Monday, March 2, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : करितां तापसांची कडसणी, कवणु जवळां ठेविजैल शूळपाणी…

Dnyaneshwari : करितां तापसांची कडसणी, कवणु जवळां ठेविजैल शूळपाणी…

सार्थ ज्ञानेश्वरी

अध्याय नववा

पैं अर्जुना माझां ठायीं । आपणपेनवीण सौरसु नाहीं । मी उपचारीं कवणाही । नाकळें गा ॥367॥ एथ जाणीव करी तोचि नेणे । आथिलेपण मिरवी तेंचि उणें । आम्ही जाहलों ऐसें जो म्हणे । तो कांहींचि नव्हे ॥368॥ अथवा यज्ञदानादि किरीटी । कां तपें हन जे हुटहुटी । ते तृणा एकासाठीं । न सरे एथ ॥369॥ पाहें पां जाणिवेचेनि बळें । कोण्ही वेदापासूनि असे आगळे । कीं शेषाहूनि तोंडागळें । बोलकें आथी ॥370॥  तोही आंथरुणातळवटीं दडे । येरु नेति नेति म्हणोनि बहुडे । एथ सनकादिक वेडे । पिसे जाहले ॥371॥ करितां तापसांची कडसणी । कवणु जवळां ठेविजैल शूळपाणी । तोही अभिमानु सांडूनि पायवणी । माथां वाहे ॥372॥ नातरी आथिलेपणें सरिसी । कवणी आहे लक्ष्मियेऐसी । श्रियेसारिखिया दासी । घरीं जियेतें ॥373॥ तियां खेळतां करिती घरकुलीं । तयां नामें अमरपुरें जरि ठेविलीं । तरि न होती काय बाहुलीं । इंद्रादिक तयांचीं ॥374॥ तियां नावडोनि जेव्हां मोडती । तेव्हां महेंद्राचे रंक होती । तियां झाडां येउते जयां पाहती । ते कल्पवृक्ष ॥375॥ ऐसे जियेचियां जवळिकां । सामर्थ्य घरींचियां पाइकां । ते लक्ष्मी मुख्यनायका । न मनेचि एथ ॥376॥ मग सर्वस्वें करूनि सेवा । अभिमान सांडुनि पांडवा । ते पाय धुवावयाचिया दैवा । पात्र जाहाली ॥377॥ म्हणोनि थोरपण पऱ्हांचि सांडिजे । व्युत्पत्ति आघवी विसरिजे । जैं जगा धाकुटें होइजे । तैं जवळीक माझी ॥378॥

हेही वाचा – Dnyaneshwari : गंगेचे उदक गंगे जैसें, अर्पिंजे देवपितरोद्देशें…

अर्थ

अर्जुना, भक्ताने आपला जीवभाव अर्पण केल्याशिवाय मला आनंद होत नाही. अरे, मी (इतर दुसर्‍या) कोणत्याही उपचारांनी कोणालाही वश होत नाही. ॥367॥ येथे जो ‘मी परमात्मास्वरूप जाणले’ असे म्हणतो, त्यास ते खास कळले नाही, असे समजावे. माझ्यापुढे जो आपला संपन्नपणा मिरवतो, तोच त्याचा उणेपणा आहे; जो ‘आम्ही कृतार्थ झालो’ असे म्हणतो, तो काहीच झाला नाही (असे समजावे). ॥368॥ अथवा अर्जुना, यज्ञ, दान आणि तप यांच्या योगाने मी सहज भगवद्प्राप्ती करून घेईन, असा जर कोणाला गर्वाचा फुंज असेल तर, त्या यज्ञ, दान, तप वगैरेंची गवताच्या काडीइतकी सुद्धा माझ्याजवळ किंमत नाही. ॥369॥ अर्जुना, विचार कर. ज्ञानसंपन्नतेच्या बाबतीत वेदांपेक्षा श्रेष्ठ कोणीतरी आहे काय? किंवा शेषापेक्षा अधिक तोंडांनी बोलणारा कोठे आहे काय? ॥370॥ तो शेष देखील माझ्या अंथरुणाखाली लपून बसतो. दुसरा जो (वेद तो) मी (परमात्मा) असा नाही, मी (परमात्मा) तसा नाही, असे म्हणून परत फिरतो. माझ्या (परमात्मस्वरूपाच्या) ठिकाणी सनकादिक अगदी वेडेपिसे झाले आहेत. ॥371॥ तपस्व्यांची निवड करू गेले तर, जो महादेवाच्या पंक्तीला बसवता येईल, असा कोण तपस्वी आहे? त्या शिवाने देखील देखील अभिमान टाकून माझे चरणोदक (गंगा) मस्तकावर धारण केले. ॥372॥ अथवा ऐश्वर्याने लक्ष्मीच्या बरोबरीची दुसरी कोण आहे? ज्या लक्ष्मीच्या घरी श्रियेसारख्या दासी आहेत, ॥373॥ त्यांनी भातुकली खेळताना केलेल्या घरकुलास अमरावती हे नाव दिले, तर इंद्रादिक हे त्यांच्या खेळातील बाहुल्या होणार नाहीत काय? ॥374॥ खेळाचा कंटाळा येऊन जेव्हा त्या दासी खेळ (घरकुले वगैरे) मोडतात, तेव्हा मोठे मोठे इंद्रासारखे देव रंक होतात. त्या ज्या झाडांकडे एवढेसे पाहतात, ते कल्पवृक्ष होतात. ॥375॥ जिच्या घरातील सन्निध असलेल्या दासींची अशी शक्ती आहे, अशी जी ऐश्वर्याची मुख्य मालकीण लक्ष्मी, तिचीही येथे किंमत नाही. ॥376॥ हे अर्जुना, मग ती जेव्हा आपल्या ठिकाणी असलेल्या ऐश्वर्याच्या अभिमानाचा त्याग करून सर्वस्वी माझी सेवा करू लागली, त्यावेळी ती माझे पाय धुण्याच्या भाग्याला पात्र झाली. ॥377॥ एवढ्याकरिता आपल्या ठिकाणाचा मोठेपणा दूर टाकून द्यावा. शास्त्राध्ययन केल्याचा फुंज असला तर, तो सर्व टाकून जसे काही आपण शास्त्राध्ययन केलेच नाही, अशी वृत्ती ठेवावी. जगतात अशा प्रकारचा सर्व प्रकारे लहानपणा जेव्हा घ्यावा, तेव्हा माझे सान्निध्य प्राप्त होते. ॥378॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : जे माझेनि कामें सकाम, जे माझेनि प्रेमें सप्रेम…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!