वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पहिला
दृष्ट्वेनं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थिताम् ।।28॥ सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति । वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ।।29।। गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक् चैव परिदह्यते । न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥30॥
तो म्हणे अवधारीं देवा । म्यां पाहिला हा मेळावा । तंव गोत्रवर्गु आघवा । देखिला एथ ॥193॥ हे संग्रामीं अति उद्यत । जाहाले असती कीर समस्त । पण आपणपेयां उचित । केवीं होय ॥194॥ येणें नांवेंचि नेणों कायी । मज आपणपेंया सर्वथा नाहीं । मन बुद्धी ठायीं । स्थिर नोहे ।।195।। देखें देह कांपत । तोंड असे कोरडें होत । विकळता उपजत । गात्रांसी ।।196।। सर्वांगा कांटाळा आला । अति संतापु उपनला । तेथ बेंबळ हातु गेला । गांडिवाचा ॥197॥ तें न धरतचि निष्टलें । परि नेणेंचि हातोनि पडिलें । ऐसें हृदय असे व्यापिलें । मोहें येणें ।।198।। जें वज्रापासोनि कठिण । दुर्धर अतिदारुण । तयाहून असाधारण । हें स्नेह नवल ।।199।। जेणें संग्रामीं हरु जिंतिला । निवातकवचांचा ठावो फेडिला । तो अर्जुन मोहें कवळिला । क्षणामाजीं ॥200॥ जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ठ कोरडें । परि कळिकेमाजीं सांपडे । कोंवळिये ||201|| तेथ उत्तीर्ण होईल प्राणें । परी तें कमळदळ चिरूं नेणे । तैसें कठीण कोवळेपणें । स्नेह देखा ||202|| हे आदिपुरुषाची माया । ब्रह्मेयाहि नयेचि आया । म्हणऊनी भुलविला ऐकें राया । संजयो म्हणे ॥203॥
हेही वाचा – Dnyaneshwari : … परी कवणेंसीं म्यां झुंजावें
अर्थ
(अर्जुन म्हणाला) ‘हे कृष्णा, युद्ध करण्याकरिता एकत्र जमलेल्या या स्वजनांना पाहून 28. माझी गात्रे शिथिल होत आहेत, आणि तोंड कोरडे पडत आहे, माझ्या शरीराला कंप सुटला आहे, आणि (शरीरावर) रोमांच उभे राहिले आहेत. 29. हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे. शरीराच्या त्वचेचा दाह होत आहे. मी उभा राहण्याला समर्थ नाही. माझे मन जणू काय भ्रमण पावत आहे.’ 30.
तो म्हणाला, देवा, ऐका. मी हा सर्व जमाव पाहिला तो येथे सर्व आप्तसंबंधीच दिसतात. 193. हे सर्व लढाईला अतिशय उत्सुक झाले आहेत, हे खरे; पण ते (यांच्याशी लढणे) आपल्याला कसे योग्य होईल? 194. या नातलगांशी युद्ध (करावयाच्या विचारानेच) मला कसेसेच होते. माझे मलाच मुळी भान नाहीसे झाले आहे. माझे मन आणि बुद्धी ही ठिकाणावर नाहीत. 195. पाहा. माझा देह कापत आहे, तोंडाला कोरड पडली आहे आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आली आहे. 196. सर्वांगावर काटा उभा राहिला आहे. माझ्या मनाला अतिशय यातना होत आहेत आणि गांडीव धनुष्य धरावयाचा हात लुळा होऊन गेला आहे. 197. ते धरले न जाताच निसटले; परंतु हातातून केव्हा पडून गेले, याची मला दादच नाही. या मोहाने असे घेरले आहे. 198. हे (अर्जुनाचे अंत:करण) वज्राहून कठीण, दुसऱ्यास दाद न देणारे, अति खंबीर आहे; पण या करुणेची कडी त्याच्याही वर आहे! मोठ्या आश्चर्याची गोष्ट अशी की, 199. ज्याने युद्धात शंकरास हार खाण्यास लाविले आणि निवातकवच नावाच्या राक्षसाचा ठावठिकाणा नाहीसा केला, त्या अर्जुनाला एका क्षणांत मोहाने घेरले! 200. भुंगा हा ज्याप्रमाणे वाटेल त्या प्रकारचे कोरडे लाकूड सहज लीलेने पोखरून टाकतो, परंतु कोवळया कळीमध्येच अडकून पडतो. 201. तेथे तो प्राणासही मुकेल, पण त्या कमळाच्या पाकळ्या चिरण्याचा विचार त्याच्या मनास शिवतही नाही; त्याप्रमाणे पाहा, हा स्नेह जात्या कोवळा खरा, पण महाकठीण! 202. संजय म्हणाला, राजा, ऐक. हा स्नेह म्हणजे परमात्म्याची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आकळत नाही; म्हणून (त्याने) अर्जुनाला भुरळ पाडली. 203.
हेही वाचा – Dnyaneshwari : इष्टमित्र आपुले । कुमरजन देखिले…