सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
अहं क्रतुरहं यज्ञ: स्वधाहमहमौषधम् । मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम् ॥16॥
तोचि जाणिवेचा उदयो जरी होये । तरी मुदल वेदु मीचि आहें । आणि तो विधानातें जया विये । तो ऋतुही मीचि ॥265॥ मग तया कर्मापासूनि बरवा । जो सांगोपांगु आघवा । यज्ञु प्रगटें पांडवा । तोही मी गा ॥266॥ स्वाहा मी स्वधा । सोमादि औषधी विविधा । आज्य मी समिधा । मंत्रु मी हवि ॥267॥ होता मी हवन कीजे । तेथ अग्नि तो स्वरुप माझें । आणिक हुतक जें जें । तेही मीचि ॥268॥
पिताSहमस्य जगतो माता धाता पितामह: । वेद्यं पवित्रमोङ्कार ऋक्सामयजुरेव च ॥17॥
पैं जयाचेनि अंगेसंगें । इये प्रकृतीस्तव अष्टांगे । जन्म पाविजत असे जगें । तो पिता मी गा ॥269॥ अर्धनारीनटेश्वरीं । जो तोचि पुरुष नारी । तेविं मी चराचरीं । माताही होय ॥270॥ आणि जाहालें जग जेथ राहे । जेंणे जित वाढत आहे । तें मीचि वाचूनि नोहे । आन निरुतें ॥271॥ इयें प्रकृतिपुरुषें दोन्ही । उपजलीं जयाचिया अमनमनीं । तो पितामह त्रिभुवनीं । विश्वाचा मी ॥272॥ आणि आघवेयां जाणणेयांचिया वाटा । जया गांवा येती गा सुभटा । जे वेदांचियां चोहटां । वेद्य जें म्हणिजे ॥273॥ जेथ नानामतां बुझावणी जाहली । एकमेकां शास्त्रांची अनोळखी फिटली । चुकलीं ज्ञानें जेथ मिळों आलीं । जें पवित्र म्हणिजे ॥274॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जैसा चेइला तो अर्जुना, म्हणे स्वप्नींची हें विचित्र सेना…
अर्थ
(वेदाने सांगितलेले विधान) क्रतु, (त्यापासून निर्माण होणारा) यज्ञ, स्वधा, औषधी, मंत्र, तूप, अग्नी आणि आहुती मीच आहे. ॥16॥
त्याच ज्ञानाचा जर उदय होईल, तर मुळात वेद मीच आहे आणि तो वेद जी जी कर्मे करावयास सांगतो, त्या कर्मांचे विधानरूप क्रतु (यज्ञकर्म) देखील मीच आहे (असे लक्षात येईल). ॥265॥ मग वेदामध्ये करावयास सांगितलेल्या त्या क्रतुरूप कर्मापासून जी अंगे आणि उपांगे यासहित सर्व चांगली क्रिया होते, अर्जुना तो क्रियारूप यज्ञही मीच आहे. ॥266॥ स्वाहा (देवांना द्यावयाच्या आहुतीचे अन्न) आणि स्वधा (पितरांना द्यावयाच्या आहुतीचे अन्न), यज्ञाच्या कामी उपयोगात येणार्या सोमादिक अनेक वनस्पती हे मी आहे. यज्ञात हवन करण्याचे तूप आणि समिधा मीच आहे. यज्ञात उच्चारावयाचे मंत्र आणि यज्ञाकरिता तयार केलेले द्रव्य, हे देखील मीच आहे. ॥267॥ यज्ञकर्म करण्याकरिता नेमलेला ब्राह्मण मी आहे आणि ज्यात हवन करतात तो अग्नी देखील माझेच स्वरूप आहे, आणि हवन करण्याचे जे जे द्रव्य ते देखील मीच आहे. ॥268॥
मी या जगाचा पिता, माता, पालनकर्ता, पितामह आहे. ज्ञेयवस्तू, पवित्र वस्तू, ॐकार, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद हे सर्व मीच आहे. ॥17॥
अरे अर्जुना, ज्याच्या अंगसंगाने या अष्टांग प्रकृतीपासून जगाला जन्म प्राप्त होतो, तो जगाचा पिता मी आहे. ॥2699॥ ज्याप्रमाणे अर्धनारीनटेश्वराचे स्वरूपात जो पुरुष तोच स्त्री असतो, त्याप्रमाणे चराचरांच्या बाबतीत माताही मीच होतो. ॥270॥ आणि उत्पन्न झालेले जग जेथे राहते आणि ज्या योगाने जगाचे आयुष्य वाढत आहे, ते स्थान माझ्यावाचून खरोखर दुसरे नाही. ॥271॥ प्रकृति आणि पुरुष ही दोन्ही ज्याच्या, मन या उपाधीने रहित असलेल्या, मूळ संकल्पात उत्पन्न झाली, तो त्रैलोक्यात विश्वाचा आजा मी आहे. ॥272॥ आणि अर्जुना, सर्व ज्ञानरूपी वाटा ज्या गावाला येऊन मिळतात आणि वेदांच्या चव्हाट्यावर ज्याला वेद्य (जाणण्याची मुख्य गोष्ट) म्हणतात, ॥273॥ आणि ज्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी वेगवेगळ्या मतांमधील भेद नाहीसा होतो आणि जेथे शास्त्राची एकमेकांत असलेली अनोळख दूर होते, (सर्व शास्त्रे एकाच परमात्याचे प्रतिपादन करतात, असा शास्त्राचा एकमेकांशी परिचय होतो) आणि चुकलेल्या ज्ञानांची ज्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी एकमेकांशी भेट होते आणि ज्या परमात्मस्वरूपाला पवित्र म्हणतात (ते मी आहे). ॥274॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : कां पवनें परमाणु उचलले, ते पृथ्वीपणावेगळे नाहीं गेले…


