सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
अगा मी एकुलाणीचें खागें । मज येवों ये भलतेनि मार्गें । भक्ती कां विषयें विरागें । अथवा वैरें ॥470॥ म्हणोनि पार्था पाहीं । प्रवेशावया माझां ठायीं । उपायांची नाहीं । केणि एथ ॥471॥ आणि भलतिया जाती जन्मावें । मग भजिजे कां विरोधावें । परि भक्त कां वैरिया व्हावें । माझियाचि ॥472॥ अगा कवणें एकें बोलें । माझेपण जऱ्ही जाहालें । तरी मी होणें आलें । हाता निरुतें ।।473॥ यापरी पापयोनीही अर्जुना । कां वैश्य शूद्र अंगना । मातें भजतां सदना । माझिया येती ॥474॥
किं पुनर्ब्राह्मणा: पुण्या भक्ता राजर्षयस्तथा । अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ॥33॥
मग वर्णामाजीं छत्रचामर । स्वर्ग जयांचें अग्रहार । मंत्रविद्येसि माहेर । ब्राह्मण जे ॥475॥ जेथ अखंड वसिजे यागीं । जे वेदांची वज्रांगी । जयाचिये दिठीचां उत्संगीं । मंगळ वाढे ॥476॥ जे पृथ्वीतळींचे देव । जे तपोवतार सावयव । सकळ तीर्थांसि दैव । उदयलें जे ॥477॥ जयांचिये आस्थेचिये वोले । सत्कर्म पाल्हाळीं गेलें । संकल्पें सत्य जियालें । जयांचेनि ॥478॥ जयांचेनि गा बोलें । अग्नीसि आयुष्य जाहालें । म्हणोनि समुद्रें पाणी आपुलें । दिधलें यांचिया प्रीती ॥479॥ मियां लक्ष्मी डावलोनि केली परौती । फेडोनि कौस्तुभ घेतला हातीं । मग वोढविली वक्षस्थळाची वाखती । चरणरजां ॥480॥ आझूनि पाउलाची मुद्रा । मी हृदयीं वाहें गा सुभद्रा । जे आपुलिया दैवसमुद्रा । जतनेलागीं ॥481॥ जयांचा कोप सुभटा । काळाग्निरुद्राचा वसौटा । जयांचां प्रसादीं फुकटा । जोडती सिद्धी ॥482॥ ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण । आणि माझां ठायीं अतिनिपुण । आतां मातें पावती हें कवण । समर्थणें ॥483॥
हेही वाचा – Dnyaneshwari : राजाज्ञेचीं अक्षरें आहाती, तियें चामा एका जया पडती…
अर्थ
अरे अर्जुना, मी सर्व मार्गांच्या मुक्कामाचे एक शेवटचे ठिकाण आहे. वाटेल त्या मार्गाने मजकडे (माझ्या स्वरूपी) येता येते. भक्तीने अथवा विषयबुद्धीने अथवा वैराग्याने अथवा वैराने. ॥470॥ म्हणून अर्जुना पाहा, माझ्या स्वरूपात मिळावयाचे असेल तर, येथे साधनाचे बंधन नाही. ॥471॥ आणि वाटेल त्या जातीत जन्माला आले तरी चालेल. मग भक्ती किंवा वैर केले तरी हरकत नाही. परंतु भक्त किंवा वैरी व्हायचे असेल तर, ते माझेच झाले पाहिजे. ॥472॥ कोणात्याही का निमित्ताने होईना, जर माझ्याशी दृढ संबंध झाला, तर मद्रूप होणे हे खास हाती आले, असे समजावे. ॥473॥ याप्रमाणे अर्जुना, दुष्ट जातीत जन्म झालेले किंवा वैश्य, शूद्र अथवा स्त्रिया यांनी माझे भजन केले असता ती सर्व माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. ॥474॥
तर मग पुण्यशील ब्राह्मण, भक्त असलेले आणि ऋषींप्रमाणे आचरण करणारे राजे, हे उत्कृष्ट गती पावतील, यात नवल ते काय? अनित्य आणि सुखहीन असा हा (मर्त्य)लोक प्राप्त झाला असता तू माझीच भक्ती कर. ॥33॥
मग चारही वर्णांमध्ये छत्रचामराप्रमाणे सर्वांच्या वर असलेले, ज्यांना स्वर्ग हा निर्वाहाकरिता इनाम दिलेला आहे आणि जे वेदांतील मंत्ररूप विद्येचे माहेरघर आहेत, असे जे ब्राह्मण ॥475॥ जेथे (ज्या ब्राह्मणांच्या ठिकाणी) नेहमी यज्ञांचे राहणे असते, जे वेदांचे अभेद्य चिलखत आहेत, ज्यांच्या दृष्टिरूप मांडीवर कल्याणाची वाढ होत राहते ॥476॥ जे या पृथ्वीवरील देव आहेत, जे मूर्तिमंत तपाचे अवतार आहेत, जे सर्व तीर्थांना उदयास आलेले दैवच आहेत ॥477॥ ज्यांच्या इच्छारूप ओलीने, चांगले कर्म हाच कोणी वेल, तो विस्तार पावला आहे; ज्यांच्या संकल्पाने सत्य जिवंत राहिले आहे, ॥478॥ ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीचे आयुष्य वाढले, म्हणून समुद्राने आपले पाणी यांच्या प्रीतीकरिता दिले ॥479॥ मी लक्ष्मीला सारून पलीकडे केली, गळ्यातील कौस्तुभ काढून हातात घेतला आणि मग ज्यांच्या पायधुळीकरिता छातीचा खळगा पुढे केला, ॥480॥ अर्जुना, अजूनपर्यंत (त्या) पावलाची खूण मी हृदयाच्या ठिकाणी वागवीत आहे. ती मी का वागवतो म्हणून म्हणशील तर, आपल्या षड्गुणैश्वर्यभाग्यरूप समुद्राचे रक्षण होण्याकरिता. ॥481॥ अर्जुना, ज्यांचा राग हा काळाग्नी नावाच्या प्रलयकाळच्या रुद्रदेवतेचे वसतीस्थान आहे आणि ज्याच्या प्रसन्नतेने अष्टमहासिद्धी फुकट म्हणजे अनायासे प्राप्त होतात. ॥482॥ याप्रमाणे पुण्याईने पूज्य असलेले जे ब्राह्मण आणि जे माझ्या ठिकाणी अतिशय तत्पर आहेत, ते मला प्राप्त होतात, हे काय आता निराळे सिद्ध करावयास पाहिजे? ॥483॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : अगा वरी फोडावयाचि लागीं, लोहो मिळो कां परिसाचां आंगी


