Wednesday, March 11, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : अंगावरी पडतां पाषाण, न सुवावें केविं वोडण…

Dnyaneshwari : अंगावरी पडतां पाषाण, न सुवावें केविं वोडण…

सार्थ ज्ञानेश्वरी

अध्याय नववा

पाहें पां चंदनाचेनि अंगानिळें । शिवतिले निंब होते जे जवळे । तिंहीं निर्जीवींही देवांची निडळें । बैसणीं केलीं ॥484॥ मग तो चंदनु तेथ न पवे । ऐसें मनीं कैसेनि धरावें । अथवा पातला हें समर्थावें । तेव्हां कायि साच ॥485॥ जेथ निववील ऐसिया आशा । हरें चंद्रमा आधा ऐसा । वाहिजत असे शिरसा । निरंतर ॥486॥ तेथ निवविता आणि सगळा । परिमळें चंद्राहूनि आगळा । तो चंदनु केविं अवलीळा । सर्वांगी न बैसे ॥487॥ कां रथ्योदकें जियेचिये कासे । लागलिया समुद्र जालीं अनायासें । तिये गंगेसि काय अनारिसें । गत्यंतर असे ॥488॥ म्हणोनि राजर्षि कां ब्राह्मण । जयां गती मती मीचि शरण । तयां त्रिशुद्धी मीच निर्वाण । स्थितिही मीचि ॥489॥ यालागीं शतजर्जरे नावे । रिगोनि केविं निश्चिंत होआवें । कैसेनि उघडिया असावें । शस्त्रवर्षीं ॥490॥ अंगावरी पडतां पाषाण । न सुवावें केविं वोडण । रोगें दाटलिया आणि उदासपण । वोखदेंसीं ॥491॥ जेथ चहूंकडे जळत वणवा । तेथूनि न निगिजे केविं पांडवा । तेविं लोका येऊनिया सोपद्रवां । केविं न भजिजे मातें ॥492॥ अगा मातें न भजावयालागीं । कवण बळ पां आपुलां आंगीं । काइ घरीं कीं भोगीं । निश्चिंती केली ॥493॥ नातरी विद्या कीं वसयां । यां प्राणियांसि हा ऐसा । मज न भजतां भरंवसा । सुखाचा कोण ॥494॥ तरी भोग्यजात जेतुलें । तें एका देहाचिया निकिया लागलें । आणि येथ देह तंव असे पडिलें । काळाचां तोंडीं ॥495॥

हेही वाचा – Dnyaneshwari : अगा वरी फोडावयाचि लागीं, लोहो मिळो कां परिसाचां आंगी

अर्थ

पाहा, चंदनाच्या झाडावरून आलेल्या वार्‍याने स्पर्श केलेली लिंबाची झाडे, जी चंदनाच्या जवळ होती, ती निर्जीव (अचेतन) असूनही त्यांनी देखील देवाच्या मस्तकावर रहाण्यास जागा मिळवली. ॥484॥ मग खास चंदन ती जागा मिळवणार नाही, असे मनात तरी कसे आणता येईल? किंवा त्यास ती जागा मिळाली आहे, हे सिद्ध केले तरच ते खरे ठरणार, असे आहे काय? ॥485॥ ज्या अर्थी शंकरांनी (हालाहल विष प्राशन केल्याने आग होत होती ती) थंड करील या आशेने अर्धा असा चंद्र मस्तकावर निरंतर धारण केला आहे, ॥486॥ त्याअर्थी थंड करणारा आणि पूर्ण तसेच सुवासाने चंद्रापेक्षा अधिक असा जो चंदन, तो सहज सर्वांगाच्या ठिकाणी कसा बसणार नाही? ॥487॥ अथवा रस्त्यावरील पाण्यांनी जिचा आश्रय केला असता, ती (रथ्योदके) अनायासाने समुद्ररूप होतात, त्या गंगेला काही समुद्राशिवाय दुसरी गती आहे काय? ॥488॥ म्हणून क्षत्रिय असून ऋषी झालेले असोत किंवा ब्राह्मण असोत, ज्यांच्या क्रियेला आणि बुद्धीला मीच आश्रयस्थान आहे, त्यांना निश्चयाने मीच परमगती आहे आणि त्यांचे असणेही मीच आहे. ॥489॥ या करिता शेकडो ठिकाणी खिळखिळ्या झालेल्या नावेत बसून स्वस्थ कसे राहावे? आणि शस्त्रांचा वर्षाव होत असता उघड्या अंगाने कसे असावे? ॥490॥ अर्जुना, अंगावर धोंडे पडत असताना मधे ढाल कशी घालू नये? रोगाने ग्रस्त झाले असता औषधाविषयी बेफिकीर कसे राहावे? ॥491॥ अर्जुना, जेथे चोहोंकडून वणवा लागला आहे, तेथून बाहेर कसे पडू नये? त्याप्रमाणे अनेक दु:खांनी भरलेल्या या मृत्युलोकात येऊन, मला कसे भजू नये बरे? ॥492॥ अरे अर्जुना, माझे भजन न करण्याला असे आपल्या (प्राण्यांच्या) अंगी कोणते सामर्थ्य आहे? हे घराच्या जोरावर का भोगाच्या जोरावर बेफिकीर झाले आहेत? ॥493॥ अथवा विद्येने अथवा तारुण्याने हे बेपर्वा होऊन बसले आहेत? माझे भजन न करता, असे बेपर्वा होऊन बसण्यासारखी या प्राण्यांना सुखाची खात्री कोणाची आहे? ॥494॥ तर, जेवढे विषयमात्र म्हणून आहेत, ते सर्व एका देहाच्याच बर्‍याकरिता (सुखाकरिता) उपयोगात आले आहेत! आणि या मृत्युलोकात देह तर काळाच्या तोंडी पडलेला आहे! ॥495॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : जे पृथ्वीतळींचे देव, जे तपोवतार सावयव…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!