला बोलवीत आहा; म्हणून मी बोलतो (गीतेचे व्याख्यान करतो.) ज्याप्रमाणे लाकडी कळसूत्री बाहुली सूत्रधाराची दोरी नाचवील तशी नाचते; 81. त्याप्रमाणे मी आपल्या कृपेतील असून साधूंचा केवळ निरोप्या आहे. आता त्यांनी मला वाटेल तसे नटवावे. 82. तेव्हा श्रीगुरु म्हणाले, ‘राहू दे. हे तू आम्हाला सांगावे असे नाही. आता तू लवकर ग्रंथ सांगण्यास आरंभ कर.’ 83. या श्रीगुरूंच्या भाषणावर निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव अतिशय उल्हसित होऊन म्हणाले, मी बोलतो ते मोकळ्या मनाने ऐका. 84.
धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, धर्माचे स्थान अशा कुरुक्षेत्रामध्ये जमलेले आणि युद्धाची इच्छा करणारे माझे पुत्र (कौरव) आणि पांडव यांनी काय केले? 1.
तर मुलाच्या ममतेने वेडा झालेला धृतराष्ट्र संजयास प्रश्न करू लागला. तो म्हणाला, ‘संजया, कुरुक्षेत्राची हकीकत काय आहे, ती मला सांग. 85. ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे घर म्हणतात, तेथे पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेले आहेत. 86. तरी ते एकमेक एवढा वेळ काय करीत आहेत, हे मला लवकर सांग.’ 87.
संजय म्हणाला, त्या वेळी राजा दुर्योधन, पांडवांचे सैन्य तर व्यूहाच्या आकाराने उभे राहिलेले पाहून, द्रोणाचार्यांजवळ जाऊन त्यांना पुढील शब्द बोलला. 2. हे गुरो, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र (धृष्टद्युम्न) याने व्यूह रचून उभी केलेली अशी ही पांडवांची मोठी सेना अवलोकन करा. 3.
त्या वेळी तो संजय बोलला. तो म्हणाला की, पांडव सैन्याने उठाव केला, तेव्हा ज्याप्रमाणे महाप्रलयाच्या वेळी काळ आपले तोंड पसरतो; 88. त्याप्रमाणे त्या घनदाट सैन्याने एकदम उठाव केला (तेव्हा त्याला कोण आवरणार?), जसे काळकूट एकदा उसळले म्हणजे त्याचे शमन करण्याला कोण समर्थ आहे? 89. अथवा वडवानल (समुद्राच्या पोटातील अग्नि) एकदा पेटला, तशात त्याला प्रलयकालच्या वाऱ्याने हात दिला, म्हणजे तो ज्याप्रमाणे सागराचे शोषण करून आकाशापर्यंत भडकतो; 90. त्याप्रमाणे न आटोपणारे ते सैन्य अनेक व्यूह रचून सज्ज झालेले असल्यामुळे त्या वेळी फारच भयंकर भासले. 91. ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंह मुळीच मोजीत नाही, त्याप्रमाणे ते सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची मुळीच पर्वा केली नाही. 92.
हेही वाचा – Dnyaneshwari : जैसे भ्रमर परागु नेती…
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.