Friday, February 27, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : जेथ अमरत्व हेंचि सिंहासन, ऐरावतासारिखें वाहन…

Dnyaneshwari : जेथ अमरत्व हेंचि सिंहासन, ऐरावतासारिखें वाहन…

सार्थ ज्ञानेश्वरी

अध्याय नववा

मज येता पैं सुभटा । या द्विविधा गा अव्हांटा । स्वर्गु नरकु या वाटा । चोरांचिया ॥315॥ स्वर्गा पुण्यात्मकें पापें येइजे । पापात्मकें पापें नरका जाइजे । मग मातें जेणें पाविजे । तें शुद्ध पुण्य ॥316॥ आणि मजचिमाजीं असतां । जेणें मी दूरी होय पांडुसुता । तें पुण्य ऐसें म्हणतां । जीभ न तुटे काई ॥317॥ परि हें असो आतां प्रस्तुत । ऐकें यापरि ते दीक्षित । यजुनि मातें याचित । स्वर्गभोगु ॥318॥ मग मी न पविजे ऐसें । जें पापरूप पुण्य असे । तेणें लाधलेनि सोरसें । स्वर्गा येती ॥319॥ जेथ अमरत्व हेंचि सिंहासन । ऐरावतासारिखें वाहन । राजधानीभुवन । अमरावती ॥320॥ जेथ महासिद्धींची भांडारें । अमृताचीं कोठारें । जियें गांवीं खिल्लारें । कामधेनूंचीं ॥321॥ जेथ वोळगे देव पाइका । सैंघं चिंतामणीचिया भूमिका । विनोदवनवाटिका । सुरतरूंचिया ॥322॥  गंधर्वगान गाणीं । जेथ रंभेऐशिया नाचणी । उर्वशी मुख्य विलासिनी । अंतौरिया ॥323॥ मदन वोळगे शेजारें । जेथ चंद्र शिंपे सांबरें । पवना ऐसें म्हणियारें । धावणें जेथ ॥324॥ पैं बृहस्पति आपण । ऐसे स्वस्तीश्रियेचे ब्राह्मण । ताटियेचे सुरगण । विकार जेथ ॥325॥ लोकपाळरांगेचे । राउत जिये पदींचे । उचे:श्रवा खांचे । खोलणिये ।।326॥ हें बहु असो जे ऐसे । भोग इंद्रसुखासरिसे । ते भोगिजती जंव असे । पुण्यलेशु ॥327॥

हेही वाचा – Dnyaneshwari : मीचि गा पांडवा, या त्रिभुवनासि वोलावा…

अर्थ

अर्जुना माझ्याकडे येत असताना माझ्या स्वरूपापासून भलतीकडे नेणार्‍या, स्वर्ग आणि नरक या दोन प्रकारच्या आडवाटा आहेत, त्या चोरांच्या आहेत. ॥315॥ पुण्यरूप पापाने (बाहेरून दिसायला पुण्य आणि आतून भरलेले पाप) स्वर्गाला येता येते आणि (आत-बाहेर जे पाप अशा) पापरूप पापाने नरकाला जाणे होते. मग माझी प्राप्ती ज्याने होते ते शुद्ध पुण्य होय. ॥316॥ आणि अर्जुना सर्व प्राणी माझ्या स्वरूपामध्ये असताना ज्या कृत्याने मी परमात्मा दुरावला जातो, त्या कृत्याला पुण्य असे म्हटले तर जीभ झडणार नाही का? ॥317॥ परंतु या प्रसंगी आता हे राहू दे. अर्जुना ऐक, याप्रमाणे ते यज्ञ करणारे (वस्तुत:) माझी आराधना करतात, पण स्वर्गातील दिव्य पदार्थांच्या भोगाची याचना करतात, ॥318॥ मग मी ज्याच्या योगाने प्राप्त होत नाही, असे जे पापरूप पुण्य आहे, त्याच्या योगाने मिळालेल्या योग्यतेने ते स्वर्गाला येतात. ॥319॥ ज्या स्वर्गात न मरणे हेच सिंहासन आहे, ऐरावत हत्तीसारखे वाहन आहे आणि अमरावतीनगर ही राजधानी आहे. ॥320॥ ज्या स्वर्गात अणिमा, लघिमा इत्यादी महासिद्धींची भांडारे आहेत, अमृताची कोठारे आहेत आणि ज्या गावात कामधेनूंचे कळप आहेत, ॥321॥ ज्या स्वर्गात देवसमुदाय चाकर होऊन सेवा करतात, जेथे जिकडे तिकडे चिंतामणी नावाच्या रत्नांच्या जमिनी आहेत, जेथे करमणुकीकरिता कल्पवृक्षांचे बगीचे केलेले आहेत, ॥322॥ जेथे गंधर्वांची गाणी हीच गाणी आहेत आणि जेथे रंभेसारख्या अप्सरा नाचणार्‍या आहेत आणि विलास करण्याकरिता ज्या स्त्रिया आहेत, त्यात मुख्य उर्वशी आहे, ॥323॥ जेथे शय्यागृहात मूर्तिमंत मदन सेवाचाकरी करतो, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष चंद्र (आपल्या अमृतकिरणांनी) सडासंमार्जन करतो आणि वार्‍यासारखा चपळ जासूद जेथे म्हटलेले (काम) करण्यास तयार आहे, ॥324॥ आशीर्वाद देणारे आणि कल्याण इच्छिणारे ब्राह्मण जेथे आहेत आणि जेथे पंक्तीला देवमंडळींचे समूदाय आहेत; ॥325॥ ज्या ठिकाणी घोडेस्वार लोकपालांच्या (पूर्वादि दिशांच्या इंद्रादिक स्वामींच्या) बरोबरीचे आहेत, जेथे उच्चै:श्रवा नावाचा इंद्राचा घोडा पुढे चालतो, ॥326॥ हे फार वर्णन करणे पुरे. याप्रमाणे इंद्राच्या सुखासारखे ते भोग, यज्ञकर्त्यांच्या पदरात जेथेपर्यंत पुण्याचा अंश असतो, तेथपर्यंत भोगावयास मिळतात. ॥327॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : जैसें कल्पतरुतळवटीं, बैसोनि झोळिये पाडी गांठी…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!