वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय चौथा
श्रीभगवानुवाच : इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥1॥
मग देव म्हणे अगा पंडुसुता । हाचि योगु आम्हीं विवस्वता । कथिला परी ते वार्ता । बहुवां दिवसांची ॥16॥ मग तेणें विवस्वतें रवी । हे योगस्थिति आघवी । निरूपिली बरवी । मनूप्रती ॥17॥ मनूनें आपण अनुष्ठिली । मग इक्ष्वाकुवा उपदेशिली । ऐसी परंपरा विस्तारिली । आद्य हे गा ॥18॥
एवं परंपराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः । स कालेनेह महता योगो नष्टः परंतप ॥2॥
मग आणिकही या योगातें । राजर्षि जाहले जाणते । परि तेथोनि आतां सांप्रतें । नेणिजे कोणी ॥19॥ जे प्राणियां कामी भरू । देहाचिवरी आदरु । म्हणोनि पडिला विसरु । आत्मबोधाचा ॥20॥ अव्हांटलिया आस्थाबुद्धि । विषयसुखचि परमावधि । जीवु तैसा उपाधि । आवडे लोकां ॥21॥ एर्हवीं तरी खवणेयांच्या गांवीं । पाटाऊवें काय करावीं । सांगे जात्यंधा रवी । काय आथी ॥22॥ कां बहिरयांचां आस्थानीं । कवणे गीतातें मानी । कीं कोल्हेया चांदणीं । आवडी उपजे ॥23॥ पैं चंद्रोदया आरौतें । जयांचे डोळे फुटती असते । ते काऊळे केवीं चंद्रातें । वोळखती ॥24॥ तैसे वैराग्याची शिंव न देखती । जे विवेकाची भाषा नेणती । ते मूर्ख केंवीं पावती । मज ईश्वराते ॥25॥ कैसा नेणों मोहो वाढीनला । तेणें बहुतेक काळु व्यर्थ गेला । म्हणोनि योगु हा लोपला । लोकीं इये ॥26॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तैसे रागद्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मीचें स्वराज्य आलें…
अर्थ
श्रीकृष्ण म्हणाले, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला आणि मनूने इक्ष्वाकूला सांगितला. ॥1॥
मग देव म्हणाला, अरे अर्जुना, हाच निष्काम-कर्मयोग आम्ही सूर्याला सांगितला, परंतु ती गोष्ट फार दिवसांपूर्वीची आहे. ॥16॥ मग त्या विवस्वान् सूर्याने या योगाची संपूर्ण माहिती वैवस्वत मनूला उत्तम प्रकारे सांगितली. ॥17॥ वैवस्वत मनूने याचे स्वत: आचरण केले आणि मग (आपला मुलगा जो) इक्ष्वाकु त्याला त्याचा उपदेश केला. अशी ही परंपरा मुळापासून चालत आलेली आहे. ॥18॥
या प्रमाणे परंपरेने प्राप्त झालेल्या या योगाला राजर्षी जाणते झाले; परंतु हे अर्जुना, पुष्कळ काळ लोटल्यामुळे तो योग या लोकी नष्ट झाला आहे. ॥2॥
मग आणखीही या निष्काम-कर्मयोगाला जाणणारे राजर्षी पुढे होऊन गेले. पण तेव्हापासून आता हल्ली हा कोणालाही ठाउक नाही. ॥19॥ कारण प्राण्यांचा सगळा भर विषयवासनेवर (पडला) आणि त्यांचा सगळा जीव काय तो देहावर आहे, म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला. ॥20॥ आत्मबोधाची आस्था ज्या बुद्धीने बाळगावयाची ती आडमार्गाला लागल्यामुळे (लोकांना) विषयसुख हेच आत्यंतिक सुख वाटू लागले आणि देहादिक प्रपंच हा प्राणाप्रमाणे प्रिय झाला. ॥21॥ नाहीतर, दिगंबरांच्या गावी उंची वस्त्रे काय करावयाची आहेत? जन्मांधाला सूर्य काय उपयोगाचा? सांग बरे. ॥22॥ किंवा बहिर्याच्या सभेत गाण्याला कोण किंमत देणार? किंवा कोल्ह्यांच्या मनात चांदण्यांबद्दल प्रेम कधी उत्पन्न होईल काय? ॥23॥ चंद्राचा उदय होण्याच्या अगोदरच ज्यांचे असलेले डोळे फुटतात, (निरुपयोगी होतात) ते कावळे चंद्राला कसे बरे ओळखणार ? ॥24॥ त्याप्रमाणे वैराग्यरूपी नगराच्या शिवेचेही ज्यांनी कधी दर्शन घेतले नाही, विवेक कशाला म्हणतात, हे ज्यांना माहीत नाही, त्या मूर्खांना माझी (ईश्वराची) कशी बरे प्राप्ती होणार? ॥25॥ हा मोह इतका कसा वाढला, कोण जाणे ? त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला आणि म्हणून या लोकातला हा निष्काम कर्मयोग बुडाला. ॥26॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : आधींचि विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी…


