सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
जैसे तवंचि वहाळ वोहळ । जंव न पवती गंगाजळ । मग होऊनि ठाकती केवळ । गंगारूप ॥458॥ कां खैर चंदन काष्ठें । हे विवंचना तंवचि घटे । जंव न घापती एकवटें । अग्नीमाजीं ॥459॥ तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शूद्र अंत्यादि इया । जाती तंवचि वेगळालिया । जंव न पवती मातें ॥460॥ मग जातीव्यक्ती पडे बिंदुलें । जेव्हां भाव होती मज मीनले । जैसे लवणकण घातले । सागरामाजीं ॥461॥ तंववरी नदानदींचीं नांवें । तंवचि पूर्वपश्चिमेचे यावे । जंव न येती आघवे । समुद्रामाजीं ॥462॥ हेंचि कवणें एकें मिसें । चित्त माझां ठायीं प्रवेशे । येतुलें हो मग आपैसें । मी होणें असे ॥463॥ अगा वरी फोडावयाचि लागीं । लोहो मिळो कां परिसाचां आंगीं । कां जे मिळतिये प्रसंगीं । सोनेंचि होईल ॥464॥ पाहें पां वालभाचेनि व्याजें । तिया व्रजांगनांचीं निजें । मज मीनलिया काय माझें । स्वरूप नव्हतीचि ॥465॥ नातरी भयाचेनि मिसें । मातें न पविजेचि काय कंसें । कीं अखंड वैरवशें । चैद्यादिकीं ॥466॥ अगा सोयरेपणेंचि पांडवा । माझें सायुज्य यादवां । कीं ममत्वें वासुदेवा- । दिकां सकळां ॥467॥ नारदा ध्रुवा अक्रूरा । शुका हन सनत्कुमारा । यां भक्ती मी धनुर्धरा । प्राप्यु जैसा ॥468॥ तैसाचि गोपीसि कामें । तया कंसा भयसंभ्रमें । येरा घातकें मनोधर्में । शिशुपालादिकां ॥469॥
हेही वाचा – Dnyaneshwari : निंब निंबोळियां मोडोनि आला, तरी तो काउळियांसीचि सुकाळु जाहला…
अर्थ
जोपर्यंत गंगेच्या पाण्याला जाऊन मिळले नाही, तोपर्यंत नाल्या, ओढ्यांच्या पाण्याला नाले, ओढे असे म्हणतात. मग ते गंगेला येऊन मिळाल्यानंतर ते केवळ गंगारूप होऊन रहातात. ॥458॥ किंवा खैराचे लाकूड, चंदनाचे लाकूड आणि इतर रायवळ लाकडे ही निवड, जेथपर्यंत एकत्र करून ती अग्नीमध्ये घातली नाहीत, तेथपर्यंतच होऊ शकते. ॥459॥ त्याप्रमाणे क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अंत्यज आणि स्त्रिया या जाती जेथपर्यंत भक्त माझ्याशी एकरूप झाले नाहीत, तेथेपर्यंतच वेगवेगळ्या असतात. ॥460॥ जसे समुद्रामध्ये मिठाचे कण घातले असता, ते समुद्ररूप होऊन, त्यांचा कणपणा नाहीसा होतो, त्याप्रमाणे जेव्हा सर्व वृत्ती मद्रूप होतात, तेव्हा त्य़ा जाती आणि व्यक्ती यांच्या नावाने शून्य पडते. ॥461॥ तेथपर्यंतच (शोणभद्र आणि सिंधू अशी) नदांची नावे आणि (नर्मदा, गंगा अशी) नद्यांची नावे राहतात; आणि तेथपर्यंतच पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे वहाणारे ओघ असे भेद रहातात की, जेथपर्यंत हे सर्व समुद्रास येऊन मिळत नाहीत. ॥462॥ कोणत्याही एका निमित्ताने हेच चित्त माझ्या स्वरूपात प्रवेश करून राहो, एवढे झाले म्हणजे, मग आपोआप मद्रूप होणे (निश्चित) आहे. ॥463॥ अर्जुना, फोडण्याच्या उद्देशाने लोखंडाचा घण परिसावर पडला तरी देखील घणाचा संबंध परिसाशी येणाऱ्या वेळेस, तो घण सोनेच बनून जाईल. ॥464॥ असे पाहा की, त्या गोपींची अंत:करणे प्रेमाच्या निमित्ताने मला येऊन मिळाली असता त्या गोपी मद्रूप झाल्या नाहीत काय? ॥465॥ अथवा भीतीच्या निमित्ताने (का होईना) कंस मला येऊन मिळाला नाही काय? किंवा निरंतर वैर करण्याच्या जोरावर शिशुपालादिकांनी माझी प्राप्ती करून घेतली नाही काय? ॥466॥ अरे अर्जुना, नातेपणाच्या संबंधानेच या यादवांना माझ्या स्वरूपाची प्राप्ती झाली; किंवा ममत्व ठेवल्यामुळे वसुदेवादिक सर्वांना माझी प्राप्ती झाली. ॥467॥ नारदाला, ध्रुवाला, अक्रूराला, शुकाला अथवा सनत्कुमार यांना, अर्जुना, ज्याप्रमाणे मी भक्तीच्या योगाने प्राप्त करून घेण्याला योग्य झालो, ॥468॥ त्याचप्रमाणे गोपिकांस कामाने (विषयबुद्धीने), त्या कंसाला भयाच्या भ्रांतीने आणि त्या इतर शिशुपालादिकांना त्यांच्या त्या घातक बुद्धीमुळे (मी प्राप्त झालो). ॥469॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : राजाज्ञेचीं अक्षरें आहाती, तियें चामा एका जया पडती…


