Friday, February 20, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : तंव अर्जुन म्हणे हें कायी, चकोरेंवीण चांदिणेंचि नाहीं…

Dnyaneshwari : तंव अर्जुन म्हणे हें कायी, चकोरेंवीण चांदिणेंचि नाहीं…

सार्थ ज्ञानेश्वरी

अध्याय नववा

अर्जुना हे गुरुवी भक्ती । सांगितली तुजप्रती । आतां ज्ञानयज्ञें यजिती । ते भक्त आइकें ॥228॥ परि भजन करिती हातवटी । तूं जाणत आहासि किरीटी । जे मागां इया गोष्टी । केलिया आम्हीं ॥229॥ तंव आथि जी अर्जुन म्हणे । तें दैविकिया प्रसादाचें करणें । तरि काय अमृताचें आरोगणें । पुरे म्हणवे ॥230॥ या बोला अनंतें । लागटा देखिलें तयातें । कीं सुखावलेनि चित्तें । डोलतु असे ॥231॥ म्हणे भलें केलें पार्था । एऱ्हवीं हा अनवसरु सर्वथा । परि बोलवीतसे आस्था । तुझी मातें ॥232॥ तंव अर्जुन म्हणे हें कायी । चकोरेंवीण चांदिणेंचि नाहीं । जग निवविजे हा तयाचां ठायीं । स्वभावो कीं जी ॥233॥ येरें चकोरें तियें आपुलिये चाडे । चांचू करिती चंद्राकडे । तेविं आम्ही विनवूं तें थोकडें । देवो कृपासिंधु ॥234॥ जी मेघ आपुलिये प्रौढी । जगाची आर्ति दवडी । वांचूनि चातकाची ताहान केवढी । तो वर्षावो पाहुनी ॥235॥ परि चुळा एकाचिया चाडे । जेविं गंगेतेंचि ठाकावें पडे । तेविं आर्त बहु कां थोडे । तरि सांगावें देवा ॥236॥ तेथें देवें म्हणितलें राहें । जो संतोषु आम्हां जाहाला आहे । तयावरी स्तुति साहे । ऐसें उरलें नाही ॥237॥ पें परिसतु आम्हासि निकियापरी । तेंचि वक्तृत्वा वऱ्हाडीक करी । ऐसें पुरस्करोनि श्रीहरी । आदरिलें बोलों ॥238॥

हेही वाचा – Dnyaneshwari : जैसें उंचीं उदक पडिलें, तें तळवटवरी ये उगेलें…

अर्थ

अर्जुना, तुला ही श्रेष्ठप्रतीची भक्ती सांगितली, आता ज्ञानरूप यज्ञाने जे माझी आराधना करतात, त्या भक्तांचा प्रकार ऐक. ॥228॥ परंतु (ही) भजन करण्याची रीती, अर्जुना, तुला माहीत आहेच. कारण आम्ही या गोष्टी मागे (अध्याय 4था, श्लोक 33-42) तुला सांगितल्या आहेत. ॥229॥ तेव्हा अर्जुन म्हणाला, होय महाराज, मी हे जाणत आहे आणि हे देवाच्या प्रसादाचे कार्य आहे. म्हणून अमृताचे भोजन मिळाल्यावर ‘पुरे, आता नको,’ असे म्हणावेल काय? ॥230॥ अर्जुनाच्या वरील बोलण्यावरून, तो हे जाणण्याविषयी उत्सुक आहे, असे पाहून लागलीच अंत:करणात संतोष झाल्यामुळे श्रीकृष्ण डोलावयास लागले. ॥231॥ श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, फार चांगले केलेस; नाहीतर (मागे एकवार सांगितले असल्यामुळे) हा मुळीच बोलण्याचा प्रसंग नव्हता. परंतु तुझी कळकळ मला बोलण्यास भाग पाडते. ॥232॥ तेव्हा अर्जुन म्हणाला, असे काय म्हणता? चकोर पक्षी असला तरच चंद्र उगवतो, एरवी उगवत नाही काय? महाराज, जगाला शांत करावे, हा त्याच्या (चंद्राच्या) ठिकाणी स्वभावच आहे. ॥233॥ आता जे चकोर आहेत, ते केवळ आपलीच शांतता व्हावी, या इच्छेने चंद्राकडे चोच करतात, त्याप्रमाणे आमची विनंती ती किती थोडी आहे! पण देवा, आपण कृपासिंधू अहात. ॥234॥ महाराज, मेघ हा आपल्या उदारपणाच्या वर्षावाने संपूर्ण जगाची पीडा घालवितो. वास्तविक पाहिले तर, त्या पावसाच्या वृष्टीच्या मानाने चातकाची तहान ती केवढी? ॥235॥ परंतु एक चूळभर पाण्याची इच्छा असली तरी, ज्याप्रमाणे गंगेलाच जावे लागते, त्याप्रमाणे आमची ऐकण्याविषयीची इच्छा फार असो अथवा थोडी असो, तरी ते देवांनाच सांगितले पाहिजे. ॥236॥ त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, हे असू दे. तुझी आस्था पाहून जो काही आम्हास आनंद झाला आहे, त्याच्यावर आता स्तुती सहन होईल, असे राहिले नाही. ॥237॥ तू उत्तम तर्‍हेने ऐकत आहेस, तेच आमच्या बोलण्याला बोलावून आणण्याचे काम करते. याप्रमाणे अर्जुनास शाबासकी देऊन श्रीकृष्णांनी बोलण्यास प्रारंभ केला. ॥238॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : तेजें सूर्य तैसे सोज्वळ, परि तोहि अस्तवे हें किडाळ…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!