Wednesday, February 11, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : पाहें पां पूर्णचंद्राचिये भेटी, समुद्र भरतें अपार दाटी…

Dnyaneshwari : पाहें पां पूर्णचंद्राचिये भेटी, समुद्र भरतें अपार दाटी…

सार्थ ज्ञानेश्वरी

अध्याय नववा

बीज जळाची जवळीक लाहे । आणि तेंचि शाखोपशाखीं होये । तैसें मज करणें आहे । भूतांचे हें ॥109॥ अगा नगर हें रायें केलें । या म्हणणया साचपण कीर आलें । परि निरुतें पाहतां काय शिणले । रायाचे हात ॥110॥ आणि मी प्रकृति अधिष्ठीं तें कैसें । जैसा स्वप्नीं जो असे । मग तोचि प्रवेशे । जागृतावस्थे ॥111॥ तरि स्वप्नौनि जागृती येतां । काय पाय दुखती पंडुसुता । कीं स्वप्नामाजीं असतां । प्रवासु होय ॥112॥ या आघवियाचा अभिप्रावो कायी । जे हें भूतसृष्टीचें कांहीं । मज एकही करणें नाहीं । ऐसाचि अर्थु ॥113॥ जैशी रायें अधिष्ठिली प्रजा । व्यापारे आपुलालिया काजा । तैसा प्रकृतिसंगु माझा । येर करणें तें इयेचें ॥114॥ पाहें पां पूर्णचंद्राचिये भेटी । समुद्र भरतें अपार दाटी । तेथ चंद्रासि काय किरीटी । उपखा पडे ॥115॥ जड परि जवळिका । लोह चळे तरि चळो कां । कवण शीण भ्रामका । सन्निधानाचा ॥116॥ किंबहुना यापरी । मी निजप्रकृति अंगीकारीं । आणि भूतसृष्टी एकसरी । प्रसवोंचि लागे ॥117॥ जो हा भूतग्रामु आघवा । असे प्रकृतिआधीन पांडवा । जैसी बीजाचिया वेलपालवा । समर्थ भूमि ॥118॥ नातरी बाळादिकां वयसां । गोसावी देहसंगु जैसा । अथवा घनावळी आकाशा । वार्षियें जेवीं ॥119॥ कां स्वप्नासि कारण निद्रा । तैशी प्रकृति हे नरेंद्रा । या अशेषाहि भूतसमुद्रा । गोसाविणी गा ॥120॥

हेही वाचा – Dnyaneshwari : पैं गगन जेवढें जैसें, पवनु गगनीं तेवढाचि असे…

अर्थ

बीजाला पाण्याचे सान्निध्य मिळाले म्हणजे ते बीजच जसे लहान मोठ्या फांद्यांच्या रूपाने विस्ताराला पावते, त्याप्रमाणे मला प्राणिमात्रांचे हे उत्पन्न करणे आहे. ॥109॥ अरे अर्जुना, नगर हे राजाने रचले, या म्हणण्याला खरोखर खरेपणा आला आहे (असे म्हणण्याचा प्रघात आहे); पण वास्तविक पाहिले तर, नगर रचण्यात राजाच्या हाताला श्रम पडले आहेत काय? ॥110॥ आणि मी प्रकृतीचा अंगिकार करतो ते कसे म्हणशील तर, जसा स्वप्नामध्ये जो असतो, तोच जागृतावस्थेत प्रवेश करतो, त्याप्रमाणे ॥111॥ तर अर्जुना, स्वप्नातून जागृतीत येताना त्याचे पाय दुखतात काय? अथवा स्वप्नामध्ये असताना प्रवास होतो काय? ॥112॥ या सर्वांचा अभिप्राय काय म्हणून विचारशील तर, भूतसृष्टीचे मला काहीएक देखील करावे लागत नाही, असाच याचा अर्थ आहे. ॥113॥ ज्याप्रमाणे राजाची आश्रित प्रजा आपापल्या व्यवहारात वागते, त्याप्रमाणे प्रकृतीला माझ्या सत्तेचा केवळ आधार असतो. बाकी सर्व कर्तृत्व हिचे (प्रकृतीचे) आहे. ॥114॥ पाहा की, अर्जुना पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राच्या भेटीने समुद्र भरतीने अफाट भरून येतो, त्या भरती येण्यात चंद्राला श्रम पडतात काय? ॥115॥ (लोहचुंबकाच्या) जवळपणाने अचेतन लोखंड हालते तर हालेना का? पण जड लोखंडाला जवळ ओढून आणण्याचे श्रम चुंबकाला काय पडले? ॥116॥ फार काय सांगावे? याप्रमाणे मी आपल्या प्रकृतीचा अंगीकार करतो आणि त्या योगाने ती प्रकृती भूतसृष्टीला एकसारखी उत्पन्न करूच लागते. ॥117॥ अर्जुना, हा जो प्राण्यांचा समुदाय आहे, तो प्रकृतीच्या आधीन आहे. ज्याप्रमाणे बीजाच्या वेलाला आणि पानांना उत्पन्न करण्यास भूमी (जमीन) समर्थ आहे, ॥118॥ अथवा बाल्यादि अवस्थांना जसा देहसंगाचा आधार आहे, किंवा ज्याप्रमाणे आकाशात मेघांची फळी येण्यास वर्षाऋतू आधारभूत आहे, ॥119॥ अथवा स्वप्नाला कारण जशी झोप आहे, त्याप्रमाणे हे श्रेष्ठ पुरुषा, या सर्वही भूतसमुदायाची मालकीण प्रकृती आहे. ॥120॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : जैसें विरजणियाचेनि संगें, दूधचि आटेजों लागे…


(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!