वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय चौथा
एकीं ययापरी पार्था । दोषु क्षाळिले सर्वथा । आणिकीं हृदयारणीं मंथा । विवेकु केला ॥131॥ तो उपशमें निहटिला । धैर्यें वरी दाटिला । गुरुवाक्यें काढिला । बळकटपणें ॥132॥ ऐसें समरसें मंथन केलें । तेथ झडकरी काजा आलें । जे उज्जीवन जहालें । ज्ञानाग्नीचें ॥133॥ पहिला ऋद्धिसिद्धीचा संभ्रमु । तो निवर्तोनि गेला धूमु । मग प्रगटला सूक्ष्मु । विस्फुलिंगु ॥134॥ तया मनाचें मोकळें । तेंचि पेटवण घातलें । जें यमदमीं हळुवारलें । आइतें होतें ॥135॥ तेणें सादुकपणें ज्वाळा समृद्धा । मग वासनांतराचिया समिधा । स्नेहेंसि नानाविधा । जाळिलिया ॥136॥ तेथ सोहंमंत्रें दीक्षितीं । इंद्रियकर्मांचिया आहुती । तिये ज्ञानानळीं प्रदीप्तीं । दिधलिया ॥137॥ पाठीं प्राणक्रियेचेनि स्रुवेनिशीं । पूर्णाहुती पडली हुताशीं । तेथ अवभृत समरसीं । सहजें जाहलें ॥138॥ मग आत्मबोधींचें सुख । जे संयमाग्नीचें हुतशेष । तोचि पुरोढाशु देख । घेतला तिहीं ॥139॥ एक ऐशिया इहीं यजनीं । मुक्त ते जाहले त्रिभुवनीं । या यज्ञक्रिया तरी आनानी । परि प्राप्य तें एक ॥140॥
द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे । स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः ॥28॥
एक द्रव्ययज्ञु म्हणिपती । एक तपसामग्रिया निपजती । एक योगयागुही आहाती । जे सांगितले ॥141॥ एकीं शब्दीं शब्दु यजिजे । तो वाग्यज्ञु म्हणिजे । ज्ञानें ज्ञेय गमिजे । तो ज्ञानयज्ञु ॥142॥ हें अर्जुना सकळ कुवाडें । जे अनुष्ठितां अतिसांकडें । परी जितेंद्रियासीचि घडे । योग्यतावशें ॥143॥ ते प्रवीण तेथ भले । आणि योगसमृद्धी आथिले । म्हणोनि आपणपां तिहीं केले । आत्महवन ॥144॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तो देहसंगें तरी असे, परी चैतन्यासारिखा दिसे…
अर्थ
अर्जुना याप्रमाणे कोणी एक आपल्या सर्व दोषांचे क्षालन करतात, दुसरे कोणी हृदयाची अरणी करून विवेकाचा मंथा करतात. ॥131॥ तो मंथा शांतीने बळकट धरतात आणि वरून सात्विक धैर्याने बळकट धरून गुरूपदेशरूपी (दोरीने) जोराने घुसळतात. ॥132॥ याप्रमाणे समरसतेने मंथन केले म्हणजे त्याचा ताबडतोप उपयोग होतो; तो हाच की, ज्ञानाग्नी प्रकट होतो. ॥133॥ पहिल्यांदा ऋद्धिसिद्धीचा मोह, हाच कोणी धूर, तो निघून जातो, मग (ज्ञानाग्नीची) बारीकशी ठिणगी उत्पन्न होते. ॥134॥ यमदमांनी आयते वाळवून हलके झालेले मन हेच त्या ज्ञानरूपी ठिणगीला पेटवण घालतात. ॥135॥ त्याच्या सहाय्याने ज्वाला प्रदीप्त होतात. मग त्यात नाना प्रकारच्या वासनारूप समिधा ममतारूपी तुपासह जाळतात. ॥136॥ तेथे दीक्षित (यज्ञकर्ता पुरुष) मी ब्रह्मच आहे, या मंत्राने त्या प्रदीप्त अशा ज्ञानाग्नीत इंद्रियकर्मांच्या आहुती देतो. ॥137॥ नंतर प्राणक्रियेच्या स्रुवेने ज्ञानाग्नीमध्ये पूर्ण आहुती दिली म्हणजे, ऐक्यबोध होऊन अवभृथस्नान (त्याला) सहजच होते. ॥138॥ संयमाग्नीत (इंद्रियादिक) होमद्रव्यांचे हवन करून शिल्लक राहिलेले जे आत्मज्ञानाचे सुख, तोच पुरोडाश मग ते सेवन करतात. ॥139॥ अशा या यज्ञांनी आजपर्यंत या त्रिभुवनात कित्येक मुक्त होऊन गेलेले आहेत, या यज्ञक्रिया जरी भिन्न भिन्न आहेत, तरी त्या सर्वांची फलप्राप्ती एकच आहे. ॥140॥
त्याप्रमाणे द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, वाग्यज्ञ आणि ज्ञानयज्ञ असे (पाच प्रकारचे) यज्ञ आहेत. तीक्ष्ण व्रते आचरण करणारे यतीच (हे यज्ञ करतात.) ॥28॥
त्यापैकी काहींना ‘द्रव्ययज्ञ’ अशी संज्ञा आहे. काही यज्ञ तपरूप सामर्थ्याने उत्पन्न होतात. कित्येक ‘योगयज्ञ’ म्हणून सांगितले आहेत. ॥141॥ कित्येकात शब्दांनी शब्दाचे हवन करतात, (वेदांच्या शब्दांचा उच्चार करतात) त्यास ‘वाग्यज्ञ’ असे म्हणतात. (ज्यात) ज्ञानाने ज्ञेय (जाणावयाची वस्तू, ब्रह्म) जाणता येते, तो ‘ज्ञानयज्ञ’ होय. ॥142॥ अर्जुना, हे सर्व यज्ञ कठीण आहेत. कारण त्यांचे अनुष्ठान करणे अतिशय त्रासाचे आहे. परंतु ज्यांनी इंद्रिये जिंकली, त्यासच ते करण्याची योग्यता येऊन त्याचे आचरण घडते. ॥143॥ ते त्या कामी चांगले प्रवीण असतात आणि योगसमृद्धीने संपन्न असतात. म्हणून ते आपले आत्मस्वरूपाचे ठिकाणी (जीवबुद्धीचे) हवन करतात. ॥144॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जो चिंतीना देहभरण, तो महायोगी जाण दैवयोगें…


