Tuesday, February 24, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : आकाशें सर्वत्र वसावें, वायूनें नावभरी उगें नसावें…

Dnyaneshwari : आकाशें सर्वत्र वसावें, वायूनें नावभरी उगें नसावें…

सार्थ ज्ञानेश्वरी

अध्याय नववा

पैं ब्रह्मबीजा जाहला अंकुरु । घोषध्वनीनादाकारु । तयांचें गा भुवन जो ॐकारु । तोही मी गा ॥275॥ जया ॐकाराचिये कुशी । अक्षरें होती अउमकारेंसी । जियें उपजत वेदेंसीं । उठलीं तिन्हीं ॥276॥ म्हणोनि ऋग्यजुःसामु । हे तिन्ही म्हणे मी आत्मारामु । एंव मीचि कुलक्रमु । शब्दब्रह्माचा ॥277॥

गतिर्भर्ता प्रभु: साक्षी निवास: शरणं सुहृत् । प्रभव: प्रलय: स्थानं निधानं बीजमव्ययम् ॥18॥

हें चराचर आघवें । जिये प्रकृती आंत सांठवे । ते शिणली जेथ विसवे । ते परमगती मी ॥278॥ आणि जयाचेनि प्रकृति जिये । जेणें अधिष्ठिली विश्व विये । जो घेऊनि प्रकृती इये । गुणातें भोगी ॥279॥ तो विश्वश्रियेचा भर्ता । मीचि गा पंडुसुता । मी गोसावी समस्ता । त्रैलोक्याचा ॥280॥ आकाशें सर्वत्र वसावें । वायूनें नावभरी उगें नसावें । पावकें दहावें । वर्षावें जळें ॥281॥ पर्वतीं बैसका न संडावी । समुद्रीं रेखा नोलांडावी । पृथ्विया भूतें वाहावीं । हे आज्ञा माझी ॥282॥ म्यां बोलविल्या वेदु बोले । म्यां चालविल्या सूर्यु चाले । म्यां हालविल्या प्राणु हाले । जो जगातें चाळिता ॥283॥ मियांचि नियमिलासांता । काळु ग्रासितसे भूतां । इयें म्हणियागतें पंडुसुता । सकळें जयाचीं ॥284॥ ऐसा जो समर्थु । तो मी जगाचा नाथु । आणि गगनाऐसा साक्षिभूतु । तोहि मीचि ॥285॥ इहीं नामरूपीं आघवा । जो भरला असे पांडवा । आणि नामरूपांहि वोल्हावा । आपणचि जो ॥286॥ जैसे जळाचे कल्लोळ । आणि कल्लोळी आथी जळ । ऐसेनि वसवीतसे सकळ । तो निवासु मी ॥287॥

हेही वाचा – Dnyaneshwari : कां पवनें परमाणु उचलले, ते पृथ्वीपणावेगळे नाहीं गेले…

अर्थ

ब्रह्मरूपी बीजाला फुटलेला जो अंकुर आणि घोष (परा), ध्वनी (पश्यन्ती), नाद (मध्यमा) आणि आकार (वैखरी) यांचे मंदिर, असा जो ॐकार तो मी आहे. ॥275॥ ज्या ॐकाराच्या पोटात अ, उ, म् अशी अक्षरे होती आणि ती उपजताक्षणीच तिन्ही वेदांना घेऊन प्रगट झाली, ॥276॥ म्हणून ऋग्वेद, यजुर्वेस आणि सामवेद हे तिन्ही वेद मीच आहे, असे आत्माराम (श्रीकृष्ण) म्हणाले. ॥277॥

(प्रकृतीचे) विश्रांतीस्थान, भर्ता (पोषण करणारा), (जगाचा) नाथ, साक्षी, निवासस्थान, शरण जाण्य़ास योग्य ठिकाण, (जगाचा) सुहृद, जगाची उत्पत्ती, प्रलय, स्थिती, निधान (राहण्याचे स्थान) आणि त्याचे अविनाशी कारण (हे सर्व) मी आहे. ॥18॥

हे स्थावर जंगमात्मक सर्व जग (महाप्रलयकाळी) ज्या मायेच्या पोटात साठते, ती माया श्रम पावली असता, ज्या ठिकाणी विश्रांती घेते, ती परमगती मीच आहे. ॥278॥ आणि ज्याच्या योगाने प्रकृती जगते, ज्याने तिचा (प्रकृतीचा) अंगीकार केला असता ती जगाला प्रसवते आणि जो या प्रकृतीशी तादाम्त्य करून गुणांचा (सत्व, रज, तमांचा) भोग घेतो ॥279॥ अरे अर्जुना, तो विश्वलक्ष्मीचा नवरा मीच आहे. या सर्व त्रैलोक्याचा धनी मी आहे. ॥280॥ आकाशाने सर्वत्र ठिकाणी राहावे, वार्‍याने क्षणभर देखील स्वस्थ राहू नये, अग्नीने जाळण्याचे काम करावे आणि पाण्याने वर्षाव करावा, ॥281॥ डोंगरांनी आपले आसन सोडू नये, समुद्रांनी आपली मर्यादा उल्लंघन करू नये, पृथ्वीने सर्व प्राण्यांचा भार वाहावा, हे सर्व माझ्या आज्ञेने चालले आहे. ॥282॥ मी बोलवण्याने वेद बोलतो, मी चालवल्याने सूर्य चालतो, मी हालवल्याने जगाचा प्रवर्तक प्राण आपले काम करू शकतो. ॥283॥ मी नियम घालून दिल्याकारणानेच मृत्यू हा प्राण्यांचा ग्रास करतो आणि अर्जुना, ही सर्व ज्याच्या आज्ञेप्रमाणे वागणारी आहेत, ॥284॥ असा जो सर्व शक्तिमान या जगाचा मालक तो मी आहे; आणि आकाशासारखा सर्वात मिसळून उदासीन असणारा, तो देखील मीच आहे. ॥285॥ या नामरूपाने जो सर्व व्यापून राहिलेला आहे आणि अर्जुना, नामरूप यांना जो आपण स्वत:च आधार आहे, ॥286॥ पाण्याच्या जशा लाटा होतात आणि लाटात जसे पाणी असते, याप्रमाणे तेथे सर्व जगाची रचना केली जाते, ते जगाचे राहाण्याचे ठिकाण मीच आहे. ॥287॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : स्वाहा मी स्वधा, सोमादि औषधी विविधा…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!