सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
आतां येणें उजिवडें निरुतें । न्याहाळीं पां ऐश्वर्ययोगातें । जे माझां ठायीं भूतें । परी भूतीं मी नसें ॥133॥ अथवा भूतें ना माझां ठायीं । आणि भूतांमाजि मी नाहीं । या खुणा तूं कहीं । चुकों नको ॥134॥ हें सर्वस्व आमुचें गूढ । परि दाविलें तुज उघड । आतां इंद्रियां देउनि कवाड । हृदयीं भोगीं ॥135॥ हा दंशु जंव नये हातां । तंव माझें साचोकारेपण पार्था । न संपडे गा सर्वथा । जेविं भुसीं कणु ॥136॥ एऱ्हवीं अनुमानाचेनि पैसें । आवडे कीर कळलें ऐसें । परि मृगजळाचेनि वोलांशें । काय भूमि तिमे ॥137॥ जे जाळ जळीं पांगिलें । तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडलें । परि थडिये काढूनि झाडिलें । तेव्हां बिंब कें सांगे ॥138॥ तैसें बोलवरि वाचाबळें । वायांचि झकविजती प्रतीतीचे डोळे । मग साचोकारें बोधावेळे । आथि ना होईजे ॥139॥
अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् । परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥11॥
किंबहुना भवा बिहा या । आणि साचें चाड आथि जरी मियां । तरी तुम्हीं गा उपपत्ती इया । जतन कीजे ॥140॥ एऱ्हवीं वेधली दिठी कवळें । ते चांदणियातें म्हणे पिवळें । तेविं माझां स्वरुपीं निर्मळे । देखाल दोष ॥141॥ नातरी ज्वरें विटाळलें मुख । तें दुधातें म्हणे कडू विख । तेविं अमानुषा मानुष । मानाल मातें ॥142॥ म्हणऊनि पुढती तूं धनंजया । झणें विसंबसी या अभिप्राया । जे इया स्थूलदृष्टी वायां । जाइजेल गा ॥143॥
हेही वाचा – Dnyaneshwari : पाहें पां पूर्णचंद्राचिये भेटी, समुद्र भरतें अपार दाटी…
अर्थ
आता या विचाराच्या प्रकाशाने तू माझ्या (स्वरूपाला) ऐश्वर्ययोगाला चांगले न्याहाळून पाहा. (ते असे की,) माझ्या ठिकाणी सर्व प्राणी आहेत, पण मी प्राण्यांमध्ये नाही. ॥133॥ अथवा भूते माझ्या ठिकाणी नाहीत आणि भूतांमध्ये मी नाही, हे वर्म तू कधीही विसरू नकोस. ॥134॥ ही आमची सर्वस्वी लपवून ठेवलेली गोष्ट आहे; परंतु तुला उघड करून सांगितली आहे. आता इंद्रियांची द्वारे बंद करून (सर्व इंद्रियवृत्ती अंतर्मुख करून) तू या गुह्य (गुप्त) विचारांच्या अंत:करणात अनुभव घे. ॥135॥ अर्जुना, हे वर्म जोपर्यंत स्वाधीन होणार नाही, तोपर्यंत ज्याप्रमाणे कोंड्यात दाणा शोधला असता सापडणार नाही, त्याप्रमाणे माझी खरी स्वरूपस्थिती मुळीच अनुभवास येणार नाही. ॥136॥ एरवी तर्काच्या बळाने (माझी स्वरूपस्थिती) खरोखर कळल्यासारखी वाटते. (पण ते खरे नाही, ते कसे तर पुढील उदाहरणाने सांगतात.) परंतु मृगजळाच्या ओलाव्याने जमीन भिजते काय? ॥137॥ जेव्हा जाळे पाण्यात पसरले, तेव्हा त्यात चंद्रबिंब सापडल्यासारखे दिसते; परंतु ते जाळे पाण्यातून काढून काठावर झाडले तेव्हा चंद्रबिंब कोठे असते, सांग बरे? ॥138॥ त्याप्रमाणे वक्तृत्वाच्या जोरावर कित्येक आपल्या प्रतिपादनाने (स्वत:च्या) अनुभवाचे डोळे उगीच झाकण्यास लावतात (आपण आपल्याला फसवितात). मग खर्या बोधाची वेळ (बोधाच्या परीक्षेची वेळ) आली म्हणजे बोध असतही नाही आणि होतही नाही. ॥139॥
माझे उत्कृष्ट स्वरूप न जाणणारे मूर्ख (सर्व) भूतांचा ईश्वर असलेल्या, (पण सांप्रत) मानवदेह धारण करणार्या (मला मनुष्यच समजून, मनुष्यधर्म माझ्यावर आरोपित करून) माझी अवहेलना करतात. ॥11॥
फार काय सांगावे? जर तुम्ही या संसाराला भीत असाल आणि माझ्या स्वरूपप्राप्तीविषयी जर तुम्हाला खरी खरी इच्छा असेल तर, आम्ही हे सांगितलेले विचार तुम्ही ध्यानात ठेवा. ॥140॥ नाहीतर (ज्याप्रमाणे) काविळीने व्यापलेली दृष्टी चांदण्याला पिवळे समजते, त्याप्रमाणे माझ्या शुद्ध स्वरूपात दोष पाहाल. ॥141॥ अथवा तापाने दूषित झालेले तोंड दुधाला कडू विष म्हणते, त्याप्रमाणे मनुष्य नसलेल्या मला मनुष्य असे मानाल. ॥142॥ म्हणून अर्जुना, पुन्हा तुला एकवार बजावतो की, तू कदाचित सांगितलेल्या (स्वरूपज्ञानाच्या) अभिप्रायाला विसरशील, तर विसरू नकोस. कारण या स्थूल दृष्टीने मला पाहू म्हटले तर, ते पाहणे व्यर्थ होईल. ॥143॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : दीपु ठेविला परिवरीं, कवणातें नियमी ना निवारी…


