Saturday, March 14, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : अर्धोन्मीलित डोळे, वर्षताति आनंदजळें…

Dnyaneshwari : अर्धोन्मीलित डोळे, वर्षताति आनंदजळें…

सार्थ ज्ञानेश्वरी

अध्याय नववा

अहो ऐकिजत असे कीं अवधारा । तंव इया बोला निवांत म्हातारा । जैसा म्हैसा नुठी कां पुरा । तैसा उगाचि असे ॥522॥ तेथ संजयें माथा तुकिला । अहा अमृताचा पाऊस वर्षला । कीं हा एथ असतुचि गेला । सेजिया गांवा ॥523॥ तऱ्ही दातारु हा आमुचा । म्हणोनि हें बोलतां मैळेल वाचा । काइ झालें ययाचा । स्वभावोचि ऐसा ॥524॥ परि बाप भाग्य माझें । जे वृत्तांतु सांगावयाचेनि व्याजें । कैसा रक्षिलों मुनिराजें । श्रीव्यासदेवें ॥525॥ येतुलें हें वाडें सायासें । जंव बोलत असे दृढें मानसें । तंव न धरवेचि आपुलिया ऐसें । सात्विकें केलें ॥526॥ चित्त चाकाटलें आटु घेत । वाचा पांगुळली जेथिंची तेथ । आपादकंचुकित । रोमांच आले ॥527॥ अर्धोन्मीलित डोळे । वर्षताति आनंदजळें । आंतुलिया सुखोर्मीचेनि बळें । बाहेरि कांपे ॥528॥ पै आघवांचि रोममूळीं । आली स्वेदकणिका निर्मळी । लेइला मोतियांचीं कडियाळीं । आवडे तैसा ॥529॥ ऐसा महासुखाचेनि अतिरसें । जेथ आटणी होईल जीवदशे । तेथें निरोविलें व्यासें । तें नेदीच हों ॥530॥ आणि कृष्णार्जुनाचें बोलणें । घों करी आलें श्रवणें । कीं देहस्मृतीचा तेणें । वापसा केला ॥531॥ तेव्हां नेत्रींचें जळ विसर्जी । सर्वांगींचा स्वेदु परिमार्जी । तेवींच अवधान म्हणे हो जी । धृतराष्ट्रातें ॥ 532॥ आतां कृष्णवाक्यबीजा निवाडु । आणि संजय सात्विकाचा बिवडु । म्हणोनि श्रोतया होईल सुरवाडु । प्रमेयपिकाचा ॥533॥ अहो अळुमाळ अवधान देयावें । येतुलेनि आनंदाचिया राशीवर बैसावें । बाप श्रवणेंद्रिया दैवें । घातली माळ ॥534॥ म्हणोनि विभूतींचा ठावो । अर्जुना दावील सिद्धांचा रावो । तो ऐका म्हणे ज्ञानदेवो । निवृत्तीचा ॥535॥

॥ नववा अध्याय समाप्त ॥

हेही वाचा – Dnyaneshwari : जिये लोकींचा चंद्र क्षयरोगी । जेथ उदयो होय अस्तालागीं…

अर्थ

(ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात, ऐका 🙂 संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐकत आहा काय? तेव्हा वृद्ध धृतराष्ट्र, ज्याप्रमाणे पाण्याच्या पुरात बसलेला रेडा हालत नाही, त्याप्रमाणे चित्तात काहीही हालचाल न होता या बोलण्याविषयी निवांत असलेला दिसला. ॥522॥ त्या वेळी संजयाने मान डोलावली आणि (आपल्याशी) म्हणाला, ‘अहा! आज अमृताची वृष्टी झाली; परंतु हा धृतराष्ट्र येथेच असूनही शेजारच्या गावाला गेल्यासारखा आहे. ॥523॥. पण हा आमचा मालक आहे, त्याच्याविषयी असे बोलले असता वाचेस दोष लागेल; काय करावे? याचा स्वभावच असा आहे. ॥524॥. परंतु धन्य माझे भाग्य की, महामुनी वामदेवांनी धृतराष्ट्राला युद्धातील वृत्तांत सांगावयाच्या निमित्ताने माझे कसे रक्षण केले! (म्हणजे, ज्ञानपूर्ण संवादश्रवणाने जन्ममृत्यूपासून माझे रक्षण केले.) ॥525॥ मोठ्या कष्टाने मन आवरून धरून, तो संजय इतके बोलत होता तोच, अष्टसात्त्विक भाव उत्पन्न होऊन, त्यांनी संजयास असे आपल्या आधीन करून घेतले की, त्यास ते अष्टसात्त्विक भाव आवरून धरवेनात. ॥526॥ चित्त चकित होऊन आटू लागले आणि वाचा जागच्या जागी कुंठित होऊन राहिली आणि पायापासून मस्तकापर्यंत अंगरखा घातल्यासारखे सर्व अंगावर रोमांच आले. ॥527॥ अर्धवट उघडलेले डोळे आनंदाचा वर्षाव करू लागले आणि आत होणाऱ्या सुखाच्या लाटेच्या जोरामुळे त्याचे बाहेरील शरीर कापू लागले. ॥528॥ सर्व रोमांचांच्या बुडाशी निर्मळ घामाचे थेंब आले, त्यामुळे जसा एखाद्याने मोत्यांचा जाळीदार अंगरखा घालावा, तसा तो दिसू लागला. ॥529॥ याप्रमाणे महासुखाच्या भराने जेव्हां जीवदशेची आटणी होण्याची वेळ आली, तेव्हा व्यासांनी युद्धवृत्तांत सांगण्याची केलेली आज्ञा ती आटणी होऊ देईना. ॥530॥ आणि त्यावर श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे बोलणे घों घों अशी गर्जना करीत संजयाच्या कानावर आले आणि त्या बोलण्याने संजयाच्या ठिकाणी देहस्मृतीचा वाफसा केला. (संजय देहस्मृतीवर आला). ॥531॥ तेव्हा डोळ्यांतील आनंदाश्रू त्याने पुसले आणि सर्व अंगास आलेला घाम पुसून टाकला आणि त्याप्रमाणे ‘महाराज, लक्ष द्या’ असे तो धृतराष्ट्राला म्हणाला. ॥532॥ आता श्रीकृष्णाची वाक्ये हीच कोणी एक उत्तम बीजे आणि त्यास संजय हीच अष्टसात्त्विक भावरूपी पिकाच्या बिवडाची जमीन मिळाली; त्यामुळे श्रोत्यांना प्रमेयपिकाचा सुकाळ होईल. ॥533॥ अहो, थोडकेसे लक्ष द्यावे आणि एवढ्याने आनंदाच्या राशीवर बसावे. धन्य आहे त्या कानांची की, आज त्यास भाग्याने माळ घातली आहे! ॥534॥ म्हणून (आपल्या) विभूतींची जी स्थाने आहेत, ती सिद्धांचा राजा जो श्रीकृष्ण, तो अर्जुनास दाखवील. निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात, तो प्रसंग श्रोत्यांनी ऐकावा. ॥535॥

॥ नववा अध्याय समाप्त ॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : जन्मलिया दिवसदिवसें, हों लागे काळाचियाचि ऐसें…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!