सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
येणें वेगळालेपणें पांडवा । करिती ज्ञानयज्ञु बरवा । जे न भेदती जाणिवा । जाणते म्हणउनि ॥253॥ ना तरी जेधवां जिये ठायीं । देखती कां जें जें कांहीं । तें मीवांचूनि नाहीं । ऐसाचि बोधु ॥254॥ पाहें पां बुडबुडां जेउता जाये । तेउतें जळचि एक तया आहे । मग विरे अथवा राहे । तऱ्ही जळाचिमाजि ॥255॥ कां पवनें परमाणु उचलले । ते पृथ्वीपणावेगळे नाहीं गेले । आणि माघौतें जरी पडले । तरी पृथ्वीचिवरी ॥256॥ तैसें भलतेथ भलतेणें भावें । भलतेंही न हो अथवा होआवें । परि तें मी ऐसें आघवें । होऊनि ठेलें ॥257॥ अगा हे जेव्हडी माझी व्याप्ति । तेव्हडीचि तयांचि प्रतीति । ऐसें बहुधाकारीं वर्तती । बहुचि होउनि ॥258॥ हें भानुबिंब आवडेतया । सन्मुख जैसें धनंजया । तैसे ते विश्वा या । समोर सदा ॥259॥ अगा तयांचिया ज्ञाना । पाठी पोट नाहीं अर्जुना । वायु जैसा गगना । सर्वांगी असे ॥260॥ तैसा मी जेतुला आघवा । तेंचि तुक तयांचिया सद्भावा । तरी न करितां पांडवा । भजन जहालें ॥261॥ एऱ्हवीं तरी सकळ मीचि आहें । तरी कवणीं कें उपासिला नोहें । एथ एकें जाणणेनविण ठाये । अप्राप्तासी ॥262॥ परि तें असो येणें उचितें । ज्ञानयज्ञें यजितसांते । उपासिती मातें । ते सांगितले ॥263॥ अखंड सकळ हें सकळां मुखीं । सहज अर्पत असे मज एकीं । कीं नेणणेयासाठीं मूर्खीं । न पविजेचि मातें ॥264॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तंव अर्जुन म्हणे हें कायी, चकोरेंवीण चांदिणेंचि नाहीं…
अर्थ
अर्जुना, अशा (इंद्रियांना गोचर होणार्या) भेद प्रतीतिद्वारा ते चांगला (अभेद) ज्ञानयज्ञ करतात. कारण की, ते पुरुष स्वरूपज्ञानी असल्याकारणाने विश्वातील भिन्न भिन्न पदार्थांच्या, भिन्न भिन्न ज्ञानाने भेदाला पावत नाहीत. (तर, त्या भिन्न भिन्न ज्ञानातून अन्वयदृष्टीने परमात्म्याला ते पाहतात). ॥253॥ अथवा जेव्हा, ज्या ठिकाणी जे जे काही पाहतात, ते ते माझ्या स्वरूपावाचून दुसरे काही नाही, असाच त्यांचा बोध असतो. ॥254॥ असे पाहा की, बुडबुडा जेथे जाईल तेथे त्याला एक पाणी मात्रच आहे; मग राहिला तरी पाण्यातच अथवा नाहीसा झाला तरी पाण्यातच. ॥255॥ अथवा वार्याने पृथ्वीचे कण वर उचलले तरी ते पृथ्वकणाहून वेगळे झाले नाहीत आणि ते वर गेलेले कण जरी पुन्हा खाली पडले तरी ते पृथ्वीवरच पडतात. ॥256॥ त्याप्रमाणे वाटेल तेथे, वाटेल त्या भावाने (स्थितीने), वाटेल तेही न व्हावे अथवा व्हावे, पण ते मी (परमात्मा) आहे, असे सर्व त्यास (अनुभवाने) होऊन राहिलेले असते. ॥257॥ बा अर्जुना, जेवढी ही माझी व्याप्ती आहे, तेवढाच त्यांचाही अनुभव असतो. याप्रमाणे ते अनुभवाच्या अंगाने, मद्रूप होऊन, अनेक होऊन अनेक आकारांनी वावरत असतात. ॥258॥ अरे अर्जुना, जसे हे सूर्यबिंब वाटेल त्याच्या सन्मुख असते, त्याप्रमाणे ते (पुरुष) नेहमी या विश्वाच्या समोर असतात. ॥259॥ अर्जुना, त्यांच्या ज्ञानाला पुढली बाजू आणि मागील बाजू असे नाही. ज्याप्रमाणे वायू हा आकाशाच्या सर्व पोकळीभर आहे. ॥260॥ त्याप्रमाणे जेवढा संपूर्ण मी आहे, तेच वजन त्यांच्या सद्भावास असते. (म्हणजे, तेवढा संपूर्ण त्यांचा अनुभव असतो.) असे असल्यामुळे अर्जुना, त्यांनी कृतीने जरी भजन केले नाही तरी, ते सहजच होत असते. ॥261॥ सहज विचार करून पाहिले तर, जगातील सर्व पदार्थ मीच आहे, मग कोणाकडून कोठे माझी उपासना होत नाही असे कसे म्हणावे? असे असूनही ज्यांची अशा प्रकारची समजूत झाली नाही, त्यांची तशी समजूत न झाल्यामुळेच त्यांस हे भजन घडत नाही. ॥262॥ परंतु ते असू दे. अशा या योग्य ज्ञानयज्ञाने यजन करणारे, माझी जे उपासना करतात, ते भक्त मी तुला सांगितले. ॥263॥ हे सर्व, सर्वांच्या द्वारे, सदोदित माझ्या एकट्याच्या ठिकाणी सहजच अर्पण होत आहे; (म्हणजे सर्व प्राणी जे काही करतात, ते सर्व मला एकट्याला अर्पण होते. कारण त्या सर्वांच्या रूपाने मीच एक आहे). पण मूर्खांनी हे न जाणल्यामुळे (ते सहज अर्पण होणारे सर्व कर्म) मला प्राप्त होत नाही. ॥264॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जैसा चेइला तो अर्जुना, म्हणे स्वप्नींची हें विचित्र सेना…


