सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते । एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम् ॥15॥
तरी ज्ञानयज्ञु तो एवंरूपु । तेथ आदिसंकल्पु हा यूपु । महाभूतें मंडपु । भेदु तो पशु ॥239॥ मग पांचांचे जे विशेष गुण । अथवा इंद्रियें आणि प्राण । हेचि यज्ञोपचारभरण । अज्ञान धृत ॥240॥ तेथ मनबुद्धीचिया कुंडा- । आंतु ज्ञानाग्नि धडफुडा । साम्य तेचि सुहाडा । वेदि जाणें ॥241॥ सविवेकमतिपाटव । तेचि मंत्रविद्यागौरव । शांति स्रुकस्रुव । जीव यज्वा ।।242॥ तो प्रतीतीचेनि पात्रें । विवेकमहामंत्रें । ज्ञानाग्निहोत्रें । भेदु नाशी ॥243॥ तेथ अज्ञान सरोनि जाये । आणि यजिता यजन हें ठाये । आत्मसमरसीं न्हाये । अवभृथीं जेव्हां ॥244॥ तेव्हां भूतें विषय करणें । हें वेगळालें कांहीं न म्हणे । आघवें एकचि ऐसें जाणे । आत्मबुद्धि ॥245॥ जैसा चेइला तो अर्जुना । म्हणे स्वप्नींची हें विचित्र सेना । मीचि जाहालों होतों ना । निद्रावशें ॥246॥ आतां सेना ते सेना नव्हे । हें मीच एक आघवें । ऐसें एकत्वें मानवे । विश्व तया ॥247॥ मग तो जीवु हे भाष सरे । आब्रह्म परमात्मबोधें भरे । ऐसे भजती ज्ञानाध्वरें । एकत्वें येणें ॥248॥ अथवा अनादि हें अनेक । जे आनासारिखें एका एक । आणि नामरूपादिक । तेंही विषम ॥249॥ म्हणोनि विश्व भिन्न । परि न भेदे तयांचें ज्ञान । जैसे अवयव तरी आन आन । परि एकेचि देहींचे ॥250॥ कां शाखा सानिया थोरा । परि आहाति एकाचिये तरुवरा । बहु रश्मि परि दिनकरा । एकाचे जेवीं ॥251॥ तेविं नानाविधा व्यक्ती । आनानें नामें आनानी वृत्ती । ऐसें जाणती भेदलां भूतीं । अभेदा मातें ॥252॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जैसें उंचीं उदक पडिलें, तें तळवटवरी ये उगेलें…
अर्थ
तसेच दुसरे कित्येक सर्वतोमुख जो मी, त्या माझे ज्ञानयज्ञाने एकत्वाने (आपल्या स्वप्नातील पदार्थाशी जागृत झाल्यावर, जागृत पुरुष जसे ऐक्य पाहातो, त्या अभेदज्ञानाने), आणि निरनिराळ्या प्रकाराने (जो आकार जेथे दिसेल, तो मीच आहे अशा अभेदज्ञानाने), वेगळेपणाने यजन करून माझी उपासना करतात. ॥15॥
तर ज्ञानयज्ञ तो असा आहे. त्या ज्ञानयज्ञमध्ये महामूळ संकल्प हा पशू बांधावयाचा खांब आहे, पंचमहाभूते हा मांडव आहे आणि द्वैत हा पशू आहे. ॥239॥ नंतर पंचमहाभूतांचे जे शब्दस्पर्शादी विशेष गुण अथवा इंद्रिये आणि प्राण हीच यज्ञाची साहित्यसामुग्री असून, अज्ञान हे तूप आहे. ॥240॥ तेथे मन आणि बुद्धी या कुंडात प्रज्वलित ज्ञानरूपी अग्नी असून, हे मित्रा अर्जुना, सुखादु:खादी द्वंद्वांविषयी जी चित्ताची समता, ती वेदी (त्या यज्ञातील शुद्ध केलेला यज्ञाचा ओटा) होय, असे समज. ॥241॥ आत्मानात्मविचार करण्याविषयीची जी बुद्धीची कुशलता, तीच मंत्रविद्येची शोभा आहे. शांती ही स्रुक्-स्रुवा नावाची यज्ञपात्रे आहेत आणि जीव हा यज्ञ करणारा आहे. ॥242॥ तो यज्ञ करणारा जीव, स्वरूपानुभवरूप पात्राने, ब्रह्मविचाररूप महामंत्राने आणि ज्ञानरूप अग्निहोत्रकर्माने, जीव आणइ ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेद नाहीसा करतो. ॥243॥ त्यावेळेस अज्ञानरूपी तूप सरून जाते आणि यज्ञ करणारा तसेच यज्ञ करणे, हे थांबतात आणि जेव्हा यज्ञ करणारा जीव, अवभृथ स्नानाचे वेळी, आत्मैक्यरूपी पाण्याने स्नान करतो, ॥244॥ तेव्हा तो यज्ञ करणारा, पंचमहाभूते, शब्दादी विषय आणि इंद्रिये ही काही वेगळेपणाने समजत नाही. कारण आत्मबुद्धीमुळे तो ही सर्व एकच आहेत, असे जाणतो. ॥245॥ अर्जुना, जसा झोपेतून जागा झालेला पुरुष म्हणतो की, झोपेला वश होऊन स्वप्नातील ही चित्रविचित्र सेना मीच झालो होतो ना? ॥246॥ जागे झाल्यावर म्हणातो की, (स्वप्नात पाहिलेली होती) ती सेना आता (खरोखरीची) सेना नाही, तर स्वप्नामध्ये सैन्य वगैरे सर्व मीच एकटा होतो. अशा एकत्वाने संपूर्ण विश्व त्याच्या अनुभवास येते. ॥247॥ अशा अनुभवावर आल्यावर मग, मी जीव आहे, ही त्याची कल्पना नाहीशी होते. ब्रह्मदेवापासून तो मुंगीपर्यंत सर्व ब्रह्मरूपच आहे, अशा ज्ञानाने तो परिपूर्ण होतो. याप्रमाणे ज्ञानयज्ञद्वारा ते या ऐक्यभावनेने माझे भजन करतात. ॥248॥ अथवा अनादिकालापासून हे अनेकत्व असेच आहे. कारण, (जगातील पदार्थ) एकसारखे एक नाहीत आणि त्यांची नामेरूपे सुद्धा भिन्न भिन्न आहेत. ॥249॥ म्हणून जरी विश्वात त्याच्या दृष्टीस भिन्न भिन्न पदार्थ पडले तरी, त्या योगाने त्यांचे ज्ञान भेद पावत नाही. ज्याप्रमाणे अवयव निरनिराळे आहेत खरे, पण ते सर्व एकाच देहाचे आहेत. ॥250॥ अथवा जशा लहानमोठ्या फांद्या आहेत खर्या, पण त्या एकाच झाडाच्या असतात आणि ज्याप्रमाणे अनेक किरणे खरी, परंतु ती एकाच सूर्याची असतात. ॥251॥ त्याप्रमाणे नाना प्रकारच्या व्यक्ती, त्यांची भिन्न भिन्न नावे आणि त्यांचे भिन्न भिन्न स्वभाव याप्रमाणे भेद असलेल्या प्राण्यात अभिन्न जो मी, त्या मला ते जाणतात. ॥252॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तंव अर्जुन म्हणे हें कायी, चकोरेंवीण चांदिणेंचि नाहीं…


